'फर्जंद'च्या दिग्दर्शकाची प्रकृती बिघडली; सोशल मीडियावर लिहिली पोस्ट

digpal lanjekar
digpal lanjekar

'फर्जंद', 'फत्तेशिकस्त' यांसारख्या ऐतिहासिक चित्रपटांचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांची प्रकृती बिघडली. पुण्याहून मुंबईला जाताना प्रवासादरम्यान चक्कर आल्याने त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या छातीतही दुखत होतं. दिग्पाल यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबद्दल उलट-सुलट चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांनी फेसबुकवर पोस्टद्वारे दिली. त्याचसोबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असंही आवाहन त्यांनी चाहत्यांना केलं. 

'मित्रांनो, माझी तब्येत आता ठीक आहे. तुम्ही सर्वांनी दाखवलेल्या  काळजीबद्दल  सर्वांचे मनापासून धन्यवाद. कृपया कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आई भवानी आणि छत्रपती शिवराय यांचा आशीर्वाद पाठीशी आहेच. लवकरच सर्व ठीक होईल पण काही दिवस सक्तीची विश्रांती सांगितली आहे. औषधे आणि विश्रांती पूर्ण झाली की पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात करेन,' अशी पोस्ट त्यांनी फेसबुकवर लिहिली. 

मंगळवारी दिग्पाल आणि त्यांचे सहकारी सुश्रुत मंकणी हे पुण्याहून मुंबईला जात होते. प्रवासादरम्यान दिग्पाल यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं. याविषयी सुश्रुत एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, "दिग्पाल काही वेळासाठी बेशुद्ध झाले होते. आम्ही तात्काळ त्यांना पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात दाखल केलं. आवश्यक त्या चाचण्या केल्यानंतर डॉक्टरांनी काळजी करण्याचं कारण नसल्याचं स्पष्ट केलं. तणावामुळे हा त्रास झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं."

दिग्पाल लांजेकर यांचा 'पावनखिंड' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच चित्रपटाच्या कामात ते सध्या व्यग्र आहेत. त्यांच्या 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त' या चित्रपटांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला होता. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com