माचीवरला बुधा चित्रपटातही हुबेहुब- चितमपल्ली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

हा चित्रपट म्हणजे पशु, पक्षी व प्राणी आणि निसर्ग यांच्या अतुट नात्यांची गुंफण असून त्यामध्ये शहरात राहिलेला बुधा माचीवरच्या जंगलात जाऊन निसर्गाची एकरूप होताना दिसतो. बुधाला या निसर्गाच्या सानिध्यात खऱ्या जीवनाचा अर्थ निसर्गामुळेच कळतो.

गराडे : सुप्रसिध्द कादंबरीकार कै. गो. नी. दांडेकर यांच्या कादंबरीवर आधारित 'माचीवरला बुधा' या चित्रपटातील बुधाला मी प्रत्यक्ष बघितले आहे. या चित्रपटात बुधा हा तसाच्या तसाच साकारला असून पक्ष्यांच्या गाण्यासह निसर्गाचे केलेले चित्रण अप्रतिम असल्यामुळेच गो. नी. दांडेकर यांचा संदेश प्रेषकांपर्यंत पोचण्यास ही कलाकृती यशस्वी ठरली असल्याचे प्रतिपादन सुप्रसिध्द पक्षी तज्ज्ञ व अरण्यवाचक मारुती चितमपल्ली यांनी केले.

विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक संकुलातील सभागृहात सुप्रसिध्द पक्षी तज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांच्या प्रमुख उपस्थितीत माचीवरला बुधा या निसर्ग चित्रपटाचा 'विशेष शो' आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री चितमपल्ली बोलत होते.
यावेळी पुरंदर तालक्यातील पानवडी गावचे रहिवाशी व चित्रपटाचे दिग्दर्शक विजय दत्त, माहिती संचालक राधाकृष्ण मुळी, विदर्भ साहित्यसंघाचे सरचिटणीस विलास मानेकर, छात्रजागृतीचे निशांत गांधी, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर उपस्थित होते.

निसर्ग आणि माणूस यांच्यातील अव्दैत राखणारा आणि निसर्गाबद्दल विलक्षण अनुभूती देणाऱ्या एकाच व्यक्तीवर आधारलेला 'माचीवरला बुधा' हा चित्रपट म्हणजे निसर्गावर भरभरून प्रेम करण्याची प्रेरणा देणारी कलाकृती आहे. 
हा चित्रपट म्हणजे पशु, पक्षी व प्राणी आणि निसर्ग यांच्या अतुट नात्यांची गुंफण असून त्यामध्ये शहरात राहिलेला बुधा माचीवरच्या जंगलात जाऊन निसर्गाची एकरूप होताना दिसतो. बुधाला या निसर्गाच्या सानिध्यात खऱ्या जीवनाचा अर्थ निसर्गामुळेच कळतो. सर्वच अंगांनी परिपूर्ण असलेला हा चित्रपट म्हणजे गो. नी. दांडेकर यांच्या अप्रतिम निसर्ग प्रेमाची संकल्पना प्रेक्षकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न होता. या चित्रपटासाठी बुधाच्या रुपाने मारुती चितमपल्लींसारखे ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचे सहकार्य लाभल्यामुळेच पक्षी व निसर्गाचे चित्रण करण्याची प्रेरणा मिळाली. त्यातूनच ही कलाकृती साकार झाल्याचे दिग्दर्शक विजय दत्त यांनी यावेळी सांगितले. 

चित्रपटात बुधाची प्रमुख भूमिका सुहास पळशीकर यांनी साकारली असून स्मिता गणोरकर, नितीन कुलकर्णी, चंद्रपकाश व कृष्णा दत्त यांच्याही भूमिका आहेत. संगीत धनंजय धुमाड यांचे, तर पार्श्वसंगीत विजय गावडे यांचे आहे. चित्रपटाची निर्मिती दिपीका विजय दत्त यांनी केली असून पटकथा व संवाद प्रताप गंगावणे यांनी लिहिले आहे.

पक्ष्यांच्या गाण्यांमध्येही असते हाइरार्की (उतरंड)
पक्ष्यांच्या गाण्याविषयी सांगतांना सुप्रसिध्द पक्षी तज्ज्ञ मारुती चितमपल्ली म्हणाले, पक्षी गातात पण त्यांच्यामध्येही हाइरार्की (उतरंड) असते. त्यानुसार रात्री बारा वाजता सर्वप्रथम मोर गायला सुरुवात करतो, त्यानंतर पिंगळा पक्षी, कोतवाल, शामा आणि बुलबुल पक्ष्याच्या गाण्याने दिवस उजाळतो. या चित्रपटामध्ये कृतिम संगीताऐवजी सुतार पक्ष्याच्या आवाजाचा सुरेख वापर केला आहे. निसर्गाचे व पक्ष्यांच्या आवाजाचे चित्रण अप्रतिम असून यासाठी खुप परीश्रम घेतले आहे. हा चित्रपट शासनानेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पाठवावा अशी सूचना मारुती चितमपल्ली यांनी यावेळी केली.
 

Web Title: chitampalli speaks about machivarla budha