'व्हाईट टायगरच्या प्रदर्शनावर बंदी नाही, न्यायालयाचा नकार'

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 22 January 2021

दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी हॉलीवूडचे निर्माता जॉन हार्ट ज्युनिअर यांच्या त्या याचिकेला रद्द केले आहे ज्यात त्यांनी द व्हाईट टायगर च्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली होती.

मुंबई - जगभर वाचल्या गेलेल्या द व्हाईट टायगर या कादंबरीवर चित्रपटाची निर्मिती केली जाणार तेव्हापासून या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती. अभिनेत्री प्रियंका चोप्रा ब-याच काळानंतर चित्रपटातून दिसणार आहे. मात्र काही दिवसांपासून द व्हाईट टायगर वादाच्या भोव-यात सापडला होता. त्यातील आशय आणि दृश्ये यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होणार किंवा नाही याबाबत चर्चा केली जाऊ लागली. न्यायालयामध्ये हा वाद गेला होता.

दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी हॉलीवूडचे निर्माता जॉन हार्ट ज्युनिअर यांच्या त्या याचिकेला रद्द केले आहे ज्यात त्यांनी द व्हाईट टायगर च्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यांनी आरोप करण्याचे कारण म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून कॉपीराईटचे उल्लंघन करण्यात आले आहे असे त्यांचे म्हणणे होते. गुरुवारी सायंकाळी या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायमुर्ती सी हरि शंकर यांनी निर्मात्याच्या त्या याचिकेला रद्द केले आहे. त्यांनी दिलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, 24 तासांनंतर तो चित्रपट प्रदर्शित होईल. त्यामुळे निर्मात्यांनी न्यायालयाचा दरवाजा का ठोठावला हे समजत नाही. न्यायालयात दोन तास य़ा प्रकरणावर सुनावणी चालली. याप्रकरणात न्यायालयानं चित्रपटाचे निर्माता मुकूल देवडा आणि नेटफ्लिक्स यांनाही समन्स जाहिर केले आहेत. हा चित्रपट 22 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात प्रियंका चोप्रा आणि राजकुमार राव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अरविंद अडिगा यांच्य़ा प्रसिध्द द व्हाईट टायगर या कादंबरीवर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यात आदर्श गौरवनं या चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण केले आहे. रमीन बहरानी यांनी द व्हाईट टायगर चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

 

न्यायालयानं देवडा आणि नेटफ्लिक्सला हा चित्रपट प्रदर्शित करण्याची परवानगी दिली आहे. तसेच चित्रपटाशी संबंधित बँक खात्यातील अकाऊंटची माहिती देण्यास त्यांना बजावले आहे. जेणेकरुन यदाकदाचित याचिका करणा-यांचा आरोप खरा ठरल्यास त्यांना भरपाईची रक्कम देणे शक्य होईल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delhi court refuses to ban release of the white tiger Thursday night on Netflix