Exclusive Interview :संजना सांघी सांगतेय 'दिल बेचारा' चित्रपटाबद्दल आणि सुशांतच्या आवडीनिवडीबद्दल,,,

संतोष भिंगार्डे - सकाळ न्युज नेटवर्क
Tuesday, 21 July 2020

सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट दिल बेचारा आता प्रदर्शित होणार आहे. त्याच्याबरोबर नायिका म्हणून संजना सांघीने काम केले आहे. संजना सांगतेय चित्रपटाबद्दल आणि सुशांतच्या आवडीनिवडीबद्दल,,,

सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट दिल बेचारा आता प्रदर्शित होणार आहे. त्याच्याबरोबर नायिका म्हणून संजना सांघीने काम केले आहे. संजना सांगतेय चित्रपटाबद्दल आणि सुशांतच्या आवडीनिवडीबद्दल,,,

सुशांत पॅशनेट अभिनेता होता
तुझा पहिलाच चित्रपट प्रदर्शित होत आहे. तुझ्या मनामध्ये किती टेन्शन आहे आणि किती उत्सुकता आहे...
- खरं तर पहिलाच चित्रपट असल्यामुळे कोणत्याही कलाकाराला खूप उत्सुकता असते. आपले काम कसे झाले आहे....आपल्या कामाला लोकांचा कसा काय प्रतिसाद मिळणार
आहे...याबाबत जाणून घेण्याबाबत खूप उत्सुकता असते. परंतु मी खूप दुःखीआहे. माझा सहकलाकार सुशांत सिंह आज या जगात नाही आणि आमचा चित्रपट प्रदर्शित होतोय ही बाब मला खूप नव्हर्स करणारी आहे. हा चित्रपट मी सुशांत सिंहला श्रद्धांजली म्हणून अर्पित करीन.

 सुशांतची आणि तुझी पहिली भेट कधी व कुठे झाली. तुला त्याचा आवडलेला चित्रपट कोणता...
-मुकेश छाबरा यांच्या ऑफिसात मी पहिल्यांदा सुशांतला भेटले. चित्रपटाची शूटिंग सुरू होण्यास काही कालावधी होता आणि आमचे दोन ते तीन आठवड्याचे वर्कशाॅप्स होते. त्याकरिता मी मुकेशजींच्या ऑफिसात गेले होते. तेथे सुशांतची पहिली भेट झाली. त्यावेळीच मला जाणवले की तो  कामाच्या बाबतीत किती पॅशनेट आहे...टॅलेंटेड आहे. आपली भूमिका ऐकली आणि घरी जाऊन बसले अशातला तो नाही हे मला जाणवले. तो घरी जाऊन पुस्तके वाचून त्या भूमिकेचा अभ्यास खूप करायचा. हे मला त्याच्याबरोबर काम करताना जाणवले.  मी त्याचे सगळे चित्रपट पाहिले आहेत. तो खूप टॅलेंटेड अभिनेता होता. सुपरस्टार होता. त्याचा शेवटचा चित्रपट छिछोरे मला खूप आवडला होता.

 तुझ्याआणि सुशांतच्या स्वभावमध्ये तुला जाणवलेले समान गुण कोणते........
- सुशांत खाण्याच्या बाबतीत खूप शौकीन होता. त्याला वाचनाची आणि चित्रपट पाहण्याची खूप आवड होती. मलाही खाण्याची खूप आवड आहे आणि वाचनाचीही. त्यामुळे त्याचे व माझे विचार लगेच जुळले. त्याने मला खूप सहकार्य केले. आपण मोठे स्टार आहोत हे त्याने मला कधीच जाणवू दिले नाही. त्याला पास्ता खूप आवडायचा. आम्ही एका गाण्याच्या शूटिंगला
पॅरिसमध्ये गेलो होतो. तेथे आम्ही तिघे जण मी, मुकेश आणि सुशांत विविध हाॅटेलात फिरलो आणि खूप काही वेगळे पदार्थ खाल्ले. आम्ही सगळ्यांनी तेथे खूप मजा केली.  

दिल बेचारा या चित्रपटातील तुझी भूमिका तुला किती चॅलेंजिंग वाटली...
- चॅलेंजिंग होतीच, कारण संपूर्ण चित्रपटाची स्क्रीप्ट इमोशनल आहे. त्यामुळे तुम्हाला यामध्ये फारसे ग्लॅमर दिसणार नाही किंवा गाड्यांची तोडफोड आढळणार नाही. चित्रपटाची कथा खूप आकर्षक आहे आणि प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारी आहे. माझ्यासारख्या नवोदित अभिनेत्रीसाठी ही स्क्रीप्ट उत्तम आहे आणि अशी स्क्रीप्ट खूप कमी जणांच्या वाट्याला येते. दिग्दर्शक मुकेश
छाबरा यांनी स्क्रीप्ट छान बांधली आहे. मला माझ्या भूमिकेसाठी खूप तयारी करावी लागली आणि खूप मेहनत घ्यावी लागली.

 या चित्रपटात अॅक्शन किती आहे आणि रोमान्स किती आहे......
- अॅक्शन अजिबात नाही. पण रोमान्स खूप आहे. हा चित्रपट दोन व्यक्तिरेखांभोवती फिरणारा आहे. प्रेम, मैत्री असे सगळे काही आहे या चित्रपटात. सैफ अली खानची व्यक्तिरेखा ही या
चित्रपटातील सरप्राईज आहे. त्याबद्दल मी अधिक काही सांगू शकत नाही.

 या चित्रपटात तू एका बंगाली मुलीची भूमिका साकारली आहेस. तर बंगाली भाषा आणि संस्कृती शिकणे किती कठीण होते...
- कठीण होते हे नक्की. कारण मी दिल्लीची आहे. दिल्लीत लहानाची मोठी झाली आहे. मी अर्धी पंजाबी आणि अर्धी गुजराती. त्यामुळे बंगाली भाषेबाबत मला फारसे काही माहीत नव्हते.
मुकेश छाबरा यांनी सांगितले की तुला बंगाली शिकावेच लागेल. मग ही मनाची तयारी केली आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधील एका शिक्षकाकडून चार महिने बंगाली भाषा वगैरे शिकले आहे.

--------------------------------------------------------

Edited by Tushar Sonawane

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Exclusive Interview: Sanjana Sanghi talks about 'Dil Bechara' movie and Sushant's favorite ,,,