'पानिपत' की 'तानाजी', कोणती लढाई घडविणार इतिहास?

रमेश डोईफोडे
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

एवढी जोखीम घेऊन, पाण्यासारखा पैसा खर्च करून निर्माते ऐतिहासिक विषयांना हात घालण्याचे धाडस का करतात, असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. त्या विषयाचे आकर्षण, भव्य निर्मिती करण्याचे स्वप्न अशी वेगवेगळी उत्तरे त्यावर मिळतील. तथापि, त्यांचे अर्थकारण हा मुद्दा त्यात तेवढाच महत्त्वाचा असतो.

ऐतिहासिक पार्श्वभूमीवरील चित्रपटाची निर्मिती तशी जोखमीची बाब असते कारण सद्यःस्थितीत अशा बव्हंशी चित्रपटांना कोणत्या ना कोणत्या वादाला सामोरे जावे लागते. जोधा अकबर, बाजीराव मस्तानी, पद्मावत.. या सगळ्यांनाच विशिष्ट वर्गाच्या नाराजीला प्रारंभी तोंड द्यावे लागले आहे. असे चित्रपट भव्य, महाखर्चिक असतात. शे-दोनशे कोटी रुपयांची गुंतवणूक केल्यावर एखाद्या वादानंतर तो प्रदर्शित होईल किंवा नाही, अशी परिस्थिती निर्माण होते, तेव्हा त्या निर्मात्याची अवस्था काय होत असेल? तथापि, अशा संकटाला दोन हात करण्याची मानसिक तयारी ठेवून हे भव्यपट आजही जोमाने तयार केले जात आहेत. याच मालिकेत येत्या महिनाभराच्या कालावधीत दोन ऐतिहासिक शौर्यगाथा प्रदर्शित होत आहेत एक आहे - `पानिपत द ग्रेट बिट्रेयल` आणि दुसरा चित्रपट आहे `तानाजी द अनसंग वॉरियर`. दोन्हींतील ठळक साम्य म्हणजे त्यांत दाखविण्यात आलेला मराठ्यांचा पराक्रम.

 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

अजयचा शंभरावा चित्रपट 
आशुतोष गोवारीकर यांनी `पानिपत`चे दिग्दर्शन केलेले आहे. `लगान`, `स्वदेस`, `जोधा अकबर` असे बहुचर्चित चित्रपट त्यांच्या नावावर आहेत. त्यामुळे `पानिपत`विषयी प्रेक्षक निश्चितच खूप अपेक्षा बाळगून आहेत. दुसऱ्या बाजूला, `तानाजी` ही अजय देवगनची महत्त्वाकांक्षी निर्मिती आहे. अभिनेता म्हणून त्याचा हा शंभरावा चित्रपट आहे. त्याची पत्नी काजोल, सैफ अली खान अशी तगडी स्टारकास्ट आहे. ओम राऊत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. 

'तानाजी' साकारत अजय देवगणची 'फिल्मी सेंच्युरी'

तुलना अपरिहार्य
पानिपतच्या तिसऱ्या लढाईवर आधारित बेतलेल्या `पानिपत`मध्ये अर्जुन कपूरने सदाशिवराव भाऊ यांची भूमिका केली आहे. त्याच्या जोडीला संजय दत्त हा अहमदशहा अब्दालीची व्यक्तिरेखा रंगवताना दिसेल. वरील दोन्ही चित्रपटांचे ट्रेलर प्रदर्शित झाले असून, त्याआधारे त्यांची तुलनाही सुरू झाली आहे. नायक म्हणून नरवीर तानाजीच्या भूमिकेतील अजय देवगनला चाहत्यांची जास्त पसंती मिळत आहे. दोन्ही चित्रपटांच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे तर - आशुतोष गोवारीकर यांचे दिग्दर्शन, ही `पानिपत`ची मुख्य जमेची बाजू असेल, तर अजय देवगनची भूमिका हे `तानाजी`चे बलस्थान असेल. `तानाजी`चे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. प्रेक्षकांना ते तेवढे परिचित नाहीत. त्यामुळे चित्रपटाची घोडदौड प्रामुख्याने अजयच्या कामगिरीवर, लौकिकावर अवलंबून राहील, असे दिसते. 

Image

Image

स्पर्धेची शक्यता नाही
साधारणपणे एकाच विषयावरचे- पार्श्वभूमीवरचे चित्रपट एका वेळी किंवा एकापाठोपाठ प्रदर्शित झाले, तर त्याचा विपरीत परिणाम दोहोंच्याही व्यवसायावर होऊ शकतो. `पानिपत` आणि `तानाजी` हे दोन्ही चित्रपट मराठ्यांच्या लढ्यावर आधारित असल्याने त्यांच्यात स्पर्धा होईल किंवा कसे, अशी चर्चा ऐकायला मिळते. पण तशी शक्यता वाटत नाही. `पानिपत` येत्या 6 डिसेंबरला प्रेक्षकांपुढे येत आहे, तर `तानाजी` 10 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या दोन तारखांत सुमारे सव्वा महिन्याचे अंतर आहे. हल्ली कोणत्याही चित्रपटाचे भवितव्य पहिल्याच आठवड्यात किंबहुना प्रदर्शित झाल्यानंतरच्या दोन-तीन दिवसांत स्पष्ट होते. `पानिपत`ने जोरदार ओपनिंग घेतले तरी महिनाभरानंतर तो `तानाजी`शी टक्कर घेईल, अशी स्थिती निश्चित असणार नाही. त्यामुळे दोन्ही चित्रपट एकमेकांच्या आड न येता, बॉक्स ऑफिसवर आपला करिश्मा दाखवू शकतात. 

