चित्रपटसृष्टीतील सोलापूरचा ग्लॅमर चेहरा

Dipti-Dhotre
Dipti-Dhotre

सोलापूरच्या अनेक गुणी कलाकारांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाने छाप टाकली आहे. त्यात आता आणखी एक नाव समाविष्ट झाले आहे, ते म्हणजे अभिनेत्री दीप्ती धोत्रे हिचे. चित्रपटसृष्टीतील सोलापूरचा ग्लॅमर चेहरा म्हणून दीप्ती धोत्रेकडे पाहिले जात आहे. दीप्ती ही हिराचंद नेमचंद महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून तिने सलमान खानच्या ’बॉडीगार्ड’ चित्रपटासाठी असिस्टंट एडिटर म्हणून काम पाहिले आहे. दीप्तीच्या अभिनयाची सुरवात मराठी चित्रपट ‘डोंब’पासून झाली. ती आगामी ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातून रसिकांच्या भेटीला येत असून हा चित्रपट २३ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. संकलक ते अभिनेत्री आणि ‘बिझनेस वुमन’ अशा विविध भूमिका ताकदीने पार पाडणारी दीप्ती बिझनेस आणि अभिनय या दोन्हीकडे तितकेच लक्ष देते.

सोलापुरातील एका सर्वसामान्य कुटुंबातून थेट हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत झेप घेणाऱ्या दीप्तीला अगदी लहान वयापासून अभिनयाची आवड आहे. सोलापुरातील लोकसेवा हायस्कूल, हिराचंद नेमचंद महाविद्यालय आणि पुढे पुणे येथील ‘सिम्बॉयसेस’मधून शिक्षण पूर्ण करणाऱ्या दीप्तीने आतापर्यंत बालकलाकार, नाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, सूत्रसंचालन, संकलन, अभिनय असा मोठा प्रवास केला आहे.

अभिनयबरोबरच विविध निर्मिती संस्थांत प्रमुख भूमिका पार पाडणारी दीप्ती धोत्रे सध्या मराठी चित्रपटसृष्टीत सोलापूरचे नाव गाजवत आहे. दीप्तीच्या अभिनयाची सुरवात ‘डोंब’ या चित्रपटातून झाली. त्यानंतर ती हिंदी चित्रपट ‘धारा ३०२’ मध्ये प्रमुख भूमिकेत झळकली. हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित असून राजस्थानातील कुख्यात गॅंगस्टारचा जीवनपट यातून उलगडण्यात आला आहे. मुंबई चित्रपट महोत्सवात विजेता ठरलेल्या ‘सर्वनाम’ या चित्रपटात दीप्तीची प्रमुख भूमिका असून गिरीश मोहिते दिग्दर्शन आणि मंगेश देसाई यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट आहे. ‘भिरकीट’ चित्रपटात सागर कारंडे, गिरीश कुलकर्णी आणि कुशल बद्रिके यांच्यासोबत दीप्तीने काम केले असून नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मी शिवाजी पार्क’ चित्रपटातही दीप्ती एका चांगल्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आली. या चित्रपटात विक्रम गोखले, सतीश आळेकर, अशोक सराफ, शिवाजी साटम, दिलीप प्रभावळकर या दिग्गजांसह उदय टिकेकर, शरद पोंक्षे, सुहास जोशी, भारती आचरेकर, सविता मालपेकर, संतोष जुवेकर, सुशांत शेलार, दीप्ती लेले, मंजिरी फडणीस यांच्यासोबत अभिनय करण्याची संधी दीप्तीला मिळाली आहे. तसेच पारितोषिक विजेता दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांच्या ‘भोंगा’ चित्रपटात दीप्तीची प्रमुख भूमिका असणार आहे. हा चित्रपट पुणे फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवला जाणार आहे. तसेच ज्वलंत विषयावर भाष्य करणाऱ्या आणि सध्या गाजत असलेल्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातून २३ नोव्हेंबरला ती पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येत आहे.

अभिनय हा दीप्तीचा श्‍वास आहे. तिच्या म्हणण्याप्रमाणे अभिनय हा आपल्या हृदयात असतो. तो जबरदस्तीने होत नाही. जोपर्यंत अभिनयावर आपले पूर्ण लक्ष केंद्रित करून आपण ती कला आत्मसात करत नाही, तोपर्यंत आपण अभिनयाच्या शिखरापर्यंत पोचू शकत नाही. दीप्तीची अभिनयाबद्दलची ही समजच तिला इतरांपेक्षा वेगळी करते. दीप्तीच्या मते चित्रपट फक्त फेस्टिवल्ससाठी मर्यादित न राहता ते कमर्शिअल पण झाले पाहिजेत. भावनाप्रधान आणि गंभीर चित्रपटांत अभिनय करणे दीप्तीचे लक्ष्य आहे. 

फिटनेसकडे विशेष लक्ष
चित्रपटसृष्टीत तुम्हाला टिकायचे असेल आणि यशाच्या शिखरावर पोचायचे असेल तर फिटनेस ही एक महत्त्वाची गोष्टी आहे. चित्रपटसृष्टीतील प्रत्येक कलाकार आपल्या फिटनेसबाबत जागरूक असतो. दीप्तीचेही फिटनेसकडे विशेष लक्ष आहे. चित्रपटाशिवाय जीम हा तिचा आणखी एक श्‍वास आहे. ती स्वत:ला तंदुरुस्त आणि सुडोल ठेवण्यासाठी जिमनॅस्टीकचा उपयोग करते. जीममध्ये वर्कआउट करतानाचे तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. दिवाळीनिमित्त सोलापूरला आल्यानंतरही तीने वर्कआउटमध्ये खंड पडून दिला नव्हता, हे विशेष. ज्या तरुण-तरुणींना स्वतःला तंदुरुस्त ठेवायचे आहे, त्यांना दीप्तीचे फिटनेस फंडे प्रेरणादायी असेच आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com