महानायकाची चित्रपन्नाशी !

रमेश डोईफोडे
सोमवार, 9 डिसेंबर 2019

चित्रपटासारख्या कलाक्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींबद्दल सर्वसामान्यांत विशिष्ट समज आहेत. त्यामुळे अमुक एका नटाचा किंवा नटीचा आदर्श घे, असा सल्ला कोणतेही आई-वडील आपल्या मुलांना देत नसतील. अमिताभ त्याला खचितच अपवाद ठरत असेल.

पुणे : चित्रपटासारख्या कलाक्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींबद्दल सर्वसामान्यांत विशिष्ट समज आहेत. त्यामुळे अमुक एका नटाचा किंवा नटीचा आदर्श घे, असा सल्ला कोणतेही आई-वडील आपल्या मुलांना देत नसतील. अमिताभ त्याला खचितच अपवाद ठरत असेल. ‘जीवनात कितीही अपयश, संकटे आली तरी न खचता त्यांना जिद्दीने सामोरे जा, पुन्हा शून्यातून विश्‍व उभारता येते,’ हे त्याने त्याच्या संघर्षमय वाटचालीत सिद्ध करून दाखविले आहे. तो आदर्श सर्वांसाठीच अनुकरणीय आहे.

Image may contain: 1 person, standing

सुरुवातीला प्रचंड अपयश, पदोपदी वाट्याला आलेली अवहेलना, त्यावर खंबीरपणे मात करून मिळविलेले उत्तुंग यश, नंतर नवीन कंपनी काढण्याचे केलेले साहस आणि त्यात आलेले प्रचंड अपयश, दिवाळखोरीचे ओढवलेले संकट, जे मिळवले ते सगळे धुळीला मिळाल्यात जमा अशी अवस्था, त्यावर जिद्दीने मात करून पुन्हा फीनिक्‍स पक्ष्याप्रमाणे घेतलेली भरारी... एखाद्या चित्रपटाचा विषय व्हावी, अशी ही खरीखुरी कथा. तिचा महानायक आहे - अमिताभ बच्चन! त्याच्या या प्रेरणादायक कारकिर्दीला, अजूनही तेवढ्याच उमेदीने सुरू असलेल्या प्रवासाला या महिन्यात पन्नास वर्षे पूर्ण झाली. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील हा एक अविस्मरणीय सुवर्णमहोत्सव आहे. 

Image may contain: 1 person

अविश्रांत वाटचाल 
ख्वाजा अहमद अब्बास यांचा ‘सात हिंदुस्थानी’ हा अमिताभचा पहिला चित्रपट. तो प्रदर्शित झाला ७ नोव्हेंबर १९६९ रोजी. त्याला आता पन्नास वर्षे झाली. म्हणून हा सुवर्णमहोत्सव. (हा चित्रपट त्याने त्याच वर्षी १५ फेब्रुवारीला साईन केला होता. त्यामुळे अनेकांनी त्याचा हा सुवर्णटप्पा फेब्रुवारीतही साजरा केला.) पाच दशकांपूर्वी सुरू झालेला त्याचा हा प्रवास आजही तेवढ्याच जोमाने सुरू आहे. पन्नास वर्षे!.. एखाद्या क्षेत्रात एवढा प्रदीर्घ काळ टॉपवर राहणे जाऊ द्या, केवळ टिकून राहणेदेखील सोपी बाब नाही. अमिताभच्या समकालीन म्हणता येईल, असा एकही अभिनेता-अभिनेत्री चित्रपटसृष्टीत आत्ता सक्रिय नाही. बव्हंशी मंडळी काही वर्षांपूर्वीच निवृत्त झाली; पण अमिताभच्या शब्दकोशातच आराम हा शब्द नाही. तो वयाच्या ७८ व्या वर्षातही पूर्वीएवढाच व्यग्र आहे. 

