सुशांत मृत्यु प्रकरणात दिल्लीतील वकिलाला मुंबई पोलिसांनी केली अटक

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Saturday, 17 October 2020

सुशांतसिंग राजपूत आणि दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणात आरोपी वकिल विभोर आनंद यांनी बनावट कथा रचून ती सोशल मीडियावर पसरवली होती.

मुंबई- सुशांतसिंह राजपूत प्रकरणी आता आणखी एक अटक झाली आहे. या प्रकरणाशी थेट संबधित ही अटक नाहीये. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सोशल मीडियावर अफवा पसरवणे तसंच या प्रकरणाशी काही संबंध नसलेल्या लोकांना बदनाम केल्याप्रकरणी दिल्लीतील एका वकीलाला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने ही कारवाई केली आहे.

हे ही वाचा: एकीकडे मोदींचं बायोपिक प्रदर्शित तर दुसरीकडे विवेक ओबेरॉयच्या घरी छापेमारी, काय आहे कनेक्शन?    

वकील विभोर आनंद यांच्यावर मानहानीच्या दाव्यासोबतंच वेगवेगळ्या कलमांअतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलिस गुन्हे शाखेचे डीसीपी अकबर पठाण यांनी सांगितलं की, 'सुशांतसिंग राजपूत आणि दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणात आरोपी विभोर आनंद यांनी बनावट कथा रचून ती सोशल मीडियावर पसरवली होती. याशिवाय ते मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आक्षेपार्ह भाषा वापरत होते.'

विभोर आनंद

मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकारला सतत लक्ष्य करत होते. याच कारणास्तव मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने विभोर आनंद यांना गुरुवारी दिल्लीहून अटक केली आणि मुंबईत आणलं आहे. शुक्रवारी त्यांना न्यायालयासमोर सादर करण्यात आलं. विभोर आनंद यांची १९ ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

सुशांतच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांना ट्रोल आर्मी आणि बनावट सोशल मीडिया प्रोफाइलद्वारे लक्ष्य केलं जात होतं. देश-विदेशातून सरकार आणि पोलिसांविरोधात अफवा पसरवल्या जात होत्या. सुशांत प्रकरणात चुकीच्या गोष्टी लिहिल्या जात होत्या. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार या काळात ८० हजाराहून अधिक बनावट अकाऊंटस ओपन करण्यात आले होते. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सायबर सेलकडून घेतला जात आहे.
सुशांतसिंग राजपूतचा १४ जून रोजी मृत्यू झाला होता. तर त्यांची मॅनेजर राहिलेली दिशा सॅलियनचा ८ जून रोजी रात्री उशीरा मृत्यू झाला होता. त्यामुळे या दोन्ही घटनांचा संबंध जोडून सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात होत्या. सुशांतच्या मृत्यूनंतर काही दिवसानंतर सोशल मीडियावर पोलिस आणि सरकारला लक्ष्य करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.  

delhi advocate vibhor anand arrested for spreading fake theories in ssr and disha death case  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: delhi advocate vibhor anand arrested for spreading fake theories in ssr and disha death case