अभिनेत्रींचा योगा योग

अभिनेत्रींचा योगा योग

आपल्या शूटिंगच्या शेड्युलमधून बॉलीवूड अभिनेत्री आपला फिटनेस राखतात तरी कसा, असा प्रश्‍न सर्वांनाच पडतो. तर याचं उत्तर आहे योग. आपल्या फिटनेसविषयी जागरूक असणाऱ्या काही बॉलीवूड अभिनेत्रींनी योगविद्येची वाट चोखाळली आहे आणि त्या दिवसेंदिवस तरुण आणि अधिक सुंदर दिसतायत. त्यांना कळलंय की योग हा फक्त शारीरिक स्वास्थ्यासाठी नाही, तर मानसिक स्वास्थ्यासाठीही खूप महत्त्वाचा आहे. योगप्रकार शिकणं, ते आत्मसात करणं यासाठी काही खास वेळ द्यावा लागतो. ती पटकन होणारी गोष्ट नाही. बॉलीवूड अभिनेत्री हा योगायोग कसा साधतात?
 

करिना कपूरसाठी फिटनेस खूप महत्त्वाचा आहे. हे तर आपल्याला माहिती आहेच. करिना कपूर दर तीन तासांनी योग्य प्रमाणात आहार घेते.

वर्कआऊट आणि योगासनं करण्यावर भर देते. चालणं, धावणं, पोहणं याचबरोबर ती प्राणायाम, बिक्रम योग आणि सूर्यनमस्कार करते. तणावावर मात करण्यासाठी कपालभाती, विरभद्रासन आणि पर्वतासन पायांच्या मजबूतीसाठी करते. त्याचबरोबर भुजंगासन आणि नौकासन अशी योगासनं करून करिना स्वतःला उत्साही आणि तंदुरुस्त ठेवते. दिवसातून दोन तास ती योगासनं करते.

वयाच्या चाळीशीनंतरही फिट ॲण्ड स्लिम दिसणारी अभिनेत्री शिल्पा शेट्‌टी योग आणि डाएटला प्राधान्य देते. आपलं वजन आटोक्‍यात ठेवण्यासाठी शिस्त हवी. ही शिस्त योगसाधनेमुळे शक्‍य होते. वजन कमी करण्यासाठीच नव्हे तर मानसिक संतुलन नीट राखण्यासाठी योगविद्या आवश्‍यक आहे, असं शिल्पा सांगते.

फिटनेस दिवा मलायका अरोरासुद्धा योगासनं करण्यावर भर देते. एरियल योग आणि योगासनांचे इतर प्रकार मलायका नियमित करते. योगविषयक अधिकाधिक माहिती जाणून घ्यायला ती उत्सुक असते. ती म्हणते योगासनांमुळे शरीर सुडौल राहतं. त्याचबरोबर तिने जंक फूड खाणं कायमचं बंद केलं आहे. फॅशनिस्टा सोनम कपूरने तर प्रसिद्ध योग प्रशिक्षक भरत ठाकूर यांच्याकडून पॉवर योगाचं प्रशिक्षण घेतलंय अशी चर्चा होती. ती बिक्रम चौधरी यांचा कॉपीराईट असलेला बिक्रम योगाही फॉलो करतेय, असंही सांगितलं जात होतं. ती बहुधा हे दोन्ही प्रकार करते. त्याचबरोबर तिने काही नृत्यप्रकार आणि क्रीडाप्रकार यांचा समावेश फिटनेससाठी केलाय.
हॉट ॲण्ड बोल्ड बिपाशा बासू आपल्या फिटनेसकडे अजिबात दुर्लक्ष करत नाही. तिच्या मते मनस्वास्थ्य राखण्यासाठी योग खूप महत्त्वाचा आहे. लग्न झाल्यानंतर सुखी आणि समृद्ध जीवनासाठी योगासनं करणं हाच माझा फिटनेस मंत्रा आहे, असं ती सांगते.

आलिया भट्‌टने शूटींगमधून काही वेळासाठी सुट्‌टी घेतली, तरी ती वर्कआऊट करणं सोडत नाही. तिच्या इस्ट्राग्राम अकाऊंटवर पाहिलात तर तिचे ॲन्टी ग्रॅविटी योगाचे (एरियल योगा) फोटो तुम्हाला दिसतील. तिने फॉलो केलेला हा योग प्रकार न्यूयॉर्कचा आहे. त्याच्यासोबत तिने पारंपरिक योग प्रकारातील काही आसनं यांची सांगड घातली आहे.

बी टाऊनची क्वीन कंगना राणावतला आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन योगामुळे मिळाला. १२ वर्षांपासून कंगना योगा करतेय. आयुष्यात एक वेळ अशी आली होती की आपण का जगतोय? आपल्या जगण्याचा हेतू काय? असे प्रश्‍न कंगनाला सतवायचे. नेमक्‍या त्याच वेळी कंगनाला तिच्या योगगुरुंनी विवेकानंद यांचे विचार समाजावून सांगितले. तिला राजयोग शिकवला. त्यानंतर कुंडलिनी योगा आणि चक्र यांचा सराव करण्यास तिने सुरुवात केली. त्यामुळे कंगनाला आपल्या आंतरिक शक्तीचं अस्तित्व जाणवलं आणि आपला आतला आवाज ओळखता येऊ लागला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com