Image may contain: 1 person, glasses

सुरुवातीला केवळ उपेक्षा 
‘सात हिंदुस्थानी’ने अमिताभला चित्रपटसृष्टीचा दरवाजा खुला केला. तथापि, यशाने प्रारंभी सतत हुलकावणी दिली. ताडमाड उंच, हडकुळा, सर्वसाधारण चेहरेपट्टी असलेला हा तरुण नायकाची भूमिका मागतो आहे, याबद्दलच त्याची थट्टा होत होती. अमिताभचा आवाज हे त्याचे खूप महत्त्वाचे बलस्थान; पण त्या काळात या आवाजालाही नाकारले गेले. त्याचा आवाज चांगला नाही, असे कारण देऊन आकाशवाणी नभोवाणी केंद्राने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला होता. अशा प्रकारे सगळीकडून नकारघंटा ऐकायला मिळत होती. या प्रतिकूल परिस्थितीत काही चित्रपट त्याच्या पदरी पडले; परंतु व्यावसायिकदृष्ट्या त्यांना फारसे यश मिळाले नाही. असे किमान ११ चित्रपट पडद्यावर कधी आले आणि गेले, हे कळलेच नाही. दरम्यान, हृषिकेश मुखर्जींच्या ‘आनंद’ आणि ‘नमकहराम’ या चित्रपटांनी त्याच्या अभिनयाचे नाणे किती खणखणीत आहे, हे दाखवून दिले. तेव्हाचा सुपरस्टार राजेश खन्ना या दोन्ही चित्रपटांत मुख्य भूमिकेत असूनही अमिताभने आपली चमक दाखवली. नंतर १९७३ मध्ये ‘जंजीर’ आला आणि एका नव्या सुपरस्टारचा उदय झाला. 

Image may contain: 7 people, people sitting, table and indoor

काटेकोर शिस्त, व्यावसायिकता 
हा बदल केवळ दोन अभिनेत्यांच्या संदर्भातील उदय-अस्ताचा नव्हता, तर त्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीचे समीकरण बदलून गेले. चॉकलेट हिरोंचा- रोमॅंटिक चित्रपटांचा ट्रेंड मोडीत निघाला आणि ‘अँग्री यंग मॅन’चा बोलबाला सुरू झाला. चमच्यांच्या कंपूत रमणे, वेळेची शिस्त कधीही न पाळणे, निर्मात्यांना हैराण करणे यांसाठी तेव्हा अनेक हिरो (कु)प्रसिद्ध होते. नव्या सुपरस्टारने ही संस्कृती बदलली. या क्षेत्राला अपरिचित असलेली ‘व्यावसायिकता’ जपण्यास त्याने आपल्या बाजूने सुरुवात केली. हा सुखद बदल अनेकांना अनपेक्षित होता. अमिताभची ही व्यावसायिकता आणि कामाप्रतीची निष्ठा आजही कायम आहे. 

Image may contain: 2 people

स्टार आणि अॅक्टरही
उच्चतम अभिनयक्षमता असूनही अपेक्षित व्यावसायिक यश मिळाले नाही, असे अनेक अभिनेते हिंदी चित्रपटसृष्टीत आहेत. ते ‘स्टार’ म्हणून प्रस्थापित होऊ शकले नाहीत. दुसऱ्या बाजूला काही जण ‘स्टार’ म्हणून मोठे आहेत; पण अभिनयाच्या पातळीवर त्यांच्याबद्दल फार चांगले बोलता यावे, अशी परिस्थिती नाही. अमिताभचे वेगळेपण असे की त्याने एक ‘ अॅक्टर’ आणि ‘स्टार’ म्हणूनही अत्युच्च उंची गाठली आहे. दोन्ही पातळ्यांवर अशी कामगिरी आजवर किती जणांना जमली?.. उत्तरासाठी फारच अभ्यास करावा लागेल! 

