Exclusive Interview :अभिषेक बच्चन... यशस्वी कारकिर्दीची 20 वर्षे...

Exclusive Interview :अभिषेक बच्चन... यशस्वी कारकिर्दीची 20 वर्षे...

अभिनेता अभिषेक बच्चनच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील करिअरला वीस वर्षे पूर्ण झाली आहेत. आता तो ऍमेझॉन प्राईमच्या "ब्रीद... इन टू द शॅडोज' या वेबसीरिजच्या दुसऱ्या भागात काम करून वेबविश्‍वात तो पदार्पण करतो आहे. 20 वर्षांनंतर आता या नव्या प्लॅटफॉर्मवर येताना काय वाटते, त्याबद्दल अभिषेक बच्चनशी 'सकाळ'चे प्रतिनिधी संतोष भिंगार्डे यांनी साधलेला हा संवाद...
-------------------------------------
अभिषेक बच्चनने हिंदी चित्रपटसृष्टीत जे. पी. दत्ता यांच्या "रेफ्युजी' या चित्रपटाद्वारे पदार्पण केले आणि त्यानंतर एकापाठोपाठ एक चित्रपट तो करू लागला. कधी कॉमेडी तर कधी संवेदनशील अशा व्यक्तिरेखा त्याने साकारल्या. नवोदित तसेच सेलेबल नायिकांबरोबर तो चमकला. जे. पी. दत्ता यांच्या दिग्दर्शनाखाली सुरू केलेला प्रवास राकेश ओमप्रकाश मेहरा, आर. बाल्की, अब्बास मस्तान, रामगोपाल वर्मा ते आता आलेल्या "ब्रीद.. इन टू द शॅडोज' या वेबसीरिजचा दिग्दर्शक मयांक शर्मा यांच्यापर्यंत पोहोचला आहे.
विशेष म्हणजे त्याची पत्नी ऐश्‍वर्या रॉयबरोबर त्याने "ढाई अक्षर प्रेम के'(2000), "कुछ ना कहो'(2003), "बंटी और बबली'(2005), "उमराव जान'(2005), "धूम-2'(2006) आणि "गुरु'(2007) असे सहा चित्रपट केले आणि लग्नानंतर सरकार राज (2008) आणि "रावन'(2010) असे दोन चित्रपट केले. गुरूचे चित्रीकरण सुरू असताना अभिषेकने ऐश्‍वर्याला प्रपोज केले आणि त्यांचा 2007 मध्ये विवाह झाला. आज अभिषेकला या इंडस्ट्रीत वीस वर्षे पूर्ण झाली आहेत. भले त्याला अमिताभ बच्चन यांच्यासारखी उत्तुंग प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली नसली तरी तब्बल वीस वर्षे या बेभरवशाच्या इंडस्ट्रीत टिकून राहणे ही काही साधी व सोपी गोष्ट नाही. कारण आज हिंदी चित्रपटसृष्टीवर एक कटाक्ष टाकला तर कित्येक सेलिब्रेटींच्या मुलांनी अर्ध्यावरच एक्‍झिट घेतली आहे. काही जण आजही चाचपडत आणि प्रयत्न करीत आहेत. पण अभिषेक खंबीरपणे उभा आहे. विविध चित्रपट आणि जाहिराती करीत आहे. भले कित्येक दिवस त्याचा चित्रपट आला नसला तरी त्याने इंडस्ट्रीशी आपले नाते तोडले नाही. येथे आलेल्या प्रत्येक चढ-उतारांचा सामना त्याने केला आणि म्हणूनच आजही तो तितक्‍याच उमेदीने काम करीत आहे.

अभिषेक म्हणाला, की 30 जून 2000 रोजी माझा पहिला चित्रपट आला. त्यातील माझ्या कामाचे कौतुक झाले. त्यानंतर आयुष्यात अनेक चढउतार आले. पण मी प्रत्येक गोष्टीचा धीराने आणि धैर्याने सामना केला. कधी हार मानली नाही की कधी कुणाकडे काम मागायला गेलो नाही. मी काम केले ते माझ्या आवडीनेच केले. माझे काम अधिकाधिक चांगले कसे होईल ते मी पाहिले. अन्य बाबींचा अधिक विचार केला नाही. आता मी "ब्रीद.. इन टू द शॅडोज' या वेबसीरिजमध्ये काम करीत आहे.

खरं तर ओटीटी प्लॅटफॉर्म भारतात खूप लोकप्रिय ठरत आहे. वेगवेगळ्या वेबसीरिज तसेच चित्रपट या प्लॅटफॉर्वर येत आहेत आणि प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. मग अभिषेकने या प्लॅटफॉर्मवर येण्यास उशीर केला का... त्यावर तो म्हणाला, की प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते आणि चांगली कन्सेप्ट मिळणेही तितकेच आवश्‍यक असते. "ब्रीद'ची शूटिंग झाली 2018 मध्ये. आता ही सीरिज येतेय आणि लोकांना ती पाहण्यासाठी वेळही आहे. कारण सध्या लॉकडाऊन आहे आणि सगळे जण घरीच आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी ही वेबसीरिज एक पर्वणी आहे आणि ती आता येतेय याबद्दल मी खुश आहे.