कलाकारांची तगडी फौज 'धुरळा' उडवण्यासाठी सज्ज!

वादाची परंपरा
सुरवातीला म्हटल्याप्रमाणे ऐतिहासिक विषयांवरील चित्रपट आला आणि त्याच्यावर कोणताही वाद झाला नाही, असे सहसा घडत नाही. त्याचे प्रत्यंतर आताही आले आहे. `पानिपत` चित्रपट नेमका कोणाच्या लेखनावर आधारित आहे, याचा वाद एव्हाना कोर्टात पोचला आहे. तो प्रत्यक्ष प्रदर्शित झाल्यावर ऐतिहासिक प्रसंगांच्या अनुषंगाने कोणाला काय खटकेल, याची खात्री नाही. `तानाजी`तील एका प्रसंगाविषयीही एका आक्रमक संघटनेने आपला निषेध नोंदविला आहे. अर्थात, या वादांचा परिणाम चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखांवर होण्याची शक्यता तूर्त वाटत नाही 

भन्साळींची कामगिरी
इतिहासाचा धांडोळा घेणारा चित्रपट भव्य-दिव्य कसा बनवावा, हे संजय लीला भन्साळी यांनी दाखवून दिले आहे. `बाजीराव मस्तानी`, `पद्मावत` ही त्याची ठळक उदाहरणे. या दोन्ही चित्रपटांच्या निर्मितीच्या कळा त्यांनी अक्षरशः सोसल्या आहेत. त्यांनी केलेली कथेची मांडणी अनैतिहासिक आहे, असा आरोप त्यांच्यावर काहींनी केला. कोणी धमक्या दिल्या, चित्रीकरण बंद पाडले, असे अनेक प्रकार त्यांनी सहन केले. `पद्मावत` चित्रपटाचे जे मूळ नाव होते, ते त्यांना अशाच दबावाखाली बदलावे लागले. हा चित्रपट प्रदर्शित होईल किंवा नाही, झाला तर तो विनाविघ्न थिएटरमध्ये पाहायला मिळेल का... अशी सगळीच अनिश्चिततेची परिस्थिती होती. पण भन्साळी यांनी खंबीरपणे या प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढला. 

अमोल पालेकरांची पंचवीस वर्षांनंतर रंगभूमीवर एन्ट्री

मोठे बजेट, मोठी कमाई!
ही एवढी जोखीम घेऊन, पाण्यासारखा पैसा खर्च करून निर्माते ऐतिहासिक विषयांना हात घालण्याचे धाडस का करतात, असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. त्या विषयाचे आकर्षण, भव्य निर्मिती करण्याचे स्वप्न अशी वेगवेगळी उत्तरे त्यावर मिळतील. तथापि, त्यांचे अर्थकारण हा मुद्दा त्यात तेवढाच महत्त्वाचा असतो. `बाहुबली` मालिकेतील दोन्ही चित्रपट हे काल्पनिक महिष्मती साम्राज्यातील सत्तासंघर्षावर आधारित होते. या चित्रपटांच्या भव्यतेने प्रेक्षकांना टीव्हीच्या पडद्यासमोरून थिएटरमध्ये येण्यास भाग पाडले. या दोहोंनी सुमारे 1700 कोटी रुपयांचा व्यवसाय केल्याचे सांगितले जाते. `बाजीराव मस्तानी`, `पद्मावत`, शीख वीरांच्या शौर्यावरील अक्षयकुमारचा `केसरी` आदी चित्रपटांनी शंभर कोटींच्या पटीत कमाई केली आहे. झाशीच्या राणीची कहाणी सांगणाऱ्या `मणिकर्णिका`नेही शंभर कोटींचा टप्पा पार केला होता. त्यामुळे गुंतवणूक मोठी असली, तरी परतावाही कल्पनातीत मिळू शकतो, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळेच निर्माते या विषयांकडे आकर्षित होतात.

आता लढाई `बॉक्स ऑफिस`वर
ऐतिहासिक वातावरणाची निर्मिती करण्यासाठी तत्कालीन समाजजीवन दाखविणारे भव्य सेट, कलाकारांचे पोशाख, शस्त्रे, `सैन्य` आदींवर मोठा खर्च होतो. त्यामुळे सर्वसाधारण विषयांवरील चित्रपट आणि अशा पिरियड फिल्म यांच्या बजेटमध्ये नेहमीच महदंतर असते. `पानिपत` आणि `तान्हाजी` पाहताना त्याचे प्रत्यंतर येईलच. बॉक्स ऑफिसची लढाई जिंकून तेही आपल्या यशाचा झेंडा इंडस्ट्रीत फडकावतील, अशीच त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Detail analysis of Panipat and Tanhaji movie by Ramesh Doiphode