आर्टिकल 15 : अब फर्क लाऐंगे...(चित्रपट परीक्षण)

महेश बर्दापूरकर
Friday, 28 June 2019

"फर्क बहोत कर लिया, अब फर्क लाऐंगे...' "आर्टिकल 15' या अनुभव सिन्हा दिग्दर्शित चित्रपटाच्या शेवटी चालणाऱ्या रॅप सॉंगच्या हॅंगओव्हरमधून प्रेक्षक पुढचे अनेक तास बाहेर पडत नाही...घटनेच्या 15व्या कलमात जात, धर्म, वर्ण, लिंग याआधारावर नागरिकांमध्ये भेदभाव करता येणार नाही असं स्पष्ट लिहिलंय. मात्र, आजही देशात, त्यातल्या त्यात उत्तर प्रदेशासारख्या राज्यात जातीय आधारावर काय प्रकारचा भेदभाव केला जातो हे आपण बातम्यांमध्ये ऐकतो.

"फर्क बहोत कर लिया, अब फर्क लाऐंगे...' "आर्टिकल 15' या अनुभव सिन्हा दिग्दर्शित चित्रपटाच्या शेवटी चालणाऱ्या रॅप सॉंगच्या हॅंगओव्हरमधून प्रेक्षक पुढचे अनेक तास बाहेर पडत नाही...घटनेच्या 15व्या कलमात जात, धर्म, वर्ण, लिंग याआधारावर नागरिकांमध्ये भेदभाव करता येणार नाही असं स्पष्ट लिहिलंय. मात्र, आजही देशात, त्यातल्या त्यात उत्तर प्रदेशासारख्या राज्यात जातीय आधारावर काय प्रकारचा भेदभाव केला जातो हे आपण बातम्यांमध्ये ऐकतो.

बदायूं या गावात 2014मध्ये दोन दलित मुलींच्या सामूहिक बलात्कारानंतर केलेल्या हत्या व त्यांना एका झाडाला लटकवल्याची छायाचित्रं वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर झळकली आणि देश हादरला होता. या सत्यघटनेवर आधारित हा चित्रपट देशातील एससी, एसटी, ओबीसी, दलित, यादव, ब्राह्मण अशा विविध जाती आणि त्यांच्या पोटजातींमधील भेदाभेद, रोजंदारीमध्ये केवळ तीन रुपयांची वाढ मागितल्यानं मुलींचं केलेलं अपहरण, बलात्कार व हत्या, या घटनेला पोलिस, राजकारणी आणि सीबीआयसारख्या संस्थांनी दिलेली अनाकलनीय वळणं या सर्वांचा अंतर्मुख करणारा, स्वतःची लाज वाटावी अशी परिस्थिती निर्माण करणारा पट हा चित्रपट मांडतो. कथा, पटकथा, पार्श्‍वसंगीत, अभिनय या सर्वच आघाड्यांवर दमदार कामगिरी करतो.

आयपीएस ऑफिसर आर्यन रंजन (आयुष्यमान खुराणा) दिल्लीत एका सचिवाला डिवचतो आणि त्याची बदली उत्तर प्रदेशातील लालगाव इथं होते. परदेशात शिकलेला, शहरी मानसिकतेचा, देशातील जातीपातीच्या राजकारणाचा गंधही नसलेल्या आर्यनपुढं गावात पोचताच मोठा समर प्रसंग उभा राहतो. दोन मुली घरातून गायब असतात, मात्र पोलिस "या लोकांमध्ये' कायमच असं होत असतं, असं सांगून गुन्ह्याची नोंद करून घ्यायलाही तयार नसतात. "हे लोक' म्हणजे कोण, याचा उलगडा आर्यनला होतो, तेव्हा त्याला मोठा धक्का बसतो. घटनेनं सर्वांना समान अधिकार दिलेले असताना हा भेदभाव त्याच्या डोक्‍यात जातो आणि तो या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करू लागतो. दोन मुलींची प्रेतं झाडाला टांगलेली सापडतात आणि एक बेपत्ता असते. ऑनर किलिंगच्या नावाखाली ही फाइल बंद करण्याचा प्रयत्न ब्रह्मदत्त (मनोज पाहवा) हा अधिकारी करू पाहतो. बेपत्ता मुलीची बहीण गौरा (सयानी गुप्ता) रंजनकडं साकडं घालते. गौराचा प्रियकर आणि दलितांच्या हक्कांसाठी लढणारा कार्यकर्ता निशाद (मोहमंद झिशान अयुब) रंजनला मदत करू पाहतो. रंजन तपासाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पोचताच चौकशीची सूत्र सीबीआयच्या हातात दिली जातात आणि रंजनलाच चुकीच्या तपासाबद्दल निलंबित केलं जातं...रंजन शोध घेत असलेली तिसरी मुलगी सापडते का व या दोन मुलींना कशाप्रकारे न्याय मिळतो हा चित्रपटाचा शेवट सुन्न करून जातो. 

