नाटकाचा इव्हेंट करावा लागेल - डॉ. मोहन आगाशे

नाटकाचा इव्हेंट करावा लागेल - डॉ. मोहन आगाशे

सांगली - माणूस आभासी जगात गुंतला आहे. अशा काळात जिवंतपणाचा रसरशीत अनुभव देणारी नाट्यकला किती काळ तग धरेल याबद्दल मी साशंक आहे. आजकाल इव्हेंट असेल तर गर्दी होते. त्यामुळे यापुढे नाटकांचाही इव्हेंट करावा लागेल. तरुण पिढीला नाटकाकडे खेचण्यासाठी आपल्याला अशा काही क्‍लृप्त्या लढवाव्या लागतील, असे मत ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केले. ५३ व्या विष्णुदास भावे गौरव पदकाने आज रंगभूमी दिनी त्यांचा गौरव झाला. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांच्या हस्ते पदक प्रदान समारंभ झाला. 

व्यवसायाने मानसोपचार तज्ज्ञ असलेल्या डॉ. आगाशे यांनी एका डॉक्‍टरच्या शैलीतच आजच्या मराठी नाट्यविश्‍वाची चिकित्सा केली. ते म्हणाले, ‘‘आज आपण आभासी जगाच्या आहारी गेलो आहोत. खरंच नाटकही व्हर्च्युअलच. आपल्या खऱ्या जगण्यावर आभासी जगाचे इतके अतिक्रमण झाले आहे की माणूस डोळ्यांनी पाहण्याऐवजी मोबाईल कॅमेऱ्यानेच सारे काही पाहतोय की काय असे वाटू लागले आहे. समोर रस्त्यावर खरोखरची मोसंबी दिसत असूनही आज डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये जाऊन मोसंबी ज्युसच्या पाकिटाला पसंती दिली जाते.

हे अगदी सहज होऊन जाते. तेच नाटकाबाबत होतेय. डार्विनच्या सिद्धांतानुसार माकडापासून माणूस झाला. आता माणसांपासून त्याचे काय होणार हे माहीत नाही. तेव्हांचा तो माणूस म्हणेल की पूर्वी माणूस नाटक करायचा. ही कला हळूहळू अस्तंगत होत चालली आहे. आज नाटकाचे प्रयोग पुण्या-मुंबईच्या पलीकडे होत नाहीत. आज नाटक पोहोचवण्यातील अडचणी मोठ्या आहेत. त्यावर मात करून नाटक पोहोचवण्यासाठी उपाय शोधावे लागतील. इव्हेंटला गर्दी होते. नाटकांचाही इव्हेंट करावा लागेल. नाटक प्रेक्षकांशिवाय होत नाही आणि प्रत्यक्ष माणसे एकत्र असली तरी ती दुसऱ्या जगात पोहोचलेली असतात. अशा काळात नाटक टिकवणे आव्हान असेल.’’ 

संयोजक अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी स्वागत केले. शुभांगी दामले यांनी डॉ. आगाशे यांचा परिचय करून दिला. नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्यासह समितीचे सर्व पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. विविध संस्थांच्यावतीने डॉ. आगाशे यांचा सत्कार झाला. दरम्यान, सकाळच्या सत्रात डॉ. आगाशे यांच्या हस्ते नटराज पूजन झाले. त्यानंतर नाट्यगीतांची मैफल झाली. 

या वेळी परिषदेचे शाखाध्यक्ष मुकुंद पटवर्धन, नाट्य अभिनेते राजन भिसे उपस्थित होते. स्नेहल पुराणिक, तन्वी केळकर, चिन्मयी गोखले, रोहित गुळवणी, मिताली जोशी, नूपुर देसाई, शर्वरी केळकर, अनुष्का पाटील, मृणाल बर्वे, सरिता मद्रासी, केतकी परांजपे, आर्या खाडिलकर, कोमल कुलकर्णी यांनी नाट्यपदे गायली. त्याला रसिकांचा प्रतिसाद मिळाला. सायंकाळच्या कार्यक्रमातही त्यांनी नांदी गायली.

आगाशेंची कृतज्ञता 
पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना डॉ. मोहन आगाशे म्हणाले, ‘‘मॅट्रिकला मी वडिलांकडे सायकलसाठी हट्ट धरला होता. वडिलांनी चार महिने आधीच घराच्या दारात सायकल आणून लावली आणि म्हणाले, ‘‘बघ मी माझा शब्द पूर्ण केलाय. आता परीक्षेची तुझी जबाबदारी. आज हा पुरस्कार स्वीकारताना वडिलांची मला आठवण येतेय. त्यांच्याप्रमाणेच मला माझी पात्रता नसतानाही तुम्ही हा पुरस्कार दिला आहे. आता पुरस्काराला पात्र ठरणारी कामगिरी मला करायची आहे. यापुढे ती करेन.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com