फर्जंद; इतिहासाचं स्फूर्तिदायी सिनेमॅटिक पान

संतोष भिंगार्डे
शनिवार, 2 जून 2018

शिवाजी महाराजांच्या ६० मावळ्यांच्या अद्वितीय पराक्रमाची ही कहाणी आहे. खरे तर एखादा ऐतिहासिक चित्रपट काढायचा म्हटलं की मोठा लवाजमा आणि मोठे खर्चिक काम असते. तसेच त्याबाबतीत खूप संशोधनही करावे लागते. त्याबाबतीत केवळ दिग्दर्शकच नाही तर संपूर्ण टीमची कसोटी लागलेली असते.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्यदैवत. त्यांचा इतिहास किंवा त्यांचा एकूणच जीवनप्रवास संघर्षमय होता. अनेक चढउतार त्यांच्या आयुष्यात आले. त्यांचा हा संघर्षमय प्रवास आजच्या पिढीला प्रेरणा देणारा असाच आहे. त्यांनी अनेक मावळ्यांच्या साथीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्याकरिता कित्येक मावळ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली. त्यापैकीच महाराजांचा एक शूर सरदार कोंडाजी फर्जंद. राज्याभिषेक करण्याआधी शिवाजी महाराजांना पन्हाळा हा किल्ला जिंकायचा होता. तो जिंकल्याशिवाय राज्याभिषेक करायचा नाही असे त्यांनी ठरवले होते. पन्हाळा आणि त्याच्या आसपासच्या परिसरात आदिलशाहचा जनतेवरील वाढता अत्याचार महाराजांना सहन होत नव्हता. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पन्हाळा जिंकायला हवा असे महाराजांना वाटत होते. त्याकरिता त्यांनी आपला शूर मावळा कोंडाजी फर्जंद याच्यावर ही सगळी जबाबदारी सोपविली आणि केवळ ६० मावळ्यांच्या साथीने कोंडाजीने विजापुरी अडीच हजार सैनिकांचा पराभव करून हा किल्ला कसा जिंकला याची ही शौर्यगाथा आहे. 

 farjand

शिवाजी महाराजांच्या ६० मावळ्यांच्या अद्वितीय पराक्रमाची ही कहाणी आहे. खरे तर एखादा ऐतिहासिक चित्रपट काढायचा म्हटलं की मोठा लवाजमा आणि मोठे खर्चिक काम असते. तसेच त्याबाबतीत खूप संशोधनही करावे लागते. त्याबाबतीत केवळ दिग्दर्शकच नाही तर संपूर्ण टीमची कसोटी लागलेली असते. हा चित्रपट पाहताना दिग्दर्शक व लेखक दिग्पाल लांजेकरचे कौतुक करावे लागेल. ही शौर्यगाथा पाहताना दिग्पाल आणि त्याच्या टीमने घेतलेली मेहनत नक्कीच जाणवते. कलाकारांचा सहज सुंदर अभिनय, काही ठसठशीत संवाद, कलादिग्दर्शन अशा काही बाबी या चित्रपटाच्या जमेच्या आहेत. 

मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, प्रसाद ओक, मृण्मयी देशपांडे, गणेश यादव, प्रवीण तरडे, हरीश दुधाडे, राहुल मेहेंदळे, अजय पूरकर, नेहा जोशी, समीर धर्माधिकारी अशा सर्वच कलाकारांनी आपापली कामगिरी चोख केली आहे. विशेष कौतुक करावे लागेल ते कोंडाजी फर्जंद बनलेल्या अंकित मोहनचे. त्याने आपल्या भूमिकेवर जबरदस्त मेहनत घेतली आहे. शिवाजी महाराजांची भूमिका चिन्मय मांडलेकरने साकारली आहे; तर जिजाऊंच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी आहे. यातील प्रत्येक कलाकाराने भूमिकेतील बारकावे योग्यरित्या पडद्यावर टिपले आहेत. प्रत्येक कलाकाराने आपापल्या भूमिकांमध्ये आपली चमक आणि धमक दाखवली आहे. 

संवादांबरोबरच डोळ्यांतून त्यांनी व्यक्त केलेल्या भावना बोलक्‍या आहेत. या चित्रपटाचे पटकथा व संवाद लेखन दिग्पाल लांजेकरने केले आहे. संवाद उल्लेखनीय झाले आहेत. चित्रपटाला अमित राज यांनी संगीत दिले आहे; तर पार्श्‍वसंगीताची जबाबदारी केदार दिवेकर यांनी सांभाळली आहे.

व्हीएफएक्‍सचा वापरही खुबीने करण्यात आला आहे. एकूणच सगळ्यांची कामगिरी चांगली झाली असली तरी चित्रपटाची लांबी काहीशी खटकते. शिवाय बहिर्जी नाईकांची भूमिका प्रसाद ओकने केली आहे. तो गुप्तहेर असतो आणि तो विविध रूपे धारण करतो. महाराजांच्या दरबारात तो जेव्हा येतो, तेव्हा त्याला केवळ महाराज ओळखतात अन्य कुणी नाही ही बाब खटकते. एकूणच सांगायचे झाले तर दिग्पाल आणि टीमचा हा प्रयत्न चांगला आहे. आजच्या पिढीला हा इतिहास समजणे आवश्‍यक आहे. संपूर्ण कुटुंबाने शिवाजी महाराजांच्या ६० मावळ्यांच्या पराक्रमाची ही शौर्यगाथा पाहायला हवी अशीच आहे. इतिहासाचं हे स्फूर्तिदायी सिनेमॅटिक पान अप्रतिम दृष्यानुभव देण्यात यशस्वी झालं आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farjand historic marathi movie review