Image may contain: 2 people

असाधारण विजिगीषू वृत्ती 
अमिताभचा अभिनय, त्याच्याभोवती असलेले वलय याविषयी आजवर खूप काही लिहिले गेले आहे. त्याखेरीज कोणालाही प्रेरणादायी ठरेल असा त्याच्यातील महत्त्वाचा गुण म्हणजे त्याची विजिगीषू वृत्ती. त्याच्या आयुष्यात आजवर असंख्य समरप्रसंग आले. ‘वन मॅन इंडस्ट्री’ म्हणून ज्याचे वर्णन केले जायचे, त्या महानायकाला एका विशिष्ट टप्प्यावर कोणी नवीन चित्रपट द्यायला तयार नव्हते. मोठे इव्हेंट, चित्रपटनिर्मिती करण्यासाठी स्थापन केलेली कंपनी आर्थिकदृष्ट्या गाळात गेली, मायस्थेनिया ग्रॅव्हिससारखा गंभीर आजाराने ग्रासले, पोटाच्या विकारावर उपचारासाठी वेळोवेळी शस्त्रक्रिया कराव्या लागल्या, ‘कुली’चे चित्रीकरण सुरू असताना झालेल्या अपघातानंतर जीवन-मरणाची लढाई लागली.. एखाद्याच्या आयुष्यात संकटे तरी किती यावीत? आता सगळे संपले, असे वाटावे अशी वेळ अनेकदा ओढवली; पण या सर्व प्रतिकूल परिस्थितीवर त्याने हिकमतीने मात केली. 

Image may contain: 1 person, night and close-up

‘एबीसीएल’चे अपयश 
अमिताभने नव्वदच्या दशकात ‘अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड’ची (एबीसीएल) स्थापना केली. ‘मिस वर्ल्ड’सारखे आंतरराष्ट्रीय इव्हेंट आयोजित करणे, चित्रपटांची निर्मिती आणि वितरण करणे, म्युझिक अल्बम तयार करणे ही त्याची मुख्य उद्दिष्टे होती. त्यानुसार या कंपनीने वाटचाल सुरू केली; पण हा उद्योग अमिताभच्या अंगलट आला. जे चित्रपट निर्माण केले, ते एकतर फ्लॉप झाले किंवा तिकीटबारीवर कसेबसे पास झाले. ‘मिस वर्ल्ड’चा उपक्रम आर्थिकदृष्ट्या आतबट्ट्याचा ठरला. त्यातून कंपनी हळूहळू दिवाळखोरीच्या दिशेने जाऊ लागली. कर्जाचा डोंगर वाढत गेला. कोर्टकज्जे सुरू झाले. कंपनी अखेर ‘आजारी’ पडली. हा कालखंड अमिताभच्या दृष्टीने अतिशय खडतर होता. या परिस्थितीत उद्योगपती धीरूभाई अंबानी यांनी त्याला कर्जमुक्त होण्यासाठी हवी ती मदत करण्याची तयारी दाखवली होती. त्यांचे पुत्र अनिल अंबानी त्यासाठी अमिताभला भेटले; पण त्याचा आत्मविश्‍वास पाहा. आपण या संकटातून स्वतःच्या हिमतीवर निभावून जाऊ, ही खात्री त्याला असल्याने त्याने अंबानींची मदत नम्रपणे नाकारली. रिलायन्स इंडस्ट्रीच्या एका कार्यक्रमात अमिताभने ही आठवण जाहीरपणे सांगून धीरूभाईंविषयी कृतज्ञता व्यक्त केली होती. 

Image may contain: 1 person, outdoor and close-up

संकट ठरले इष्टापत्ती 
अमिताभच्या कारकिर्दीतील नव्या पर्वासाठी हे संकट म्हणजे एक इष्टापत्ती ठरली. त्या वेळी, म्हणजे २००० च्या सुमारास कोणताही निर्माता त्याला चित्रपटात काम देण्यास तयार नव्हता. त्यामुळे अर्थार्जनाचा मुख्य स्रोत बंद पडला होता. कर्जफेडीच्या मागणीसाठी बॅंकांसह वेगवेगळ्या वित्तसंस्थांचा ससेमिरा सुरू होता. अशा वेळी करायचे तरी काय, हा गहन प्रश्‍न समोर असताना त्याच्यापुढे अचानक ‘कौन बनेगा करोडपती’ टीव्ही मालिकेचा प्रस्ताव आला. त्या वेळी मोठ्या पडद्यावरील बड्या स्टारने टीव्हीच्या छोट्या पडद्यावर येणे, हे अवनतीचे लक्षण मानले जायचे. टीव्हीवर दिसतोय म्हणजे चित्रपटांतील सद्दी संपली, असे तेव्हाचे समीकरण होते. त्यामुळे खुद्द अमिताभच्या घरातून या प्रस्तावाला मोठा विरोध झाला; पण अमिताभने परिस्थितीची गरज म्हणून हे आव्हान स्वीकारले. त्यातून टीव्ही इंडस्ट्रीची सगळी समीकरणेच बदलून गेली. यापूर्वी मोठा पडदा आपल्या भारदस्त व्यक्तिमत्त्वाने व्यापून टाकणारा अमिताभ आता तोच चमत्कार टीव्हीवरही दाखवू लागला. या ‘शो’ने अनेक जणांना करोडपती केले आणि अमिताभवरील आर्थिक अरिष्टही दूर केले. 