"ब्रीद इन टू द शॅडोज' ही वेबसीरिज सायकॉलॉजिकल क्राईम थ्रिलर आहे. या सीरिजमध्ये अविनाश सभरवाल ही व्यक्तिरेखा अभिषेक साकारत आहे. हा अविनाश एका मुलीचा बाप असतो. तिचे नाव सिया. एका व्यक्तीकडून सियाचे अपहरण होते. तिचे वडील आणि पोलिस तपास करीत असतात. या तपासादरम्यान अनेक नाट्यमय घडामोडी घडतात. अभिषेकचे वेबविश्‍वातले पदार्पण आणि ही भूमिका निश्‍चितच खास असणार आहे.

या भूमिकेतील नेमके काय आव्हान त्याला वाटते, असे विचारता तो म्हणाला, की आतापर्यंत चित्रपटांमध्ये अशा प्रकारची भूमिका कधी केली नव्हती. सायकॉलॉजिकल क्राईम थ्रिलर हा जॉनरही चित्रपटात केला नव्हता. माझ्यासाठी हा जॉनर नवीन आहे आणि खूप चॅलेंजिंग भूमिका आहे. या भूमिकेला विविध शेड्‌स आहेत. कथानकामध्ये खूप टर्न ऍण्ड ट्विस्ट आहेत. कहाणी उत्तम आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी आहे.

"ब्रीद...'च्या पहिल्या भागाला चांगली पसंती मिळाली. त्यामध्ये आर. माधवनने काम केले होते. आता नव्या कथानकानुसार अभिषेक काम करीत आहे. त्याने पहिला भाग पाहिला आहे का, असा प्रश्‍न साहजिकच उत्पन्न होतो. यावर तो उत्तर देतो, की मी जेव्हा ही सीरिज स्वीकारली तेव्हा याचा पहिला भाग आला होता व तो मी पाहिलेला नव्हता. या सीरिजचे चित्रीकरण सुरू झाल्यानंतर पहिला भाग पाहिला. तो खूपच उत्कंठावर्धक होता आणि आताचाही दुसरा भाग खूप चांगला आणि रोमहर्षक आहे. आता यामध्ये खासियत काय आहे हे प्रेक्षक ही वेबसीरिज पाहतील आणि ठरवतील.

यात अभिषेकव्यतिरिक्त अमित साध, नित्या मेनन, सैयामी खेर, इवाना कौर, रेशम श्रीवर्धन, हृषिकेश जोशी आणि श्रीकांत वर्मा प्लाबीता बोर्थाकूर, सुनील गुप्ता आणि श्रद्धा कौल यांच्याही भूमिका आहेत. मयांक शर्मा याचा दिग्दर्शक आहे. मयांकबरोबर पहिल्यांदाच काम केल्याचे सांगत, तो कमालीचा दिग्दर्शक असल्याचे मत अभिषेकने नोंदवले. अभिषेक या सीरिजमध्ये एका पतीची तसेच वडिलांची भूमिका साकारत आहे.

प्रत्यक्ष जीवनात तो आदर्श मुलगा, आदर्श पती तसेच जबाबदार वडील आहे. या तिन्ही भूमिकांतील कोणती भूमिका तुला आवडते, असे विचारल्यानंतर तो म्हणाला, या तिन्ही भूमिका मला सारख्याच आवडतात. मी अशी काही विभागणी करीत नाही. मी माझ्या कुटुंबावर खूप प्रेम करतो आणि कुटुंबाचेही माझ्यावर खूप प्रेम आहे. मी कुटुंबवत्सल माणूस आहे.
सध्या एकापाठोपाठ एक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. याबद्दल विचारता तो म्हणाला, ""चित्रपटगृहे बंद आहेत आणि ती कधी उघडणार हे कुणी सांगू शकत नाही. कित्येक निर्मात्यांचे चित्रपट तयार आहेत आणि त्यांनी आपला पैसा चित्रपटांवर गुंतवला आहे. त्यांनी चित्रपटगृहे सुरू होण्याची वाट पाहावी का... शेवटी त्यांनी तो निर्णय घेतला आहे आणि त्यांनी घेतलेला निर्णय काही तरी विचार करूनच घेतला असणार यात शंका नाही. ओटीटी प्लॅटफॉर्मही आम्हा कलाकारांसाठी एक नवीन माध्यम आणि या माध्यमामार्फत आमचे काम प्रेक्षकांपर्यंत पोहोचते आहे ही चांगली बाब आहे.''

------------------------------------------------

(संपादन - तुषार सोनवणे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com