अमेरिकेत साकारला मराठी सिनेमा..!

अमेरिकेत साकारला मराठी सिनेमा..!

कोल्हापूर - अमेरिकेतील कलाकारांनी ‘डीएनए’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली असून, तो अमेरिकेतील न्यूजर्सी, कॅलिफोर्निया येथील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला आहे. सिनेमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, कोल्हापूरच्या गौतम पंगू आणि आशय जावडेकर याची कथा व पटकथा आहे. आशय मूळचा सांगलीचा आहे. चित्रपटाची संकल्पनाही गौतमचीच आहे.   

दरम्यान, गौतम महालक्ष्मी धर्मशाळेच्या परिसरातील पंगूवाड्यात लहानाचा मोठा झाला. विद्यापीठ हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण आणि त्यानंतर विवेकानंद महाविद्यालयात त्याचे शिक्षण झाले. १९९६ मध्ये बारावी परीक्षेत गौतमने कोल्हापूर विभागात प्रथम, तर राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला. अमेरिकेत ‘केमिकल इंजिनिअरिंग’मध्ये ‘पीएच.डी.’ मिळविल्यानंतर आता तेथेच फार्मास्युटीकल सायंटिस्ट म्हणून कार्यरत आहे. मॉन्थन जंक्‍शन- न्यू जर्सी येथे तो स्थायिक आहे. प्रिंट आणि डिजिटल माध्यमातून त्याने विविध प्रकारचे विपुल लेखनही केले आहे. त्याच्या कथाकथनाचे ऑडिओ व व्हिडिओ ‘यूट्यूब’वर चांगलेच गाजले आहेत. 

‘डीएनए’ हा सिनेमा तरुण पिढीच्या जीवनाशी विविध अंगांनी प्रेक्षकांशी संवाद साधतो. चित्रपटाचा टिझर गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला आणि जगभरातील पाच लाखांहून अधिक नेटीझन्सनी तो पाहिला. काल चित्रपट प्रदर्शित झाला आणि चित्रपटालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. 

आशय जावडेकर यांचेच दिग्दर्शन आहे. नॉट जस्ट एंटरटेन्मेंट फिल्म, सेव्हनस्टार प्रॉडक्‍शन्स, सावली एंटरटेन्मेंट, अलका व प्रकाश लोथे यांची निर्मिती असून, प्राजक्ता करंदीकर, ऋषीकेश साने, मकरंद भावे, दीपा लिमये, जुई भानगावकर, उन्नी रवींद्रनाथन, रोहन आगाशे, मानसी जोशी-बेडेकर, अक्षय अणावकर, मैत्रेयी साने यांच्या टीमने हा चित्रपट साकारला आहे. त्यांना अमेरिकेतील कलाकार व तंत्रज्ञांचेही तितकेच सहकार्य मिळाले. 

लोकल टू ग्लोबल..!
कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर कॅन्सर सेंटर, वरणगे-पाडळी, कोल्हापुरातील तलाव, कावळा नाका येथील मेरी वॉन्लेस हॉस्पिटल, जुना राजवाडा पोलिस ठाणे... अशा विविध कोल्हापुरी लोकेशन्सनी नुकतीच अमेरिकेला भुरळ घातली. येथे चित्रीत झालेला ‘रिमेंबर ॲम्नेसिया’ हा चित्रपट १४ जूनपासून अमेरिकेतील ६० ठिकाणी प्रदर्शित झाला. या चित्रपटालाही मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता कोल्हापूरच्याच गौतमची कथा, पटकथा असलेला आणि अमेरिकेतील कलाकारांनी साकारलेला ‘डीएनए’ या मराठी चित्रपटालाही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com