'बदला' : चक्रव्यूहांना भेदण्याचे "महाभारत' 

badla
badla

सुजॉय घोष यांचे "कहानी' किंवा "तीन'सारखे चित्रपट पाहिलेल्यांना हा दिग्दर्शक थ्रिलर चित्रपट कशा पद्धतीनं पेश करतो, याचा अंदाज आहेच. त्यांनी "द इन्व्हिजिबल गेस्ट' या स्पॅनिश चित्रपटाचा रीमेक करीत "बदला' या चित्रपटातून एक भन्नाट कथा मांडली आहे. क्षणाक्षणाला ट्‌विस्ट घेणारं कथानक, अत्यंत नेमकी पटकथा, अमिताभ बच्चन, तापसी पन्नू आणि अमृता सिंगसारख्या कलाकारांचा जबरदस्त अभिनय आणि दिग्दर्शनाच्या जोरावर चित्रपट दोन तास खुर्चीला खिळवून ठेवतो. अशा प्रकारची कथानकं पाहण्यात रस असणाऱ्यांसाठी चित्रपट मेजवानीच ठरतो. 

नयना सेठी (तापसी पन्नू) एक यशस्वी उद्योजिका आहे. पती व मुलीबरोबर राहणाऱ्या नयनाचं एका युवकाशी अफेअर आहे. याच युवकाचा एका हॉटेलमध्ये खून होतो आणि संशय नयनावर येतो. या आरोपातून सहीसलामत सुटण्यासाठी ती आजपर्यंत एकही खटला न हरलेले वकील बादल गुप्ता (अमिताभ बच्चन) यांची मदत घेते. बादल नयनाला एक-एक प्रश्‍न विचारीत तिचं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. या हत्येच्या आधी नयना व तिच्या मित्राच्या हातून एक अपघातही झालेला असतो व त्यात एक युवक मारला गेलेला असतो. आता नयनाची गोष्टी अधिक गुंतागुंतीची बनते.

पुरावे "उभे' करण्यात हातखंडा असलेले बादल नयनाची केस कशी हाताळतात याचा श्‍वास रोखून ठेवायला लावणारा भाग पुढंच सुरू होतो... 
एका यशस्वी चित्रपटाचं कथानक असल्यानं दिग्दर्शकाला कथेच्या पातळीवर थोडी कमी मेहनत घ्यावी लागली आहे, हे नक्की. मात्र कथेचं काही अंशी भारतीयकरण करताना व त्यातील ट्‌विस्ट मांडताना दिग्दर्शकानं कमाल केली आहे. पडद्यावरील प्रत्येक प्रसंग आणि प्रत्येक फ्रेम प्रेक्षकांना व्यवस्थित पाहावी लागते, तरच पुढचे ट्‌विस्ट समजू शकतात, हे वेगळेपण आणि यशही. या कथा कोणतीही उपकथानकं जोडलेली नाहीत आणि चित्रपटातील वेळेच्या गणितात घड्याळ लावून तीन तासांत संपत असल्यानं तिचा वेगही प्रचंड आहे. महाभारतातील संदर्भ घेत "बदला घेणं ही काही चांगली गोष्ट नाही, मात्र माफ करणंही फारसं योग्य नाही,' हे तत्त्वज्ञान चित्रपट मांडतो. हातात प्रचंड पैसा आणि सत्ता असल्यास कायदा कसाही वळवता येतो, मात्र ज्याची बाजू सत्याची आहे त्याला न्याय मिळाल्यावाचून राहात नाही, असा संदेश देण्याचा प्रयत्नही चित्रपट करतो. सुरवातीला उल्लेख केल्याप्रमाणं कथेतील अनेक ट्‌विस्ट हे चित्रपटाचं बलस्थान ठरतं. 

अमिताभ बच्चन यांचा अभिनय पुन्हा एकदा चित्रपटाचं मोठं आकर्षण ठरला आहे. खटल्यामागील सत्य जाणून घेताना त्यांनी केलेली प्रश्‍नांची सरबत्ती, आपल्या अशिलाच्या डोळ्यात डोळे घालून घटना जाणून घेण्यामागील आवेश, नर्मविनोदी शैलीत केलेले प्रतिप्रश्‍न या सगळ्याला प्रेक्षक टाळ्या वाजवून प्रतिसाद न देतील, तरच नवल. तापसी पन्नूच्या वाट्याला आलेली भूमिका तुलनेनं सोपी आहे आणि अशा प्रकारची भूमिका तिनं इतरही काही चित्रपटांतून केली आहे. तरीही एका यशस्वी उद्योजिकेचा आत्मविश्‍वास आणि समोरच्याला कात्रीत पकडण्यासाठीची हुशारी तिनं छान रंगवली आहे. छोट्या भूमिकेत अमृता सिंग यांनीही कमाल केली आहे. मानव कौलला फारशी संधी नाही. 

एकंदरीतच, प्रत्येकच पात्रानं रचलेल्या चक्रव्यूहांना भेदत सत्यापर्यंत पोचलेलं हे "महाभारत' एकदा पाहायलाच हवं... 

स्टार : 3.5 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com