मराठी चित्रपट, नाट्य व टीव्ही इंडस्ट्रीतील मंडळींनी साधला मुख्यमंत्र्यांशी संवाद, विविध प्रश्नांबाबत झाली सकारात्मक चर्चा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

नाट्यक्षेत्र व मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी तसेच निर्मात्या-दिग्दर्शकांनी आणि टीव्ही वाहिन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला.

मुंबई : नाट्यक्षेत्र व मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी तसेच निर्मात्या-दिग्दर्शकांनी आणि टीव्ही वाहिन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला. सुमारे एक ते दीड तास चाललेल्या या व्हिडीओ कॉन्फरसिंगमध्ये चित्रपट, नाट्य तसेच टीव्ही इंडस्ट्रीतील विविध समस्या तसेच प्रश्न मुख्यमंत्र्यांनी ऐकून घेतले आणि त्यावर विचारविनिमय करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

हे ही वाचा - महाराष्ट्र पोलिसांना 'वंदे मातरम' लघुपटाव्दारे मानाचा मुजरा

कोरोनामुळे संपूर्ण चित्रीकरण तसेच चित्रपटगृहे-नाट्यगृहे गेले दोनेक महिने बंद आहेत. संपू्र्ण इंडस्ट्री ठप्प झाली आहे. पडद्यामागे काम करणाऱ्या कामगारांची परिस्थिती बिकट झाली आहे. काही चित्रपटांचे पोस्ट प्राॅडक्शनचे काम रखडलेले आहे. टीव्ही मालिकांचे काही सेट्स उभारलेले आहेत आणि त्यांचे भाडे दिवसेदिवस वाढत चाललेले आहे. एकूणच लाॅकडाऊनच्या काळात नाट्य व चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीला भेडसावणारे विविध प्रश्न आणि त्यावर काय तोडगा काढता येईल याबाबत आज चित्रपट व नाट्यसृष्टीतील मंडळींनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.

Marathi Entertainment Industry actors, directors and producers ...

अभिनेता आदेश बांदेकर आणि अभिनेता सुबोध भावे यांनी या बैठकीसाठी पुढाकार घेतला. त्यामध्ये खासदार व अभिनेते डाॅ. अमोल कोल्हे, अभिनेता पुष्कर श्रोत्री, दिग्दर्शक केदार शिंदे, अभिनेता अतुल परचुरे, अभिनेत्री मुक्ता बर्वे, अभिनेत्री सुकन्या मोने, दिग्दर्शक रवी जाधव, अभिनेता सुशांत शेलार, विजू माने, अभिनेते प्रशांत दामले, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, निर्माते नितीन वैद्य, व्हाॅयकाॅमचे निखिल साने, सोनी मराठीचे बिझनेस हेड अजय भालवणकर, प्रसाद महाडकर आदी मंडळींचा सहभाग होता.

याबाबत आदेश बांदेकर म्हणाला, की सोशल डिस्टंसिंग पाळून चित्रीकरण सुरू कसे करता येईल, गोरेगाव येथील चित्रनगरीत मालिकांचे सेट उभारलेले आहेत. तेथे दोन महिने चित्रीकरण झालेले नसल्यामुळे त्यांच्या भाड्यांबाबत काय करतायेईल..अनेक बॅकस्टेज कामगार आहेत त्यांना कशा प्रकारची मदत करता येईल यावर आमची चर्चा झाली. अगदी चित्रीकरण सुरू करण्यापासून ते कामगारांना मदत करण्यापर्यंत विविध मुद्यांवर सकारात्मक चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी याबाबत विचारविनिमय करण्यात येईल असे सांगितले आहे.

अभिनेता पुष्कर श्रोत्री म्हणाला, की आम्ही सगळ्यांनी खूप सकारात्मक चर्चा केली. विविध विषय आम्ही सर्वांनी त्यांच्यासमोर मांडलेले आहेत. त्याबाबत काही तरी तोडगा काढण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. सुबोध भावे म्हणाला, की नाट्य व चित्रपटसृष्टीतील प्रश्नांबाबतच लोककलावंत तमाशा कलावंत, नृत्य कलावंत, गायक कलाकार, वादक, कामगार अशा सगळ्याच मंडळींना काय मदत करता येईल याबाबत आमची चर्चा झाली आणि मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावर काही तरी तोडगा निश्चित काढू असे त्यांनी आश्वासन आम्हाला दिले आहे. अखिल भारतीय मराठी परिषदेला काय मदत करता येईल याबाबतदेखील ठोस निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी मराठी नाट्यपरिषदेचे सदस्य तसेच कामगार यांच्या मदतीकरिता दहा कोटी रुपयांचा निधी सरकारने द्यावा असे सुचविले. त्यालाही सकारात्मक प्रतिसाद मुख्यमंत्र्यांनी दिला, असे प्रसाद कांबळी यांनी सांगितले.

कलाकार, कामगार, तंत्रज्ञ यांच्यामागे सरकार खंबीरपणे उभे राहिल...
महाराष्ट्रातले मनोरंजन आणि करमणूक क्षेत्र मोठे आहे. बॅकस्टेज कलाकार-कामगार व तंत्रज्ञ हा वर्गही मोठा आहे. सरकार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. चित्रनगरीत सध्या ज्यांचे सेटस् आहेत त्यांना भाडेसवलत तसेच लोककला व तमाशा कलावंत यांच्याबाबतीतही विचार केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच ग्रीन किंवा ऑरेंज झोनमध्ये दक्षता घेऊन व सर्व नियम पाळून मर्यादित स्वरूपात का होईना चित्रीकरण करण्यात येईल का, याचाही विचार केला जाईल. याबाबतीत निर्मात्यांनी कृती आराखडा द्यावा. त्याचा विचार केला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  

cm uddhav thackeray think about how to start film production work


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cm uddhav thackeray think about how to start film production work