'बुक माय शो'वर 'एका लग्नाची पुढची गोष्ट' टॉप ट्रेंडींग

मंगळवार, 4 डिसेंबर 2018

विशेष म्हणजे 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकाने 'बुक माय शो' या ऑनलाईन तिकीट बुकींग संकेतस्थळावर मराठीचा झेंडा फडकावला आहे.

पुणे : 'एका लग्नाची गोष्ट' या अजरामर नाटकाने दोन दशकं गाजवली. मराठी प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच पुन्हा एकदा अभिनेते प्रशांत दामले व अभिनेत्री कविता लाड-मेढेकर घेऊन आले आहेत 'एका लग्नाची पुढची गोष्ट'. 17 नोव्हेंबरला या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईतील शिवाजी मंदिरात झाला. या नाटकाला कमी कालावधीतच तुफान यश मिळत आहे. विशेष म्हणजे या नाटकाने 'बुक माय शो' या ऑनलाईन तिकीट बुकींग संकेतस्थळावर मराठीचा झेंडा फडकावला आहे. हे नाटक 'ट्रेंडिंग सर्च'मध्ये सर्वप्रथम आले आहे. नुकत्याच आलेल्या हिंदी चित्रपटांनाही मागे टाकत '...पुढची गोष्ट' टॉप सर्च ट्रेंडींगमध्ये आले आहे. 

Eka Lagnachi Pudhchi Goshta

'एका लग्नाची गोष्ट'मध्ये मन्या-मनीची प्रेमकहाणी, त्यांच्या लग्नाच्या गमती-जमती दाखवण्यात आल्या होत्या. आता त्यांच्या लग्नाला इतकी वर्षं उलटल्यानंतर त्या दोघांमधील पुढची गोष्ट ही 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकात दाखवण्यात आली आहे. '...पुढची गोष्ट'चे लेखन, दिग्दर्शन अद्वैत दादरकर यांनी केले असून, नाटकाची निर्मिती प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन आणि गौरी थिएटर्स व सरगम प्रकाशित आहे. 

गेल्या काही वर्षांपासून हिंदी-मराठी चित्रपटांचे सिक्वेल मोठ्या प्रमाणात येत होते. पण मराठी नाटकाचा सिक्वेल हा यापूर्वी कधी आला नव्हता. त्यामुळे पहिल्या सिक्वेलचा मानही 'एका लग्नाची पुढची गोष्ट'लाच मिळतो. 

''बुक माय शोवर संपूर्ण भारतातील वेगवेगळ्या भाषांमधील नाटक, सिनेमे उपलब्ध असतात. या सर्वांमध्ये मराठी नाटकाने सर्वप्रथम यावं हे खरंच खूप थ्रिलिंग आहे. मराठी प्रेक्षकांना घरबसल्या नाटकाचे तिकीट काढता यावे यासाठी बुक माय शोचा फंडा अवलंबला गेला. आता एका लग्नाची पुढची गोष्ट हे मराठी नाटक बुक माय शोच्या टॉप सर्च ट्रेंडींगमध्ये आल्याने ही बाब अभिमानास्पद आहे. नाटकाला उत्तम प्रतिसाद आहे. तसेच नाटकाचा पंचविसावा प्रयोग हा औरंगाबादला होणार आहे.''
- प्रशांत दामले, अभिनेते 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eka Lagnachi Pudhchi Goshta Trending in Top search on Book My Show