Exclusive Interview: बॉलिवूडमधील घराणेशाहीवर मनोज वाजपेयीने केले मोठे वक्तव्य... वाचा संपुर्ण मुलाखत

Exclusive Interview: बॉलिवूडमधील घराणेशाहीवर मनोज वाजपेयीने केले मोठे वक्तव्य... वाचा संपुर्ण मुलाखत

दिग्दर्शक देवाशिष माखिजाचा भोसले हा हिंदी चित्रपट  'सोनी लिव ' या ओटीटी प्लॅटफाॅर्मवर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अभिनेता मनोज वाजपेयीने मुख्य भूमिका साकारली आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी  सकाळचे प्रतिनिधी संतोष भिंगार्डे यांनी केलेली बातचीत.

---------------------------------

 ः प्रत्येक भूमिकेचे एक वैशिष्टय असते. भोसले या चित्रपटातील तुमच्या भूमिकेचे नेमकी खासियत काय आहे.. 

- गणपत भोसले असे माझ्या व्यक्तिरेखेचे नाव आहे. हा पोलिस खात्यातून निवृत्त झालेला असतो आणि एकाकी जीवन जगत असतो. एकटेपणा त्याला खूप सतावीत असतो. पोलिस खात्यामध्ये असताना तो आपल्या कामात रमलेला असतो. परंतु निवृत्त झाल्यानंतर साहजिकच एकाकीपणाचे जीवन त्याला जगावे लागते. त्यानंतर त्याच्या आजूबाजूला काही घडामोडी घडतात. त्याचाही त्याच्या मनावर खूप परिणाम होत असतो. त्यानंतर तो काय विचार करतो ते चित्रपटात पाहिलेले बरे.

 ः या चित्रपटात नेमक्या कोणत्या मुद्दय़ाला हात घातला गेला आहे..... 

- या चित्रपटाची पार्श्वभूमी मुंबईचीच आहे. येथे अनेक जाती-जमातीचे लोक राहात असतात. मग त्यांच्यामध्ये कोणकोणत्या मुद्दय़ावरून कशा प्रकारचे द्वंद्व होते. येथील स्थानिक अर्थात भूमीपुत्र व बाहेरून येथे पोटा-पाण्यासाठी आलेले काही परप्रांतीय यांच्यामध्ये काय आणि कसे वाद होतात.....बाकी गोष्टींसाठी चित्रपट पाहावा लागेल. यामध्ये भोसले ही व्यक्तिरेखा मुख्य आहे आणि तसेच अन्य कलाकारही काम करीत आहेत.

 ः यापूर्वी तुम्ही सत्या, अलीगड या चित्रपटांमध्ये मराठी व्यक्तिरेखा साकारली होती. आताही एका मराठी माणसाचीच व्यक्तिरेखा साकारीत आहात. याबद्दल काय सांगाल.. 

- सत्या चित्रपटातील भिखू म्हात्रे, अलीगढ चित्रपटातील रामचंद्र सिरस व आताची गणपत भोसले या तिन्ही व्यक्तिरेखा मराठी असल्या तरी वेगळ्या धाटणीच्या आहेत. तिन्ही भूमिकांना वेगळे कंगोरे आणि तिन्ही भूमिकांचा एकूणच प्रवास निराळा आहे. रामचंद्र सिरस हा मराठीचा प्रोफेसर होता तर भोसले हा पोलिस हवालदार आहे. या तिन्ही भूमिकांची देहबोली, वागण्याची त्यांची शैली निराळी आहे. या तिन्ही भूमिकांसाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली. मला मराठी काही बोलता येत नाही. असेच कुणाला भेटून किंवा कुणाचे मराठी ऐकून थोडी फार मराठी शिकलो आहे.

 ः या भूमिकेसाठी काही तयारी करावी लागली का.... 

