ड्रिप्रेशनवरील 'कासव'ने उघडले मनाचे कवडसे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मार्च 2017

या लघुपटांचे सादरीकरण
आज दिवसभरात 23 लघुपट दाखविण्यात आले. यामध्ये वेगवेगळ्या सामाजिक विषयांवरील लघुपटांचा समावेश होता. 'गंगा मा का दर्द', '4-30 दी लुनार मन्थ', 'द पॉवर ऑफ ई', 'भूदेव', 'सावधान - बी अलर्ट', 'स्क्रॅच', 'दी सीड', 'प्रिडीलेस', 'प्रेझेंटेशन', 'भोपळा', 'सिंपल', 'स्वच्छ भारत', 'गांधीजी के बंदर', 'परिणाम', 'संस्कार', 'मी ऍण्ड माय', 'ह्यूमन गारबेज', 'क्‍लीन ऍण्ड क्‍लिक', 'जाई', 'मजूर', 'दी लास्ट वन', '93 नॉटआउट' हे लघुपट आज दाखविण्यात आले.

नाशिक : लहानपणापासून आपल्या मनावर बिंबविले आहे, की चित्रपट हे करमणुकीचे माध्यम आहे. चित्रपटातील संवाद, त्यातील दृश्‍यामुळे नकळत आपण आपली मते बनवितो. त्या मतांवरच आपला दृष्टिकोन ठरतो. जर चित्रपटातून चुकीची माहिती दाखविली गेली तर चुकीचे मत तयार होण्याची शक्‍यता आहे. चित्रपट हे लोकशिक्षणाचे माध्यम असल्यामुळे सर्व उपयुक्त माहिती त्यातून दाखविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी केले.

रावसाहेब थोरात सभागृहात सुरू असलेल्या 'निफ' फेस्टिव्हलमध्ये ते बोलत होते. डिप्रेशन समस्येवर आधारित त्यांचा 'कासव' हा चित्रपट या वेळी दाखविण्यात आला. निफ फेस्टिव्हलचे संयोजक मुकेश कणेरी यांनी डॉ. आगाशे यांचा सत्कार केला. त्यानंतर आज जे लघुपट दाखविण्यात आले त्यांच्या निर्मात्यांचा डॉ. आगाशे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
डॉ. आगाशे म्हणाले, की आपल्याला माहिती खूप असते पण अनुभव कमी असतो. प्रत्यक्ष अनुभव घेणे आणि माहिती असणे यात फरक आहे. कोणताही चित्रपट बघतो तेव्हा आपण करमणूक शोधतो. चित्रपटातून करमणूक जरी होत असली तरी कळत नकळत चित्रपटातील कलाकारांमध्ये होणारे संवाद, त्यातील दृश्‍य यामुळे आपण आपली मते बनवत असतो. त्यामुळे चित्रपट हा वास्तवतेवर आधारित असावा. एरवी फेस्टिव्हलकडे न फिरकणाऱ्या नाशिककरांनी आज या चित्रपटाला मोठ्या संख्येने हजेरी लावली. चित्रपट संपल्यानंतर प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्‍नांना त्यांनी उत्तरे दिली.

आज सकाळच्या सत्रात आठ लघुपट दाखविण्यात आले. त्यानंतर दास्ता-ए-रफी ही डाक्‍युमेंटरी फिल्म दाखविण्यात आली. दुपारी उपमहापौर प्रथमेश गिते यांनी या फेस्टव्हलला भेट दिली. सायंकाळच्या सत्रात फॅशन शो झाला. यामध्ये आज टॅलेंट राउंड घेण्यात आला. सुरवातीला लहान मुलांचा राउंड झाला. त्यानंतर मोठ्या मुला-मुलींचा राउंड झाला. या फॅशन शोला चांगला प्रतिसाद मिळाला. उद्या (ता. 26) 'निफ' फेस्टिव्हलचा समारोप होणार आहे.

Web Title: film is medium of public education : actor mohan agashe