ब्रॉडकास्ट मेसेजेस नको, दिवाळीच्या शुभेच्छा थेट फोनवर द्यायला आवडतं - मनीषा केळकर

मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

फटाक्यांप्रमाणेच आणखी एका गोष्टीचा दिवाळीच्या दिवसात त्रास होतो, ते म्हणजे ब्रॉडकास्ट मेसेजेस. हे ब्रॉडकास्ट मेसेज मला आवडत नाही, असे खुप मेसेज आल्याने महत्त्वाचे मेसेज बघायचे राहुन जातात त्यामुळे थेट फोन करुन शुभेच्छा द्यायला आवडत असल्याचे मनीषा म्हणाली. 

दिवाळीच्या शुभेच्छा देताना नातेवाईक, जवळच्या मित्र-मैत्रिणींशी थेट बोलावं, फोन करावा, कारण त्यात एक आपलेपणा असतो असं सांगत 'वंशवेल','चंद्रकोर'सारखे मराठी सिनेमे तसेच इतर अनेक हिंदी सिनेमे आणि मालिकांमधून झळकलेली अभिनेत्री मनीषा केळकरने दिवाळीनिमीत्त खास 'ई सकाळ' सोबत आपला दिवाळीचा अनुभव शेअर केला. 

दिवाळीच्या तयारीबाबत बोलताना मनीषा म्हणाली, आमच्या घरी दिवाळीची तयारी घराच्या साफसफाईपासुन सुरु होते. नंतर मग एकएक काम वाढत जातं. वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आणुन घर सजवायला आवडतं तसेच एखाद्या मॉलमधुन किंवा दुकानातून लाईटिंग, पणत्या विकत घेण्यापेक्षा रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या मातीच्या पणत्या मी घेते, त्या लोकांच्या दिवाळीच्या आनंदात तितकाच आपला वाटा असल्याचं समाधान मिळतं असंही ती म्हणाली. 

दिवाळीचं फराळ आम्ही बऱ्याचदा बाहेरुन तयार केलेलं आणतो पण काहीही झालं तरी करंज्या आणि कानवले मा स्वतः बनवते असंही तीने सांगितलं.

दिवाळीच्या दिवसांत लवकर शुटींग संपवुन सुट्टी घेण्याचा प्रयत्न करते. कधी नाहीच जमलं तर आम्ही सेट वर दिवाळी साजरी करतो. दिवाळीच्या निमित्ताने सगळं कुटुंब एकत्र येतं त्यामुळे दिवाळीला घरी राहता यावं म्हणुन शुटींगमधून 2-3 दिवस सुट्टी घेण्याचा प्रयत्न करते असं मनीषा म्हणाली.

फटाके आणि प्रदुषण याबाबत बोलताना ती म्हणते की, लहाणपणी मला फटाके फोडायला खुप आवडायचे. अर्थात तेव्हा त्याचे परिणाम समजत नव्हते पण जेव्हापासुन समजायला लागलं तेव्हापासुन फटाके फोडणं बंद केलं आहे. दिवाळीच्या दिवसांत त्याऐवजी करण्यासारखं दुसरं खुप काही आहे. त्यामुळे माझा बाकी सर्वांना पण हाच आग्रह असतो की आपण दिवाळीचा आनंद घ्यावा, दिवाळीच्या दिवसांत कुटुंबासोबत राहवं, फराळ करावा आणि मस्त मजा करावी पण फटाके फोडून प्रदुषण करणं टाळावं.

फटाक्यांप्रमाणेच आणखी एका गोष्टीचा दिवाळीच्या दिवसात त्रास होतो, ते म्हणजे ब्रॉडकास्ट मेसेजेस. हे ब्रॉडकास्ट मेसेज मला आवडत नाही, असे खुप मेसेज आल्याने महत्त्वाचे मेसेज बघायचे राहुन जातात त्यामुळे थेट फोन करुन शुभेच्छा द्यायला आवडत असल्याचे मनीषा म्हणाली. 

Web Title: esakal entertainment news actress manisha kelkar talks about diwali

टॅग्स