Movie review - जिंदगी के सफर में हर एक को खेलना पडता है 'लुडो'

युगंधर ताजणे
Tuesday, 17 November 2020

'लुडो' मध्ये म्हटलं तर चार वेगवेगळ्या कथा आहेत. त्याकडे आणखी वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्यास ती प्रत्येकाला आपल्याबाबतही थोड्याफार फरकानं असेच घडते असे वाटायला लागेल. केवळ चार नव्हे तर त्याच्याशी जोडल्या गेलेल्य़ा इतर व्यक्तींच्या संघर्षाविषयी 'लुडो' खूप काही सांगून जातो.

मुंबई - आयुष्य जितकं सोपं वाटतं तितकं ते नाही. आणि मनाने ते फार भरभरुन जगायचे ठरवल्यास फारसं अवघडही नाही. मात्र दरवेळी जर तर च्या कात्रीत ते सापडल्याने गोंधळाला सुरुवात होते.

आपलं असणं आपल्या लोकांसाठी नाही तर इतर व्यक्तींच्या फायद्याचे आहे हे तुम्हाला कुणी एखाद्या ज्योतिषाने सांगितल्यास त्यावर तुम्ही चटकन विश्वास ठेवणार नाही. त्याचा अनुभव ज्याचा त्याला घ्यावा लागतो. तो येतो फक्त त्याकडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे. प्रसिध्द दिग्दर्शक अनुराग बसु यांचा दिवाळीतील नवाकोरा चित्रपट 'लुडो' हा अशाच प्रकारच्या कडू मात्र गोड तत्वज्ञानावर मार्मिक भाष्य करतो.

'लुडो' मध्ये म्हटलं तर चार वेगवेगळ्या कथा आहेत. त्याकडे आणखी वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्यास ती प्रत्येकाला आपल्याबाबतही थोड्याफार फरकानं असेच घडते असे वाटायला लागेल. केवळ चार नव्हे तर त्याच्याशी जोडल्या गेलेल्य़ा इतर व्यक्तींच्या संघर्षाविषयी 'लुडो' खूप काही सांगून जातो. या चित्रपटात दाखविण्यात आलेल्या त्या चार व्यक्तींच्या आयुष्यात येणा-या अडचणी जरी काही काळ अनाकलनीय वाटत असल्या तरी नियती त्यांना ते करण्यास कशाप्रकारे भाग पाडते हे प्रेक्षकांच्या मनावर ठसविण्यात अनुराग बसु यशस्वी झाले आहेत.

 

'लुडो' च्या खेळात चार पट आहेत. प्रत्येक पटात आणखी चार जागा आहेत. तसेच चित्रपटात चार प्रमुख व्यक्तिरेखा त्या प्रत्येकाशी जोडल्या गेलेल्या आणखी व्यक्ती यांच्या आयुष्यातील गंमतीशीर खेळ प्रेक्षकांना या चित्रपटातून पाहता येणार आहे. चित्रपटाचे वैशिष्ट्य असे की एवढ्या गुंतागुंतीच्या कथानकात दिग्दर्शकाने कुठेही रटाळपणा येणार नाही याची काळजी घेतली आहे. कुणीही कितीही आदळाआपट केली, आकांडतांडव केलं तरी त्याला सरतेशेवटी आपल्या 'होम' कडे परतायचं असतं. हे दर्शकाच्या मनावर प्रभावीपणे ठसविण्यासाठी अनुरागने विनोदाचा आधार घेतला आहे.

असं म्हटलं जातं की, आयुष्यातलं जीवघेणं सत्य सांगण्यासाठी विनोदाचा आधार घ्यावा लागतो. 'लुडो' पाहिला की त्याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. कुख्यात गुंड सत्तू भाई (पंकज त्रिपाठी), अभिषेक बच्चन (बटुकेश्वर अर्थात बिटू तिवारी), आदित्य रॉय कपूर (आकाश चौहान),  सान्या मल्होत्रा (श्रृती चौक्सी), राजकुमार राव (अलोक कुमार गुप्ता) आणि फातिमा साना शेख (पिंकी) या प्रत्येकाच्या आयुष्याचा लुडो आपल्याला हसवतो, भावनिक करतो आणि विचार करायला भागही पाडतो. कथा सांगुन चित्रपट पाहण्याचा आनंद हिरावून घेण्यापेक्षा प्रेक्षकांनी लुडो चा आनंद घ्यावा.

Anurag Basu directorial Ludo's first poster out | Bollywood News – India TV

सर्व कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. मात्र राजकुमार राव आणि पंकज त्रिपाठी यांच्या भूमिका लक्षात राहणा-या आहेत. राजकुमार रावचा लुक त्याचा अनोखा अंदाज हे सारं एकदम भन्नाट आहे. अनुराग बसू, भूषण कुमार, दिव्या खोसला कुमार, क्रिष्णन कुमार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यातील छायाचित्रण, संकलन आणि प्रीतम यांचे संगीत जमेच्या बाजू म्हणता येतील.

दिग्दर्शक अनुराग बसूने  स्वतः या चित्रपटात भूमिका केली आहे.  लहान मुलांच्या खेळावर आधारीत असलेला मोठ्य़ांनी आवर्जुन पाहावा असा आहे. सत्य जीवघेणं असतं हे साधं सोपं जीवनातलं सार पचवायला मोठी ताकद लागते. हे एकप्रकारे 'डार्क कॉमेडी' तून समजावून सांगण्याचा अनुराग बसु यांचा प्रयत्न कौतूकास्पद आहे. 

 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Director Anurag basu new movie Ludo comment on human philosophy