Chhapaak Review : पलके नही है, मगर नजर उठी है!

महेश बर्दापूरकर 
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

‘छपाक’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्याचे सारे पदर अत्यंत नेमकेपणानं, हळुवारपणे आणि तितक्याच सहजतेनं उलगडून दाखवले आहेत दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी.

छपाक 

एका सुंदर, भविष्याची स्वप्नं रंगविणाऱ्या, त्यासाठी कष्टाची तयारी असणाऱ्या मुलीवर केवळ ती आपल्याला आवडते, मात्र तिचं मन दुसऱ्या कोणात गुंतलेलं आहे म्हणून अॅसिड हल्ला केला जातो. एका झटक्यात तिचं आयुष्य, सारी स्वप्नं मातीमोल करून टाकली जातात. हे अनेक मुलींच्या बाबतीत घडतं. आकडेवारीनुसार दरवर्षी शेकडो मुलींच्या बाबतीत... या प्रकारच्या घटनांमागची पुरुषी मानसिकता, अॅसिड हल्ला झालेल्या मुलीची ससेहोलपट, या गुन्ह्यासंदर्भातील अर्धवट कायदे, त्यातील पळवाटा आणि या विरोधात लढणाऱ्या अनेक व्यक्ती आणि संघटना असे अनेक पदर असलेला हा विषय. ‘छपाक’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्याचे सारे पदर अत्यंत नेमकेपणानं, हळुवारपणे आणि तितक्याच सहजतेनं उलगडून दाखवले आहेत दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी.

'छपाक'च्या प्रदर्शनापूर्वी दीपिकानं केलं हे महत्त्वाचं काम!

कथा, पटकथा, दिग्दर्शन, संगीत, नेमका संदेश आणि दीपिका पदुकोणसह सर्वंच कलाकारांचा अभिनय यांमुळं हा प्रवास हादरवतो, हळवा करतो, संवेदनशील मनांना अक्षरशः जाळून टाकतो... 

Image result for chhapaak

‘अॅसिड सर्वप्रथम हल्ला करणाऱ्याच्या मेंदूत तयार होतं आणि मगच ते त्याच्या हातात येतं. हे करण्यामागची त्याची मानसिकता मला जाणून घ्यायची आहे,’ या आशयाचं वाक्य चित्रपटात या विषयात काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याच्या तोंडी आहे. दिग्दर्शकानं कथेतून नेमकं हेच शोधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी लक्ष्मी आगरवाल या युवतीच्या बाबतीत घडलेल्या दुर्दैवी सत्य घटनेचा आधार घेतला गेला आहे. दिल्लीत 2012मध्ये घडलेल्या निर्भया प्रकरणाचे वारे देशभरात जोरात वाहताहेत आणि त्याच वेळी अॅसिड हल्ल्यातील दुर्दैवी मुलींचा विषयही मीडियामध्ये येतो. त्यातून मालती (दीपिका पदुकोन) या दुर्दैवी मुलीची कथा समोर येते. तिच्यावर 2005मध्ये कौटुंबिक ओळख असलेला टेलर बशीर शेख (विशाल दहिया) एकतर्फी प्रेमातून अॅसिड हल्ला करतो. मालतीचं भावविश्‍व उद्‍ध्वस्त होतं. सात शस्त्रक्रियांनंतर तिचा चेहरा जरा बरा होतो. ‘पलके नही है, मगर नजर उठी है,’ असं म्हणत ती लढायला सज्ज होते. अमोल (विक्रांत मेस्सी) हा सामाजिक कार्यकर्ता व काही वकील तिला न्यायालयात लढण्याचं बळ देतात. मालती जनहित याचिका दाखल करून अॅसिडच्या विक्रीवरच बंदी आणण्यासाठी संघर्ष सुरू करते. 

Chhapaak movie review : मन हेलवणारी कथा आणि दीपिकाचा पावरफूल अभिनय !

दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी केलेलं कथेचं सादरीकरण हा चित्रपटाचा आत्मा आहे. एवढा नाजूक विषय किती संवेदनशीलतेनं हाताळता येऊ शकतो, याचा हा वस्तुपाठ ठरावा. हल्ला झाल्यानंतरचा मालतीचा आक्रोश, तिचं खचणं, तुटणं, स्वतःला सावरायचा प्रयत्न करणं आणि नंतर संघर्षात उतरणं हा पट त्यांनी अभ्यासपूर्वक, प्रत्येक पात्राच्या मानसिकतेचा विचार करीत उभा केला आहे. छोट्या प्रसंगांतून या विषयाचं गांभीर्य, राजकारणी व न्यायप्रक्रियेकडून त्याकडं होणारं दुर्लक्ष यांवरही प्रहार केले आहेत. ‘छपाकसे पहचान ले गया...’ या सतत येणाऱ्या ओळी प्रेक्षकांच्या कानात अक्षरशः अॅसिड ओतल्यासारख्या वेदना करीत राहतात आणि नंतर अनेक तास मेंदूत घोळतात... हेच या चित्रपटाचं मोठं यश आहे. 

हा चित्रपट मेघनाप्रमाणंच दीपिका पदुकोणचा आहे. सर्वप्रथम ही भूमिका स्वीकारल्याबद्दलच तिचं कौतुक व्हायला हवं. मालतीच्या भूमिकेला असलेले शेकडो पैलू ती जगली आहे. तिचा आक्रोश, संघर्ष, प्रेम सर्वकाही तिनं डोळ्यांतून उभं केलं आहे. जळून ओबडधोबड झालेल्या चेहऱ्यावरच्या तिच्या वेदना, कोर्टाच्या निर्णयांमुळं फुललेलं हसू, न्यायासाठीचा निर्धार केवळ अप्रतिम. विक्रांत मेस्सी, विशाल दहिया, वकिलाच्या भूमिकेतील अभिनेत्री मधुरजीत सरघी यांनी तिला खूप चांगली साथ दिली आहे. शंकर-एहसान-लॉय यांचं संगीत आणि ‘नोक झोक...’ व शीर्षकगीत श्रवणीय. 

काय आला 'छपाक' बद्दल कोर्टाचा निर्णय, वाचा सविस्तर

एकंदरीतच, प्रत्येकाच्या मेंदूतील 'अॅसिड'वरच हल्ला करणारा आणि माणूस म्हणून जगण्यासाठीच्या आवश्‍यक गोष्टींची उजळणी करून घेणारा हा चित्रपट प्रत्येकानं पाहावाच. 

(गुन्हेगारांना जात-धर्म नसतो, त्यामुळं सोशल मीडियावरून सुरू असलेल्या खोट्या पोस्टना धुडकावून हा अनुभव घ्या.) 
---- 
स्टार - 4.5


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chhapaak review by Mahesh Bardapurkar