- भूमिकेसाठी तयारी करावी लागलीच. कारण या चित्रपटात मला केवळ दोन-चार डायलाॅग आहेत. बाकी मला सगळे हावभाव डोळ्यांतून आणि एकूणच बाॅडी लॅग्वेजमधून व्यक्त करायचे आहेत आणि ती बाब खूप कठीण असते. संवाद न म्हणताच आपल्या चेहऱ्यावरील हावभाव समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविणे खूप अवघड काम असते. शिवाय चित्रपटाला निर्माता शोधण्यापासूनच खूप कष्ट करावे लागलं. या चित्रपटाला निर्माता शोधण्यासाठी चार वर्षे खर्ची घालावी लागली. एखादा निर्माता यायचा आणि कथा ऐकायचा. या कथेवरून काही तरी राजकीय वाद निर्माण होईल....एखादा राजकीय पक्ष या चित्रपटाला हरकत घेईल या भीतीने लांब पळायचा. आम्ही त्यांना समजावून सांगितले की या चित्रपटात तसे काही नाही. एक निवृत्त पोलिस हवालदार गणपत भोसलेची ही कथा आहे. पण आमचे कुणी ऐकायलाच तयार नाही. कुणी पैसे लावायला तयार नाही. आमची अकरा दिवसांची शूटिंग झाली आणि बाराव्या दिवशी शूटिंग करायची पैसे नाहीत. शेवटी रात्री एका मित्राला मी फोन केला आणि त्याला फायनान्स करायला सांगितले. संदीप कपूर त्यांचे नाव. मी त्यांचा खूप आभारी आहे कारण त्यांच्यामुळेच पुढील चित्रीकरण सुरळीत झाले.

 ः भोसले हा चित्रपट अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात व महोत्सवामध्ये गेला आणि त्याला मानसन्मान मिळाला..त्याबद्दल..

 - छोट्या चित्रपटांची मुख्य ताकद त्याचा कण्टेड असतो. त्यानंतर अन्य गोष्टी येतात आणि अशा चित्रपटांचा जेव्हा सन्मान होतो तेव्हा आनंद तर होतोच शिवाय एक प्रकारचे बळही मिळते. आमच्यासारख्या कलाकारांचा उत्साह अशा प्रकारचे चित्रपट अधिक वाढवितात. विविध प्रकारचे पुरस्कार मिळाले आणि सन्मान झाला की प्रेक्षकांचीही उत्सुकता अधिक वाढते. तेदेखील अशा चित्रपटांची आतुरतेने वाट पाहात असतात.

 ः सध्या ओटीटी प्लॅटफाॅर्मवर चित्रपट अधिक प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे मल्टिप्लेक्सवाले वैतागले आहेत. सध्या निर्माते आणि मल्टिप्लेक्सवाले यांच्यामध्ये वाद सुरू झाला आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटते...

 - आताचा काळ खूप कठीण आहे आणि असा काही प्रसंग आपल्यावर येईल असे कुणालाच वाटलेले नव्हते. आताच्या परिस्थितीत निर्माते आणि मल्टिप्लेक्सवाले दोघेही मजबूर आहेत. निर्मात्यांनी चित्रपटांवर पैसे लावलेले आहेत आणि त्यांना त्यांच्या पैशाची चिंता आहे. त्यामुळे ते ओटीटीवर जात आहेत. आमचा चित्रपट सोनी लिववर येत आहे. थिएटर्सवाल्यांना मेंटनन्स तसेच अन्य खर्च कसा काढायचा याची चिंता लागली आहे. त्यामुळे निर्माते आणि थिएटरवाले दोघेही विचित्र परिस्थितीतून वाटचाल करीत आहेत. जोपर्यंत कोरोनावर काही औषध येत नाही तोपर्यंत खूप काळजी घ्यावी लागणार आहे. आता प्रत्येकाचीच कसोटी आहे. शिवाय ओटीटीद्वारे जगातील असंख्य देशात चित्रपट जातो आणि आता थिएटर सुरू झाले की तेथे चित्रपट प्रदर्शित होणारच आहेत. कित्येक चित्रपट तयार आहेत आणि ते पडदा उघडण्याची वाट पाहात आहेत.

 ः सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या घराणेशाहीच्या मुद्दावरून चर्चा होत आहे त्याबद्दल... 

- घराणेशाही आहे हे नक्कीच. मला किती त्रास झाला आहे या इंडस्ट्रीत उभे राहण्यासाठी. मी किती सहन केले आहे हे माझे मलाच माहीत. येथील चढ-उतार मी पाहिलेले आहेत आणि यश व अपयश यांचाही सामना केला आहे. अपयश आणि अपमान सहन केला आणि खंबीरपणे उभा राहिलो. येथे टॅलंटपेक्षा यश महत्त्वाचे आहे. कारण कित्येकांकडे टॅलंट असते पण त्यांना संधी मिळत नाही. सुशांत चांगला अभिनेता होता. त्याच्यामध्ये टॅलंट होता आणि तो यशस्वीही झाला होता. पण त्याचे निधन ही सगळ्यांना धक्का देणारी बाब आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com