चित्रपटावर बहिष्कार नेमका कशासाठी ?

विनोद थोरात, जुन्नर
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016

पाकिस्तानी कलाकारांची भूमिका असलेले "ए दिल मुश्‍किल‘ आणि "रईस‘ हे चित्रपट प्रदर्शित करावेत की, नाही यावरून सध्या समाजात बराच वादंग सुरू आहे. प्रियांका चोप्रा, परेश रावल, महेश भट्ट यांच्यासह चित्रपट सृष्टीतील अनेक लोक चित्रपट प्रदर्शित होऊ द्यावा या मताचे असले तरी मनसेने मात्र चित्रपट प्रदर्शित करून दाखवाच अशी उघड धमकी दिली आहे.

पाकिस्तानी कलाकारांची भूमिका असलेले "ए दिल मुश्‍किल‘ आणि "रईस‘ हे चित्रपट प्रदर्शित करावेत की, नाही यावरून सध्या समाजात बराच वादंग सुरू आहे. प्रियांका चोप्रा, परेश रावल, महेश भट्ट यांच्यासह चित्रपट सृष्टीतील अनेक लोक चित्रपट प्रदर्शित होऊ द्यावा या मताचे असले तरी मनसेने मात्र चित्रपट प्रदर्शित करून दाखवाच अशी उघड धमकी दिली आहे.

अनुराग कश्‍यपने तर थेट पंतप्रधानांना प्रश्न विचारून अनेक लोकांचा रोष ओढवून घेतला आहे. अनुरागने विचारलेला प्रश्न मात्र सडेतोड आहे. ज्या वेळी चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होते त्यावेळी भारत आणि पाकिस्तान यांमधील संबंध इतके बिघडलेले नव्हते. त्यावेळी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील पाकिस्तान बरोबर शांततेचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील होते. मग आता चित्रपटावर बंदी आणा असे लोक म्हणत असतील तर पंतप्रधानांच्या त्या भेटीचं काय?
केवळ एक पाकिस्तानी कलाकार चित्रपटामध्ये आहे म्हणून त्यावर बंदी आणली तर बाकी हजार भारतीय लोक ज्यांनी चित्रपट तयार होण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे त्यांचं काय? या सगळ्यामध्ये त्यांचा काय दोष?

काही लोक असा मुद्दा मांडतात की, पाकिस्तानी कलाकार आपल्या देशातून पैसा घेऊन जाऊन त्यांच्या देशात कर भरतात आणि तोच पैसा पाकिस्तान दहशतवादी कारवायांसाठी वापरते. हे सत्य जरी असले तरी कलाकारांद्वारे जितका पैसा पाकिस्तानला जातो त्यापेक्षा कितीतरी अधिक पट पैसा व्यापार आणि अन्य मार्गानी पाकिस्तानला जातो. चित्रपटावर बंदी आणली तर या अन्य मार्गाचं काय? त्यावरदेखील बंदीची कशी अंमलबजावणी करणार?

आणखी एक मुद्दा असा मांडला जातो की, काय निर्मात्यांना भारतीय कलाकार मिळत नाहीत का? म्हणून ते पाकिस्तानमधून कलाकार आयात करतात? हाच न्याय काय तुम्ही जगात सर्वत्र काम करणाऱ्या लाखो भारतीय संगणक अभियंत्यांना लावू शकाल की, त्या त्या देशांमध्ये काय गुणवत्तेची कमतरता आहे म्हणून ते भारतातून लोक आयात करतात? हाच न्याय तुम्ही हॉलिवूड मध्ये काम करणाऱ्या प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण, इरफान खान यांना लावू शकाल? कला आणि गुणवत्ता यांना कोणतीही सीमा नसते हे आपण ध्यानात घ्यायला हवे.

पाकिस्तानमध्ये सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, शाहरुख खानसारखे अनेक जण तितकेच लोकप्रिय आहेत जितके भारतामध्ये. भारतातदेखील नेहमीच पाकिस्तानी कलाकार व गायकांना प्रेम मिळत आले आहे. नुसरत फतेह अली खान, गुलाम अली ते अगदी राहत फतेह अली खान, आतिफ अस्लम यांच्या पर्यंत ही परंपरा चालत आली आहे. या सर्वांची गाणी ऐकणे आपण बंद करणार आहोत का? आपल्या सर्वांचे आवडते गीत "सारे जहॉं से अच्छा हिंदुस्थान हमारा‘चे कवी मोहंम्मद इकबाल पाकिस्तान चळवळीचे अग्रणी मानले जातात. मग हे गीत म्हणणे देखील आपण सोडून देणार का?

हे चित्रपट प्रदर्शित झाले तर तो भारतीय जवानांचा अपमान होईल असेही काही लोक म्हणतात. परंतु आपले जवान असा विचार करतील असे मला वाटत नाही. बाकी सर्व लोकांपेक्षा देशहित त्यांना अधिक चांगले कळते. कला आणि राजकारण यातील फरक त्यांना नक्कीच कळतो. देशातील सर्व नागरिक त्यांच्या बरोबर आहेत हे त्यांना वेगळे सांगायची गरज नाही असे मला वाटते. संपूर्ण देश नेहमीच भारतीय सैन्याच्या पाठीशी उभा आहे आणि भविष्यातही नक्कीच राहील.

सरकारची यातील भूमिका मात्र नक्कीच संदिग्ध आहे. सरकारने चित्रपटावर अधिकृत बहिष्कार घातलेला नसला तरी चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही म्हणून सरकारला उघड आव्हान देणाऱ्या मनसेविरुद्ध काय कारवाई करणार हे अजून स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे राज्य, सरकारचे की झुंडशाहीचे याबद्दल लोकांच्या मनात शंका उत्पन्न होणे साहजिक आहे. अनेक लोक पाकिस्तान याबाबतीत कसा वागतो आणि त्यांनी आपल्या चित्रपटांवर कशी बंदी घातली आहे याचे दाखले देतात.
परंतु पाकिस्तानने जे केले तेच आपण केले तर आपल्यात न त्यांच्यात फरक तो कोणता. भारताचा देखील पाकिस्तान व्हावा अशी या लोकांची इच्छा आहे का? भारतातील प्रत्येक नागरिकाचे आपल्या देशावर सारखेच प्रेम आहे. पण आजकाल काही लोकांना आम्हीच कसे देशभक्त आहोत हे दाखवण्याची खुमखुमी चढली आहे. देशभक्ती दाखवण्यासाठी भरीव काहीतरी करावे हे मात्र त्यांना नको आहे. केवळ झटपट प्रसिद्धी कशी मिळेल याकडेच त्यांचा ओढा अधिक आहे.

सर्वसमावेशक लोकशाही आणि सर्व धर्मसमभाव हीच भारताची जगातील ओळख आहे. ‘वसुधैव कुटुंबकम‘ ही आपली हजारो वर्षांची परंपरा आहे. या कठीण परिस्थितीमध्ये ती मोडता कामा नये. पाकिस्तानबरोबर बिघडलेले संबंध आणि तीव्र लोकभावना लक्षात घेता नजीकच्या काळात तरी कोणताही निर्माता पाकिस्तानी कलाकाराला आपल्या चित्रपटात स्थान देणार नाही याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. परंतु आधीच पूर्ण झालेल्या या दोन चित्रपटाशी संबंधित भारतीयांचे हित लक्षात घेऊन ते विनासायास प्रदर्शित होऊ देणेच इष्ट ठरेल.
 

Web Title: Due to the boycott of the film, how?