देशाच्या मागास भागांत आजही जातीय समीकरणांचं "संतुलन' कसं राखला जातं, याचं चित्रण हा चित्रपटाचा आत्मा आहे. "सब बराबर हो गये, तो राजा कौन बनेगा,' हा इथला कळीचा मुद्दा. त्यासाठी मागास जातींना पुढं येऊच द्यायचं नाही हा "संतुलना'चा मूलमंत्र. पगार तीन रुपयांनी वाढण्याचा मुद्दा नसून, त्यांची "औकात' दाखवणं हा असल्याचा उच्चवर्णीयांचा दावा...त्यांना अधिकार दिल्यास आपली तुंबलेली गटारं साफ कोण करणारा, हा उच्चवर्णीयांचा मुद्दा! या परिस्थितीत दलित नेते राजकारण करून मोठे होतात व नंतर आपल्या लोकांनाच कसं विसरतात, याचं वास्तव निशादवर झालेल्या अन्यायातून समोर येत राहतं. हा संघर्ष चालू असताना रंजन दिल्लीतील त्याची मैत्रीण आदितीशी (इशा तलवार) बोलत राहतो आणि त्यातून त्याची मानसिकता व उत्तरं शोधण्याची तळमळ दिसत राहते. आपल्या लोकांसाठी त्याग करणारा निशाद मरताना "हम आखरी थोडे है ना...' असं म्हणत हा संघर्ष कायम चालू राहील याची ग्वाही देतो, तर तिसऱ्या मुलाला शोधण्यासाठी गाळात उतरत "ब्राह्मण को भी इसमे उतरना होगा,' असं म्हणत रंजन ही लढाई कुठपर्यंत घेऊन जावी लागणार आहे, याचा अंदाज देतो. चित्रपटातील असे प्रसंग आणि संवाद हीच चित्रपटाची ताकद आहे. 

आयुष्यमान खुराणानं साकारलेला पोलिस अधिकारी अगदी परफेक्‍ट. उच्चशिक्षित अधिकाऱ्याला मनातील द्वंद्व, जातीय भेदाभेदाचं गणित न समजल्यानं गोंधळून जाणं आणि शेवटी धैर्यानं हा प्रकरणाचा निकाल लावणं त्यानं छान साकारलं आहे. मनोज पहावा, सयानी गुप्ता, मोहंमद झिशान अयुब, कुमुद मिश्रा, इशा तलवार, रंजिनी चक्रवर्ती आदी कलाकारांनी छोट्या भूमिकांत कमाल केली आहे. 

जातीपातीच्या भेदभावातून देश बाहेर पडायचा असल्यास अशा प्रकारचं झणझणीत अंजन डोळ्यात घालण्याची गरज आहेच. "व्हेअर इज द जोश' म्हणत देशप्रमाचे उमाळे देताना आपलीच ही भयावह, बरबटलेली बाजू प्रत्येक नागरिकाला दिसंल, तोच सुदिन..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Film review Article 15 locates caste at the heart of darkness