अभिनयात चमकली 'चांदनी' (टर्निंग पॉइंट)

शिवानी तोमर
शुक्रवार, 9 जून 2017

आतापर्यंत मी अनेक मालिकांमध्ये अभिनय केला; परंतु त्यांत हवा तसा वाव मिळाला नव्हता; मात्र 'इस प्यार को क्‍या नाम दू'मध्ये चांदनीची व्यक्तिरेखा साकारायला मिळणं, हाच माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट आहे. या मालिकेमुळंच मला यशाचे दरवाजे खुले झाले.
- शिवानी तोमर, अभिनेत्री

आम्ही मूळचे दिल्लीचे. वसंत कुंजमध्ये मी, आई-वडील आणि धाकट्या भावंडांसोबत राहतो. मी सगळ्यांत मोठी आहे. मला जुळे भाऊ-बहीण आहेत आणि ते माझ्याहून दहा वर्षांनी लहान आहेत. वसंत कुंज येथील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये माझं शालेय शिक्षण झालं. त्यानंतर पॉलिटेक्‍निकमधून ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स केला. माझे बाबा दिल्लीमधील यशस्वी व्यावसायिक असून, त्यांचा हॅंडमेड कागदाचा व्यवसाय आहे. माझी आई 'सुपरमॉम' आहे. तिने आम्हा तिघा भावंडांना सर्वोत्तम पद्धतीने लहानाचं मोठं केलं.

शाळेमध्ये असतानाच मी अभिनय करू लागले. माझा पहिल्यापासूनच अभिनयाकडे ओढा होता; मात्र करिअर याच क्षेत्रात होईल, असं कधी वाटलं नव्हतं. मी शाळेत आणि कॉलेजमध्ये असताना काही नाटकांमधून काम केलं. त्यातल्या व्यक्तिरेखा आता मला आठवतही नाहीत; पण तिथूनच माझ्या अभिनय प्रवासाला सुरवात झाली.
'गुमराह' या मालिकेच्या माध्यमातून मी छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. मी त्यात पहिल्या सीझनमधील दुसरा एपिसोड केला आणि तिथूनच मी अभिनय क्षेत्राकडे वळले. 'कसम' या मालिकेसह 'क्रेझी स्टुपिड इश्‍क' आणि 'फ्रेंड्‌स ः कंडिशन्स अप्लाय'मध्येही काम केलं. 'रक्षक' या मालिकेतही अभिनय केला आहे; मात्र तांत्रिक कारणांमुळे ती प्रदर्शित होऊ शकली नाही. त्याचप्रमाणे अनेक मालिकांमध्ये छोट्या-छोट्या भूमिकाही साकारल्या आहेत.

अभिनय क्षेत्रामध्ये गॉडफादर नसेल, तर इथं स्थिरावणं कठीण असतं, याची प्रचिती मला मुंबईत आल्यावर आली. कारण, तेव्हा येथे मी फारशी कोणाला ओळखतही नव्हते. कोणाला फोन करायचा, कुठे जायचं, ऑडिशन कशा द्यायच्या, हे मला माहीत नव्हतं. तो माझ्यासाठी संघर्षच होता. त्यामुळं मायानगरीतून मला परत जावंसं वाटत होते; पण माझ्या आतील काहीतरी करून दाखवण्याच्या जिद्दीनं मला इथंच थांबवून ठेवले. मी माझे प्रयत्न थांबवले नाहीत. त्यामुळंच इथपर्यंत पोचले.
'इस प्यार को क्‍या नाम दू' या मालिकेमधील चांदनीची भूमिका माझी सर्वाधिक आवडती आहे. ती अत्यंत हुशार असून, तिच्या व्यक्तिरेखेला खोली आहे. मला ही व्यक्तिरेखा व्यक्तिगत स्तरावरही आपलीशी वाटते. मला तिच्या कल्पना आणि भावना आवडतात. गुल खान यांच्यासोबत खूप काळापासून मला काम करायचे होते. त्यामुळं मी उत्साहात आहे. चांदनीचा जन्म अलाहाबादमध्ये झाला असून, तिथंच ती लहानाची मोठी झाली आहे. ती अतिशय ज्ञानी असून, तिला भगवद्‌गीता पाठ आहे. यात माझा लुक एथनिक आणि आपल्या संस्कृतीच्या मुळाशी रुजलेला आहे. माझ्या व्यक्तिरेखेला तो शोभून दिसतो. चांदणी अतिशय साधी मुलगी आहे आणि तिचे कपडे आणि मेकअपही तसाच आहे. या लुकवर मी खूप मेहनत घेतली आहे.

माझी पहिली मालिका पाहिल्यानंतर माझ्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद, चांदनीच्या व्यक्तिरेखेसाठी मी सुयोग्य असल्याचे बरुणने सांगणे आणि अशा अनेक आठवणी माझ्या हृदयात दडलेल्या आहेत. 'इस प्यार को क्‍या नाम दू'मध्ये चांदनीची व्यक्तिरेखा साकारायला मिळणं, हाच माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट आहे. कारण, मी अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे; पण पाहिजे तसा वाव मिळाला नव्हता. अनेकदा मला बाजूला सारण्यात आलं आणि याचं एक अभिनेत्री म्हणून मला खूप वाईट वाटलं; पण आता ती उणीव भरून काढली आहे. या मालिकेमुळं मला यशाचे दरवाजे खुले झाले असून, आगामी काळातही मी अशाच प्रकारच्या भूमिका साकारणार आहे.
(शब्दांकन : अरुण सुर्वे)

Web Title: entertainment news actress shivani tomar tv serial iss pyar ko kya