संघर्षातूनही उभं राहण्याची ताकद कोल्हापूर..!

संघर्षातूनही उभं राहण्याची ताकद कोल्हापूर..!

शाहू दयानंद हायस्कूलमध्ये सारं शिक्षण झालं. साहजिकच जयप्रभा स्टुडिओत सततचा राबता. १९८५ ते १९९१ या काळात स्टुडिओत रोज काही ना काही शूटिंग सुरू असायचे. त्यातूनच मग चित्रपटांची आवड निर्माण झाली आणि दहावीनंतर थेट थिएटर जॉईन केले. आजवरच्या प्रवासात अनेक अडचणी आल्या; पण संघर्षातूनही ताठपणे उभं राहण्याची ताकद दिली. ती कोल्हापूरनेच...दिग्दर्शक अजय कुरणे संवाद साधत असतात आणि त्यातूनच त्यांचा सारा प्रवास उलगडत जातो. 

थिएटर जॉईन केल्यानंतर अजय यांनी अनेक नाटके, एकांकिका, स्पर्धा केल्या. कामाची गरज म्हणून स्थानिक न्यूज चॅनेल जॉईन केले. सहा वर्षे इथं काम केले. अगदी अँकरिंगपासून ते एडिटिंगपर्यंत सगळे काही ‘वन मॅन शो’. एका स्टुडिओत स्वतंत्रपणे एडिटिंगचे कामही केले. त्यानंतर मग प्रसिद्ध कॅमेरामन नंदू पाटील, इम्तियाज बारगीर यांच्याकडे असिस्टंट कॅमेरामन म्हणून प्रवास सुरू झाला.

‘अरे देवा’, ‘मन्या सज्जना’, ‘संघर्ष’, ‘सावर रे’ आदी बाराहून अधिक चित्रपट केले. काही हिंदी मालिकांसाठीही असिस्टंट कॅमेरामन म्हणून काम केले. काही चॅनेल्ससाठी लोकल कॅमेरामन म्हणूनही काम केले. त्यानंतर दिग्दर्शनात आलो आणि ‘क्राईम डायरी’, ‘पंचनामा’, ‘लक्ष्य’, ‘गंध फुलांचा सांगून गेला’, ‘जयोस्तुते’ आदी मालिकांचं दिग्दर्शन केले. ‘तुझ्यात जीव रंगला’, ‘न कळत सारे घडले’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकांतील काही भागांचं दिग्दर्शनही केले आणि आता ‘जुळता जुळता जुळतंय की’ या मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 

तीन वर्षांपूर्वी दिग्दर्शित केलेल्या ‘बलुतं’ या शॉर्टफिल्मनं राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक बक्षिसांची लयलूट केली. ‘याकूब’ ही शॉर्टफिल्मही रसिकांना भुरळ घालणारी ठरली. या साऱ्या प्रवासात कॅमेरामन व दिग्दर्शनासाठी विविध पुरस्कारांसाठी नामांकनंही मिळाली. अजय सांगतात, ‘‘हा सारा प्रवास सुरूच आहे. भविष्यात आणखी बरेच काही करीन; पण आता नवी पिढी जोमानं पुन्हा या क्षेत्रात येते आहे. त्यांची एकत्रित मोट बांधून आम्ही विविध चित्रपटविषयक उपक्रमांवर भर दिला आहे. कारण हीच पिढी पुढे जाऊन चित्रपंढरी कोल्हापूर ही ओळख पुन्हा नव्याने प्रस्थापित करणार आहेत.’’  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com