युवराज्ञी डायना पडद्यावर अवतरणार 

यूएनआय
सोमवार, 24 जुलै 2017

'डायना, अवर मदर : हर लाइफ अँड लीगसी' असे या माहितीपटाचे नाव असून ब्रिटन आणि अमेरिकेमध्ये उद्या (ता. 24) प्रक्षेपित केला जाणार आहे. 31 ऑगस्ट 1997 ला डायनाचा मोटार अपघातात मृत्यू झाला होता. या घटनेला वीस वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर निक केंट यांनी हा माहितीपट तयार केला आहे.

लंडन : ब्रिटनची दिवंगत युवराज्ञी डायना हिच्यावर माहितीपट प्रसिद्ध होत असून, तिची दोन्ही मुले, राजपुत्र विल्यम आणि हॅरी यांच्या तोंडूनच त्यांच्या आईचे व्यक्तिमत्त्व उलगडणार आहे. 

'डायना, अवर मदर : हर लाइफ अँड लीगसी' असे या माहितीपटाचे नाव असून ब्रिटन आणि अमेरिकेमध्ये उद्या (ता. 24) प्रक्षेपित केला जाणार आहे. 31 ऑगस्ट 1997 ला डायनाचा मोटार अपघातात मृत्यू झाला होता. या घटनेला वीस वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर निक केंट यांनी हा माहितीपट तयार केला आहे. 'इतर कोणाही व्यक्तीपेक्षा डायनाला अधिक ओळखणाऱ्या व्यक्तींच्या नजरेतून तिला कधीही दाखविण्यात आलेले नाही. त्या व्यक्ती म्हणजे तिची दोन्ही प्रिय मुले. या माहितीपटातून प्रेक्षकांना डायनाच्या खासगी जीवनाबाबत आणि स्वभावाबाबत अधिक समजेल,' असा दावा केंट यांनी केला आहे. या माहितीपटामध्ये डायनाच्या सामाजिक कामांबद्दल दाखविण्यात आले असले तरी, तिच्या विवाहबाह्य संबंधासारख्या वादग्रस्त मुद्‌द्‌यांमुळे याकडे प्रेक्षकांचे कमी लक्ष जाण्याची शक्‍यता आहे. 

या माहितीपटामध्ये दोन्ही राजपुत्रांनी आपल्या आईच्या आठवणी सांगताना तिची विनोदबुद्धी, तिच्याशी फोनवर झालेले अखेरचे संभाषण, आपल्या पालकांचा घटस्फोट आणि डायनाच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर बसलेला धक्का याबाबत मनमोकळी चर्चा केली आहे. हॅरी याने आपली आई अत्यंत खोडकर असल्याचे सांगत तिच्या मनमोकळ्या स्वभावाबद्दल भरभरून सांगितले आहे. डायनाच्या आयुष्यात अनेक वादग्रस्त घटना असल्या तरी, दोन्ही राजपुत्रांनी त्यांना असलेली माहिती मोकळेपणाने सांगितल्याचे केंट यांनी सांगितले. उलट, डायनावर वेगळ्या प्रकारचा चित्रपट तयार व्हावा, अशीच दोघांचीही इच्छा होती. 

'डायना'साठी प्रदर्शन 
युवराज्ञी डायनाच्या निधनाला वीस वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्ताने येथील बकिंगहॅम पॅलेसमध्ये तिला मिळालेल्या भेटवस्तूंचे आणि तिच्या आठवणी जागविणाऱ्या विविध वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन एक ऑक्‍टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रदर्शनामध्ये डायनाने जपून ठेवलेल्या तिच्या आवडत्या गायकांच्या कॅसेट, तिचे दागिने, नेहमीच्या वापराच्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. तसेच, तिच्या महालाची प्रतिकृतीही उभारण्यात आली आहे. 
 

Web Title: esakal news sakal news princess diana movie