आता बॉलिवूडमध्ये 'एंट्री'

actress raai laxmi
actress raai laxmi

अभिनयात सोप्या पद्धतीनं आले असले तरी चार वर्षं संघर्ष करावा लागला. कारण, आमच्या कुटुंबातील कोणीही या क्षेत्रात नव्हतं. त्यामुळे चांगलं काय अन्‌ वाईट काय, याची पारख करणं मला अवघड जात होतं. त्यानंतर एका तमीळ चित्रपटात मला मोठा ब्रेक मिळाला. आता "ज्यूली 2'च्या निमित्ताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं असून, आगामी काळात मराठीतही अभिनय करणार आहे.

मी मूळची बेळगावची. माझ्या वडिलांचा मेटल कास्टिंगचा व्यवसाय असून, आई गृहिणी आहे. मला दोन मोठ्या बहिणी आहेत. शाळेत शिकत असतानाच मी विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत असे. त्यामुळे लहान वयातच मला अभिनयाची गोडी लागली; मात्र शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं. मला चित्रपटांमध्ये संधी मिळत होती आणि ती माझी आवडही होती. परिणामी, चित्रीकरणासाठी खूप सुट्या घ्याव्या लागत होत्या. त्यामुळे शिक्षकांची खूप बोलणी खावी लागली. मात्र, आई-वडिलांनी मला पाठिंबा दिला. मी उच्चशिक्षण बहिःस्थपणे पूर्ण केलं.

मला अभिनय क्षेत्रात चौदाव्या वर्षीच संधी मिळाली. 2005 मध्ये मी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यापूर्वी मी मॉडेलिंग केलं. "मिस कर्नाटक' स्पर्धेत विजेती झाले आणि त्यानंतर मला अनेक चित्रपटांमध्ये संधी येऊ लागल्या. आतापर्यंत मी कन्नड, मल्याळम, तेलुगू या भाषांत अभिनय केला आहे. आता "ज्यूली- 2' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. चौदाव्या वर्षी मॉडेलिंग केले, पंधराव्या वर्षी चित्रपटांमध्ये आले. गेल्या दहा वर्षांमध्ये मी जवळपास 58 चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. आगामी काळात मला कोणत्याही भाषेत अभिनय करायला आवडेल. "भारतीय चित्रपटसृष्टी' हेच माझं ध्येय आहे. तमीळ वा इतर भाषांत काम करताना फक्त भाषेचा फरक पडतो. मात्र, अभिनय हा सर्वत्र एकाच स्वरूपाचा असतो, फक्त पॅटर्न बदललेला असतो. त्यामुळे अभिनयाला मी सीमा घातलेली नाही. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अभिनय करताना मला तेथील भाषा शिकाव्या लागल्या, त्यासाठी इंटरनेट व पुस्तकांचा आधार घेतला. मी आता सात- आठ भाषांमध्ये सहज संवाद साधू शकते.

अभिनयात अतिशय सोप्या पद्धतीनं आले असले तरी चार वर्षं मला खूप संघर्ष करावा लागला. आमच्या कुटुंबातील कोणीही या क्षेत्रात नव्हतं. त्यामुळे चांगलं काय अन्‌ वाईट काय, याची पारख करणं अवघड जात होतं. हे समजण्यासाठी तीन- चार वर्षं गेली. चित्रपट कसा बनतो, याचा अंदाज यायलाही उशीर लागला. कारण, त्या वेळी माझं वय खूप कमी होतं. दिग्दर्शक आर. बी. इंदूईकर यांनी मला "कर्क कसदर' या तमीळ चित्रपटाच्या माध्यमातून मोठा ब्रेक दिला, हाच माझ्या अभिनयाच्या करिअरमधील "टर्निंग पॉइंट' ठरला.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी खूप मोठी आहे. तेथील टॅलेंट बॉलिवूडमध्ये दिसून येतं. तसंच, प्रत्येक अभिनेत्रीचं स्वप्न असतं, की आपणही बॉलिवूडमध्ये जावं. तसंच माझंही होतं. मी बॉलिवूडमध्ये आले आणि आणखी एका भाषेला गवसणी घातली. ज्या वेळी "ज्यूली- 2' चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं, त्या वेळी मला दोन मराठी चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी चालून आली होती. बेळगावची असल्यानं मला मराठी बऱ्यापैकी बोलता येतं. त्या चित्रपटांची स्क्रिप्टही मला आवडली. मात्र, चित्रीकरणाच्या तारखांचं गणित जुळलं नाही. भविष्यात मी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नक्कीच येणार आहे.

मी स्वतः कलाकार आहे, त्यामुळे मी साकारलेली प्रत्येक भूमिका माझ्यासाठी महत्त्वाचीच आहे. प्रत्येक भूमिकेसाठी मी जीव ओतून काम केलं आहे. मग, ती नायिका असो की खलनायिका. एकाच प्रकारच्या भूमिका साकारल्या तर त्याला प्रेक्षकही नंतर दाद देत नाहीत. मात्र, दाक्षिणात्य "धामधूम' व "ज्यूली- 2' या चित्रपटांतील भूमिका माझ्यासाठी अविस्मरणीय आहेत.

बॉलिवूडमध्ये एखादं वेगळं गाणं आलं, की त्याला "आयटम सॉंग' म्हटलं जातं. मात्र, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत "आयटम सॉंग' म्हटलं, की त्या चित्रपटाला "ए' सर्टिफिकेट दिलं जातं. कारण, तेथील सेन्सॉर सर्टिफिकेटची व्याख्या वेगळी आहे. मी तेथे "स्पेशल सॉंग' केली आहेत. चिरंजीवीच्या "खिलाडी नंबर 150' चित्रपटातील "रतालू- रतालू' हे स्पेशल सॉंग खूप हिट झालं. तसंच, "गब्बरसिंग'मधील गाण्याला भरभरून प्रतिसाद मिळाला.

यापूर्वी नेहा धुपियाचा, त्यापूर्वीचाही एक जुना "ज्यूली' नावाचा चित्रपट होता. त्यातही लक्ष्मी नावाचीच अभिनेत्री होती अन्‌ "ज्यूली- 2'मध्येही लक्ष्मी आहे. मात्र, ती पूर्णपणे वेगळी आहे. ती एक साधीसुधी मुलगी असते. वेगळं काहीतरी करावं, असं तिचं स्वप्न असतं. ती चित्रपटसृष्टीत आपलं नशीब आजमाविण्यास येते. मात्र, तेथे तिला खूपच संघर्ष करावा लागतो. वेगवेगळ्या तऱ्हेचे लोक तिला भेटतात. येणारी परिस्थिती ती कशा प्रकारे हाताळते, यावर या चित्रपटात प्रकाशझोत टाकला आहे. या ज्यूलीसारखीच काही प्रमाणात मीही आहे. मलाही अभिनयात येताना संघर्ष करावा लागला. आताच्या युगातील मुली "स्ट्रॉंग' होऊ पाहत आहेत. त्यामुळे त्या बिनधास्तपणे बोलतात. मीही ज्यूलीप्रमाणे बोल्ड आहे. तिच्याच प्रमाणे ब्यूटिफुल आहे. त्यामुळे हा चित्रपट माझ्या आयुष्याशी जवळचा असल्याचं मला वाटतं.
(शब्दांकन : अरुण सुर्वे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com