चित्रपटसृष्टीचा ‘उद्योग’ व्हावा!

संतोष भिंगार्डे
शनिवार, 16 फेब्रुवारी 2019

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक धुंडीराज गोविंद ऊर्फ दादासाहेब फाळके यांचा १६ फेब्रुवारीला स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त चित्रपटसृष्टीत कालौघात झालेले बदल आणि त्यांचा रुपेरी पडद्यावरील परिणाम यांचा हा आढावा.

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक धुंडीराज गोविंद ऊर्फ दादासाहेब फाळके यांचा १६ फेब्रुवारीला स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त चित्रपटसृष्टीत कालौघात झालेले बदल आणि त्यांचा रुपेरी पडद्यावरील परिणाम यांचा हा आढावा.

भारतात चित्रपटाची मुहूर्तमेढ दादासाहेब फाळके यांनी रोवली, त्यांनी लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. प्रचंड वेगाने चित्रपटसृष्टीचा विकास झाला. येथे कोट्यवधींची उलाढाल होत असली, तरी अद्याप त्याला ‘उद्योगाचा दर्जा’ मिळालेला नाही. पाचेक वर्षांत हिंदीसह मराठी चित्रपटसृष्टीनेही मोठी भरारी घेतली. पूर्वी वर्षाला ८०-९० मराठी चित्रपटांची निर्मिती होत असे. आता हा आकडा शंभरावर पोचला आहे. हिंदी चित्रपटांची संख्या २०० ते ३०० च्या आसपास आहे. सगळ्यात मोठा प्रश्‍न आहे तो ‘पायरसी’चा. राज्य सरकार असो की केंद्र चित्रपटाची पायरसी रोखण्यासाठी कायदे किंवा नियम करते खरे; परंतु त्यात अपेक्षेप्रमाणे यश आलेले नाही. अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीला बाह्य चित्रीकरणासाठी विविध विभागांची किंवा खात्यांची परवानगी घ्यावी लागत होती; मात्र आता सरकारने एक खिडकी योजना सुरू केल्याने सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळतील. 

गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी अर्थात ‘फिल्मसिटी’च्या विकासासाठी मास्टर प्लान तयार आहे. यामुळे चित्रनगरीचा चेहरामोहरा बदलणार आहे. सुमारे २६०० कोटींचा हा प्रकल्प केव्हा मार्गी लागेल याची उत्सुकता साऱ्यांनाच आहे. कोल्हापूरची चित्रनगरी उत्तम सुरू आहे. मराठी, हिंदी चित्रपटांची निर्मिती वाढली; मात्र त्या प्रमाणात चित्रपटगृहे अपुरी आहेत. तालुका आणि गावपातळीवर २५० ते ३०० आसनांच्या चित्रपटगृहांची गरज आहे.

मराठी चित्रपटांना सरकार जे अनुदान देते त्याची रक्कम वाढवण्याची गरज आहे. अनुदानासाठी जे चित्रपट पाहिले जात आहेत, त्यांची स्क्रीनिंग प्रक्रिया वेळेत होणे आवश्‍यक आहे. एसटी स्थानक परिसरात छोटी-छोटी चित्रपटगृहे उभारण्याची आवश्‍यकता आहे.
- विजय कोचीकर, सहकार्यवाह, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ

प्रादेशिक भाषांतील चित्रपट केवळ भारतापुरते मर्यादित न राहता ते मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही प्रदर्शित होणे आवश्‍यक आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टीचा आणि निर्मात्यांचाही फायदा होईल.
- उज्ज्वल निरगुडकर, सदस्य, ऑस्कर अकादमी

शंभर कोटींचे संग्रहालय
मुंबईतील पेडर रोड येथे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय उभारण्यात आले आहे. चित्रपटसृष्टीचा १०० वर्षांचा इतिहास येथे पाहायला मिळेल. सुमारे १५० कोटी रुपये याकरिता खर्च करण्यात आले आहेत. हिंदी, मराठीसह अन्य प्रादेशिक भाषांतील चित्रपटांची माहिती येथे मिळेल. राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘सरस्वतीबाई फाळके मराठी चित्रपट संग्रहालय’ या योजनेद्वारे मराठी चित्रपटांच्या संग्रहासाठी प्रथमच वेगळा निधी उपलब्ध झाला आहे.

Web Title: Film Industry Dadasaheb Phalke Memory day special