No Mobile In Theater : जॅमर बसविणे हाच पर्याय

No Mobile In Theater : जॅमर बसविणे हाच पर्याय

नाटक सुरु असताना मोबाईल वाजल्याने विचलित झाल्याने अभिनेता सुबोध भावेने यापुढे नाटकातील काम थांबवणे योग्य राहील असे म्हटले आहे. अनेक वेळा सांगून, विनंती करूनही जर नाटक चालू असताना मोबाईल वाजत असतील तर याचा अर्थ आपल्या नाटकात काहीतरी कमी आहे किंवा नाटक संपूर्ण एकरूप होऊन बघण्याची गरज प्रेक्षकांना वाटत नाही, असेही त्याने म्हटले होते. सुबोधच्या समर्थनार्थ अनेक कलाकारांनी आपले मत व्यक्त केले आहे.

यापूर्वीही अभिनेता सुमीत राघवनच्या बाबतीत असाच प्रकार घडला होता. त्यावेळीही मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी सुमीत राघवनला आपला पाठींबा दर्शविला होता. त्यावेळी अभिनेता चिन्मय मांडेलकरनेही आपली भूमिका स्पष्ट केली होती. 

#Repost जॅमर बसविणे हाच पर्याय- चिन्मय मांडेलकर
प्रत्येक कलाकाराला त्रास होतो व तो त्याप्रमाणे आपली भूमिका घेतो. सुमितने घेतलेली भूमिका ही केवळ त्या दिवसापुरती मर्यादित नाही. हा त्रास सर्व कलाकारांना सातत्याने होत आहे. नाटक पाहायला येणारे प्रेक्षक स्वतःला शिस्त कधी लावून घेणार, हा कळीचा मुद्दा आहे.

प्रयोगादरम्यान वाजणारे मोबाईल, बेशिस्त पद्धतीने त्यांचे फोनवरील बोलणे आणि प्रेक्षकांसोबत आलेल्या लहान मुलांचा रडण्याचा आवाज या सर्वांचा त्रास नाटकातील कलाकारांना होत असतो. या त्रासाबद्दल कलाकारामध्ये दुमत नाही. यावर काही उर्मट प्रेक्षक आम्ही तिकीट काढून नाटक बघायला येतो, असे म्हणून कलाकारावर हक्क गाजवायला बघतात. तिकीट हा प्रेक्षकांचा मालकी हक्क नव्हे, त्या तिकिटाबरोबर प्रेक्षकांवर जबाबदारीही येते. नाटकाचे तिकीट काढल्यावर प्रेक्षकांनी तो प्रयोग समंजसपणे पाहिला पाहिजे. मोबाईलचे सायलेंटचे बटण दाबायला प्रेक्षक उच्च शिक्षित असण्याची गरज नाही. ते कोणालाही करता येते. ते जर जमत नसेल, तर प्रेक्षकांनी नाटक बघायला येऊ नये. 

हल्ली नाटकाच्या प्रयोगादरम्यान मोबाईल वाजला नाही, तर खूप दुर्मिळ घटना ठरते. मी 100 प्रयोग करतो, तेव्हा केवळ दोन प्रयोगांत मोबाईल फोन अजिबात वाजत नाही असा अनुभव आहे. हा अनुभव कमी अधिक प्रमाणात प्रत्येक नाटकाच्या प्रयोगादरम्यान येतो. आम्ही कलाकार नाटक सुरू होण्यापूर्वी प्रेक्षकांना नम्रपणे मोबाईल बंद किंवा सायलेंटवर ठेवण्यासंदर्भात सूचना देतो. आता प्रेक्षकांना याबाबतीत साक्षर करून, विनवणी करून काही उपयोग होईल, असे वाटण्याची परिस्थिती राहिलेली नाही. यावर नाट्यगृहामध्ये मोबाईल जॅमर बसविणे, हा एकच उपाय दिसतो.

हेच प्रेक्षक न्यायालयात जातात, तेव्हा मोबाईल न चुकता बंद ठेवतात, कारण तिथे कायद्याचा बडगा असतो. मग नाट्यगृहातच का बेशिस्तपणा? प्रेक्षक म्हणतात की, आम्हाला इमर्जन्सी येऊ शकते. इमर्जन्सी असल्यास प्रत्येक नाट्यगृहाच्या कार्यालयात दूरध्वनी आहेत. तेथे फोन करून निरोप देता येईल. तो निरोप नाट्यगृहाचे कर्मचारी त्या प्रेक्षकांपर्यंत पोचवतील. नाटक मुळात दोन तासांचे असते त्यामध्येही 10 ते 15 मिनिटांचा मध्यंतर असतो. या वेळेत प्रेक्षक फोनवर बोलू शकतात. मध्यंतरात मोबाईल जॅमर ऑफ करता येतील. या दोन तासांत मोबाईल बोललो नाही, तर आपल्यावर फार मोठी आपत्ती कोसळेल अशी परिस्थिती नक्कीच नाही. त्यामुळे प्रेक्षकांनी आपले मोबाईल बंद किंवा सायलेंटवर ठेवावे, हीच आम्ही कलाकारांची नम्र अपेक्षा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com