गड्या आपली रिळंच बरी! सिनेसृष्टीचा 'डिजिटल'कडून 'निगेटिव्ह'कडे यू टर्न

सौमित्र पोटे
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

आताशा सर्व चित्रपट डिजिटली शूट होतात. पण या स्थित्यंतराला पाच वर्षे उलटतात ना उलटतात तोच सिनेसृष्टी पुन्हा निगेटिव्हकडे वळली आहे. हाॅलिवूडमध्ये अलिकडे अनेक चित्रपट निगेटिव्हवर शूट होऊ लागले आहेत. 'डंकर्क' हा चित्रपट त्याचे उत्तम उदाहरण आहे. हे लोण आता मराठीतही आले असून अनेक मराठी चित्रपटही पुन्हा निगेटिव्हवर शूट होणार आहेत. 

पुणे: मराठी सिनेसृष्टीने बदलत्या काळाचा हात धरत तांत्रिक दृष्ट्या समृध्द होण्याकडे वाटचाल केली. याचाच एक भाग म्हणून वर्षानुवर्षे चित्रपट चित्रिकरणासाठी वापरली जाणारी निगेटीव्ह अर्थांत ज्याला बोली भाषेत रिळं म्हणतात ती बंद झाली आणि सिनेमाने डिजिटल युगाकडे वाटचाल केली. आताशा सर्व चित्रपट डिजिटली शूट होतात. पण या स्थित्यंतराला पाच वर्षे उलटतात ना उलटतात तोच सिनेसृष्टी पुन्हा निगेटिव्हकडे वळली आहे. हाॅलिवूडमध्ये अलिकडे अनेक चित्रपट निगेटिव्हवर शूट होऊ लागले आहेत. 'डंकर्क' हा चित्रपट त्याचे उत्तम उदाहरण आहे. हे लोण आता मराठीतही आले असून अनेक मराठी चित्रपटही पुन्हा निगेटिव्हवर शूट होणार आहेत. 

डिजिटली शूट झालेला चित्रपट साधारण 25 वर्षे टिकतो हे आता जाणकारांच्या लक्षात आले आहे. पण निगेटिव्हवर शूट होणारा चित्रपट पुढे किमान शंभर वर्षे टिकत असल्याचे दाखले आहेत. शिवाय निगेटिव्हला शूट केलेल्या चित्रपटाला एकप्रकारची खोली (डेप्थ) मिळते असे अनुभवी सिनेमेटोग्राफर सांगतात. यामुळेच मराठीतही निगेटिव्ह वापराला सुरूवात होणार आहे. याची नांदी ज्येष्ठ सिनेनिर्माते सचिन पारेकर यांच्याशी बोलता बोलता आली. 'शेजारी शेजारी', 'लपंडाव', 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं' आदी चित्रपटांची निर्मिती पारेकर यांनी केली आहे. पारेकर 'ई सकाळ'शी बोलताना म्हणाले, 'मी सध्या तीन चित्रपटांच्या निर्मितीमध्ये गुंतलो आहे. यथावकाश मी त्या चित्रपटांची घोषणा करेनच. या तीनही चित्रपटांचे चित्रिकरण आम्ही निगेटिव्हवर करणार आहोत. एक चित्रपट पूर्ण शूट व्हायला आम्हाला साधारण सव्वाशे डबे लागतात. रिळांच्या एका डब्याचा खर्च असतो 17 हजार रूपये. तो खर्च परवडतो. रीळांवर शूट झालेल्या पिक्चरची क्वालिटी बघता निगेटिव्हवर चित्रपट शूट होणं चांगलं. याबाबत नॅशनल फिल्म अर्काइव्हचे तांत्रिक सल्लागार उज्ज्वल निरगुडकर यांच्याशीही माझे बोलणे झाले आहे. त्यांचीही मोठी मदत या कामी होणार आहे.'

विशेष बाब अशी, की डिजिटल युगामुळे निगेटिव्ह मिळणे जवळपास बंद झाले होते. 'कोडॅक', 'फूजी' अशा अनेक कंपन्यांनी आपली निगेटिव्ह निर्मितीची दप्तरे गुंडाळली होती. पण निगेटिव्हची सुरु झालेली मागणी लक्षात घेता कोडॅक कंपनी आपले निगेटिव्ह मिळणारे कार्यालय मुंबईत सुरू करण्याच्या विचारात आहे, अशी माहीती पारेकर यांनी दिली. 

काय होईल यामुळे..

पूर्वी फोटो काढताना जशी त्यात निगेटिव्ह वापरली जायची. त्यामुळे फोटो काढण्याला मर्यादा असायची. एखादा परंतु उत्तम फोटो काढण्याकडे कल असायचा. तो रोल जपून वापरला जायचा. पण फोटोतही डिजिटल क्रांती झाली आणि एकाच दृश्याचे हवे तितके फोटो काढले जाऊ लागले. त्यामुळे फोटो काढण्याला ताळा उरला नाही. अशीच अवस्था सिनेमाची झाली. आता निगेटिव्ह पुन्हा वापरली गेली, तर मात्र सिनेसृष्टीला जपून सिनेमा शूट करावा लागणार आहे.     

Web Title: cinema digital to roll camera shooting esakal news