Chhichhore Review : कॉलेजमधील प्रेम, मैत्री दाखविणारा 'छिछोरे'

संतोष भिंगार्डे
Saturday, 7 September 2019

जाणून घ्या छिछोरे आहे तरी कसा?? 

"दंगल'फेम नीतेश तिवारीने एक सरळ व साधा विषय व तोदेखील नेटकेपणाने आणि हलक्‍याफुलक्‍या पद्धतीने "छिछोरे' या चित्रपटात मांडला आहे. केवळ मनोरंजन हा विचार न करता सामाजिक संदेशही देण्याचा प्रयत्न त्याने या चित्रपटाद्वारे केला आहे. विषयाची नेमकी मांडणी, त्याला खुमासदार व चटपटीत संवादाची जोड आणि कलाकारांचा अभिनय सगळेच उत्तम जमले आहे.

यश आणि अपयश आपल्या जीवनाचा भागच आहे; परंतु अपयश आले तरी मनाने खचून न जाता पुन्हा तेवढ्याच उत्साहाने आणि उमेदीने प्रयत्न केले पाहिजेत हेच चित्रपटात सांगण्यात आले आहे. आपण यश मिळाले तर त्याचे सेलिब्रेशन कसे करावे हे ठरवितो; परंतु अपयश आले तर काय केले पाहिजे, हे कुणीच काही ठरवत नाही. चित्रपटात या मुद्द्यावरही भाष्य करण्यात आले आहे.chhichhore

अनिरुद्ध पाठक (सुशांत सिंग राजपूत) व माया (श्रद्धा कपूर) हे विभक्त झालेले जोडपे. त्याचा राघव (मोहम्मद समद) हा मुलगा. तो अत्यंत हुशार आणि मेहनती असतो. एन्ट्रन्स एक्‍झाममध्ये चांगले गुण मिळावेत म्हणून तो खूप मेहनत घेतो. पण तेथे त्याला अपयश येते. त्याने तो कमालीचा खचून जातो आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. ताबडतोब त्याला इस्पितळात दाखल करण्यात येते. तेथे त्याचे आई-वडील लगेच पोहोचतात. तेथे आपल्या मुलाला, अनिरुद्ध आपल्या हॉस्टेलमधील जीवन कसे होते याची कहाणी सांगतो. मायाबरोबर हॉस्टेलमध्ये झालेले जुळलेले प्रेम... डेक, सेक्‍स, एसिड, मम्मी, क्रिसक्रॉस यांची आपली असलेली मैत्री आणि त्यांनी दिलेली हुशार मुलांशी टक्कर हे सगळे सांगतो. आमच्यात असलेली घट्ट मैत्री आणि आमच्यावर बसलेला लूझर्सचा टॅग आणि तो पुसून टाकण्यासाठी आम्ही सगळ्यांनी केलेले प्रयत्न हे सगळे सांगतो. आपल्या सगळ्या मित्रांना तो तेथे बोलावितो. एकेकाळचे हे लूझर्स कसे यशस्वी ठरले आहेत ते सांगतो. या सगळ्यांचा भूतकाळ ऐकल्यानंतर राघव शुद्धीवर येतो का... माया आणि अन्नी मग काय ठरवितात... त्यांना मित्रांची मदत कशा पद्धतीने होते... यासाठी चित्रपट पाहावा लागेल.

Image result for chhichhore

सुशांत सिंग राजपूत, श्रद्धा कपूर, वरुण शर्मा या सगळ्याच कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. कॉलेजचे जीवन आणि तेथील मौजमस्ती छान दाखविण्यात आली आहे. हलकेफुलके आणि प्रासंगिक संवाद छान आहेत. मैत्री, प्रेम आणि जिव्हाळा कशा पद्धतीने जपला पाहिजे हेही सांगण्यात आले आहे. यशापेक्षा अपयशाने खचलेल्यांना कसा धीर दिला पाहिजे... मैत्रीचे नाते कसे जपले पाहिजे हेही दाखविण्यात आले आहे. मात्र, चित्रपटाची लांबी खूप आहे आणि संगीतही फारसे चांगले जमलेले नाही. खरे तर कॉलेज जीवन आणि एकूणच तेथील गमतीजमती मांडताना संगीताची चांगली जोड मिळणे आवश्‍यक असते. पण त्याबाबतीत निराशा पदरी पडते. अंदाज अपना अपना, थ्री इडिएट्‌स, जिंदगी ना मिलेगी दोबारा अशा चित्रपटांची आठवण करून देणारा निखळ मनोरंजन करणारा आणि आनंद देणारा चित्रपट आहे.

चार स्टार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chhichhore movie review by Santosh Bhingarde