Image may contain: 2 people, close-up

छोट्या पडद्याचाही शहेनशहा 
अमिताभचे काही चित्रपट तेव्हा फ्लॉप झाले असले, तरी चाहत्यांवरील त्याची जादू तसूभरही कमी झालेली नाही. हे ‘करोडपती’च्या निमित्ताने स्पष्ट झाले. २००० पासून आतापर्यंत या शोचे ११ सीझन झाले आहेत. त्यातील, शाहरुख खानने केलेल्या तिसरा सीझनचा अपवाद वगळता अमिताभ सलगपणे हा शो करीत आहे. आपण अमिताभच्या तोडीस तोड आहोत, हे दाखविण्याचा प्रयत्न शाहरुख नेहमीच करीत असतो. या शोचे सूत्रसंचालन करून हेच सिद्ध करण्याचा त्याचा प्रयत्न असावा; पण त्यात त्याला यश आले नाही. कारण त्याच्या सीझनला अपेक्षित ‘टीआरपी’ मिळाला नाही. अमिताभचे व्यक्तिमत्त्व, त्याची नम्रता-अदब, भारदस्त आवाज, विश्‍वासार्हता या सगळ्यांची तुलना नवीन सूत्रसंचालकाशी केली गेली. त्यात सरस कोण आहे, याचा निर्णय प्रेक्षकांनी ‘टीआरपी’च्या माध्यमातून दिला आणि शोची सूत्रे पुन्हा अमिताभकडे सोपविण्यात आली. 

Image may contain: 3 people, people standing and outdoor

ऐंशीच्या उंबरठ्यावर 
वयोमानानुसार अमिताभला अनेकदा प्रकृतीच्या तक्रारींना सामोरे जावे लागते. आताही डॉक्‍टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून त्याचे दिवस-रात्र काम करणे सुरूच आहे. चित्रपट, टीव्ही शो, जाहिराती यांतून त्याला उसंत नाही. वयाच्या ७८ व्या वर्षीदेखील जनमानसावर अमीट पगडा असलेले अमिताभसारखे दुसरे उदाहरण आज देशात नाही. नुकताच त्याला कला क्षेत्रातील सर्वोच्च ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर झाला आहे. हा सन्मान त्याला तसा उशिराच मिळत आहे. अर्थात अमिताभसारख्या कलावंतांची उंची कोणत्याही मान-सन्मानावर अवलंबून नसते. त्याच्यासारखा कलाकार शतकातून एखादा पाहायला मिळतो. त्याचे वर्णन कोणत्या शब्दांत करणार? 

Image may contain: 2 people, people smiling, outdoor and text

कौतुकाला शब्दांची मर्यादा 
अमिताभच्या अनेक चित्रपटांचे कथा-पटकथाकार जावेद अख्तर यांनी एका कार्यक्रमात त्याची प्रशंसा करताना म्हटले होते ः ‘अमिताभच्या कर्तृत्वाचे यथार्थ वर्णन करू शकेल, असा शब्दच तयार झालेला नाही. कारण त्याच्यासारख्या व्यक्ती दुर्मीळ असतात. जो कौतुकाचा शब्द वापरण्याची संधी पाच-पन्नास वर्षांत क्वचित मिळणार आहे, तो कोणी तयारच का करेल?...’ यापेक्षा आणखी कोणत्या चपखल शब्दांत अमिताभचे वर्णन करता येईल?

Image may contain: 2 people, glasses and text


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fifty years in the industry of amitabh bacchan