Mohammed Rafi:राज ठाकरेंच्या वडिलांमुळे महंमद रफी मराठीत भक्तीगीत गाऊ लागले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Famous Singer Mohammed Rafi was influenced by Shrikant Thackeray for Marathi Songs

राज ठाकरेंच्या वडिलांमुळे महंमद रफी मराठीत भक्तीगीत गाऊ लागले

महंमद रफी यांचं नाव हिंदी गाण्यांच्या क्षेत्रात फार मोठं आहे.कित्येक जणांना तर त्यांच्या गाण्यांची सवय आजही आहे.अनेकांच्या दिवसाची सुरूवात रफींच्या गाण्यांनी व्हावी एवढं रफीच्या गाण्यात वजन असायचं.उर्दू आणि हिंदी भाषेत विशेष प्राविण्य असणाऱ्या महंमद रफींच्या मराठी गाण्यांचाही विशेष संच आहे.त्यांना मराठी गाणे गायनाचे प्रोत्साहन मिळाले कसे याबद्दलची माहितीही फार कमी लोकांना आहे.

महंमद रफी (Mohammed Rafi) यांनी मराठीत गायलेल्या गाण्यांचं एक समृध्द कला दालन आहे. रफींनी मराठी सिनेमाकरीता पहिल्यांदा गायलं १९५५ साली.ते पांडुरंग दिक्षित यांनी संगीत दिलेल्या ’शिर्डीचे साईबाबा’या चित्रपटात.गाण्याचे बोल होते,'काहे तीरथ जाता रे भाई, शिर्डी जाकर देख साई’.पण हे मराठी गाणं म्हणता येणार नाही कारण चित्रपट जरी मराठी असला तरी गाण्याचे बोल हिंदी होते.त्यानंतर त्यांनी १९६७ साली आलेल्या ’श्रीमंत मेहुणा पाहिजे’ या सिनेमात त्यांनी पहिल्यांदा ’ही दुनिया बहुरंगी’ हे गीत गायलं आणि हेच त्यांचं पहिलं मराठी चित्रपट गीत ठरलं. त्यानंतर त्यांचे राज ठाकरेंचे वडिल श्रीकांत ठाकरे यांच्या 'शूरा मी वंदिले’ (१९७५) या सिनेमात रफीची गाणी होती.हा सिनेमापण तिकीटबारीवर फारसा चमत्कार करू शकला नव्हता.पण मात्र पण रफी आणि श्रीकांत ठाकरे (Shrikant Thackeray) यांचे स्नेह बंध इथूनच मजबूत झाले आणि रफीच्या नॉनफिल्मी मराठी गाण्यांचा एक अध्याय सुरू झाला.

महंमद रफींचे उत्कृष्ट मराठी गायन सुरू झाले ते श्रीकांत ठाकरेंच्या प्रोत्साहनानेच

त्यावेळी कवयित्री वंदना विटणकर ह्यांच्या काही कविता गीतरूपाने आल्या होत्या. ठाकरे व विटणकर यांच्यात गाण्याबाबत कायम चर्चा चालायच्या. आधी सूर की आधी शब्द असा वाद चालायचा. ठाकरे गमतीने म्हणायचे ’कसले तुम्ही मराठी कवी? नुसते दळूबाई सारखे गाणे लिहिता. तेच तेच शब्द त्याच त्याच रचना… तिकडे हिंदीत बघा. चालीवर गाणी लिहितात म्हणून ती गाणी कशी ताजी वाटतात.’श्रीकांतजी यांनी मालकंस रागातील एक चाल ऐकवली व म्हणाले ’आता यावर तुम्ही एक भक्ती गीत लिहा.पण मात्र दना ताईंनी कधी चालीवर गाणी लिहिली नव्हती. रात्रभर त्या शब्दासाठी तळमळत राहिल्या. झोपेत सुध्दा त्या सुरांनी त्यांचा पिच्छा सोडला नाही.अखेर शब्द जुळून आले. गाण्याचा मुखडा तयार झाला. ’शोधीसी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी’ श्रीकांतजींना मुखडा आवडला ते म्हणाले ’आगे बढो’.मग काय त्या धुंदीत वंदना विटणकर यांनी सहा अंतरे लिहून काढले.

हे गीत रफी गाणार म्हटल्यावर तर त्या अक्षरश: भारावून गेल्या. रफी यांना देवनागरी लिपी येत नव्हती पण श्रीकांतजी यांना उर्दूचे उत्तम ज्ञान होते त्यांनी हे गाणं उर्दूत लिहून रफीच्या हाती ठेवलं.आणि रफीचे मराठीतील पहिले भक्ती गीत ’शोधीसी मानवा …’ हे जन्माला आले. ही आठवण स्वत: वंदना विटणकर यांनी त्यांच्या ‘हे गीत जीवनाचे’ या त्यांच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत सांगितली आहे.एकंदर श्रीकांत ठाकरेंच्या त्या परिश्रमाने रफी मराठी गाणं गायला लागले.

काय होता श्रीकांत ठाकरेंचा इतिहास ?

मराठी भावगीतांमध्ये वेगळ्या पठडीतल्या संगीतासाठी श्रीकांत ठाकरे हे नाव महत्त्वाचे आहे. त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांची ‘डेक्कन स्पार्क’ या नावाची नाटक कंपनी होती. घरात ‘बुलबुलतरंग’ हे वाद्य होते. हे वाद्य आज क्वचितच पाहायला मिळते. श्रीकांत ठाकरे यांना त्यांच्या लहानपणीच सी. व्ही. पंतवैद्य हे संगीत शिक्षणातील गुरू भेटले. त्यांच्याकडे व्हायोलिन वादनाची शिकवणी सुरू झाली. पुढील काळात आकाशवाणीवर व्हायोलिनवादनाचा स्वतंत्र कार्यक्रम सादर केला. सुगम गायनाच्या मैफलीमध्ये व्हायोलिनची साथ केली. गजल, ठुमरी या गीतप्रकारांवर त्यांचे विशेष प्रेम होते.

श्रीकांतजी स्वत: उर्दू भाषा शिकले. त्यांनी मराठी गीतांचे शब्द रफीसाहेबांना उर्दू भाषेत लिहून दिले. त्यांच्या कानामनांत चोवीस तास संगीत हाच विषय असे. त्यांनी पत्नीचे नाव ‘मधुवंती’ असे ठेवले. तर कन्येचे नाव ‘जयजयवंती’ व चिरंजीवांचे नाव- ‘स्वरराज’असे ठेवले. ‘स्वरराज’- म्हणजेच आपल्याला परिचयाचे असलेले लोकप्रिय व्यक्तिमत्त्व ‘राज ठाकरे’.राज ठाकरेसुद्धा उत्तम तबलावादन शिकले आहेत.

Web Title: Famous Singer Mohammed Rafi Was Influenced By Raj Thackeray First Timeshrikant

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top