esakal | Film review: 'सूरज पे मंगल भारी'; मनोरंजनाचे छान पॅकेज
sakal

बोलून बातमी शोधा

Film review: 'सूरज पे मंगल भारी'; मनोरंजनाचे छान पॅकेज

अखेर आता सूरज पे मंगल भारी हाचित्रपट यावर्षीच्या दिवाळीत प्रदर्शित झाला आहे. हा विनोदी चित्रपट आहे आणि सध्या कोरोनामुळे आलेली मरगळ झटकून प्रेक्षकांचे मनोरंजन करील असाच आहे.

 

Film review: 'सूरज पे मंगल भारी'; मनोरंजनाचे छान पॅकेज

sakal_logo
By
संतोष भिंगार्डे


गेले कित्येक महिने चित्रपटगृहे बंद होती आणि आता ती हळूहळू सुरू झाली आहेत. चित्रपटगृहे सुरू झाल्यामुळे नेमका कोणता हिंदी चित्रपट लागेल याबाबत कमालीची उत्सुकता होती. कारण बहुतेक मोठमोठे चित्रपट ओटीटीवर गेल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला होता. कारण दिवाळी आणि मनोरंजन यांचे एक समीकरण असते. अखेर आता सूरज पे मंगल भारी हाचित्रपट यावर्षीच्या दिवाळीत प्रदर्शित झाला आहे. हा विनोदी चित्रपट आहे आणि सध्या कोरोनामुळे आलेली मरगळ झटकून प्रेक्षकांचे मनोरंजन करील असाच आहे.

द कपिल शर्मा शोमध्ये गोविंदाच्या एंट्रीनंतर कृष्णा अभिषेकची एक्झिट - 

अभिषेक शर्माने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची कथा १९९५ साली घडते. सूरज (दिलजित दोसांझ) आणि मंगल (मनोज वाजपेयी) यांच्या भोवती फिरणारी ही कथा आहे. मंगल राणे हा मॅरेज डिटेक्टिव्ह असतो. एखाद्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न जमत असेल त्यांची व्यवस्थित माहिती त्यांच्या त्यांच्या पालकांना तो देत असतो. त्याकरिता तो विविध रुपे धारण करतो. विशेष करून मुलांची माहिती काढून मुलीच्या पालकांना देत असतो. सूरजच्या लग्नातही तो तिढा निर्माण करतो. सूरजचे ज्या मुलीशी लग्न होणार असते त्यांना सूरजची चुकीची माहिती देतो आणि हे लग्न मोडते. साहजिकच सूरजला प्रचंड राग येतो आणि यामागे नेमका कोण आहे याचा शोध सूरज घेतो तेव्हा त्याला कळते की मंगल राणे हा गुप्तहेर आपल्या लग्नात बाधा आणतो आहे. मग त्याच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी त्याची ओळख तुलसी (फातिमा सना शेख) हिच्याबरोबर होते. तुलसी ही मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील मुलगी. सरळ आणि साध्या स्वभावाची. मग सूरज आणि तुलसी यांच्यामध्ये चांगली मैत्री होते आणि प्रेमही जुळते. तुलसी ही मंगल राणेची बहीण असल्याचे जेव्हा सूरजला कळते तेव्हा तो मंगल राणेला धडा शिकवायचाच असे मनोमनी ठरवितो. परंतु मंगल बिलंदर स्वभावाचा असतो. त्याला जेव्हा तुलसी आणि सूरजमध्ये लव्हस्टोरी आहे असे समजते तेव्हा चक्क सूरजच्या घरी जाऊन आपल्या बहिणीसाठी सूरजचा हात मागतो. त्यांचे लग्न ठरते...तारीख ठरते आणि मग काय होते ते प्रत्यक्ष पडद्यावर पाहिलेले बरे.

बिग बॉसच्या घरात एका खास कारणासाठी होणार माजी स्पर्धक मोनालिसाची एंट्री - 

दिग्दर्शक अभिषेक शर्माने पंजाबी आणि मराठी संस्कृती एकत्र दाखविण्याचा प्रयत्न या चित्रपटाद्वारे केला आहे. एक मराठी कुटुंब आणि एक पंजाबी कुटुंब...त्यांच्या घरातील दोन मुख्य चेहरे मंगल आणि सूरज. या दोघांतील हेवेदावे, एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न आणि विविध डावपेच असा सगळा मामला छान जमला आहे. दिलजित दोरांझ, फातिमा सना शेख, मनोज वाजपेयी, सुप्रिया पिळगावकर, अन्नू कपूर या सगळ्या कलाकारांनी चोख अभिनय केला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात मनोज वाजपेयी व दिलजित दोरांझ यांची जुगलबंदी चांगली जमलेली आहे. काही मराठी आणि पंजाबी डायलाॅग नक्कीच दिलखेचक  झाले आहेत. मनोज हा अष्टपैलू कलाकार आहे आणि त्याला कोणतीही भूमिका दिली तर तो तिचे सोने करणार हे ठरलेलेच. मंगल राणेच्या भूमिकेबाबतही असेच म्हणावे लागेल. त्याच्या भूमिकेतला हजरजबाबीपणा लाजबाब. दिलजितने सूरजच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे.

आरआरआरचे दिग्दर्शक एस.एस.राजामौली दिवाळीच्या निमित्ताने चाहत्यांना देणार हे गिफ्ट - 

सुप्रिया पिळगावकर आणि अन्नू कपूर यांनीदेखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्यांनीही चांगलेच रंग चित्रपटात भरले आहेत. फातिमा सना शेखच्या दोन भिन्न व्यक्तिरेखा या चित्रपटात पाहायला मिळतात आणि दोन्ही व्यक्तिरेखामध्ये ती भाव खाऊन गेली आहे. मनोज पाहवा, सीमा पाहवा, विजय राज आणि नेहा पेंडसे या कलाकारांची साथही छान लाभलेली आहे. चित्रपटातील संगीतही चांगले जमलेले आहे. दिग्दर्शक अभिषेक शर्माने ही कथा अगदी सुटसुटीत आणि आटोपशीर मांडली आहे. केवळ आणि केवळ मनोरंजन करण्याचा त्याचा हेतू या कथेतून स्पष्ट होतो. मात्र पूर्वार्धात काहीसा चित्रपट संथ वाटतो. मात्र उत्तरार्धात तो चांगली गती घेतो. एकूणच सांगायचे तर दिवाळीत हे मनोरंजनाचे छान पॅकेज आहे. तद्दन करमणूक करणारा हा चित्रपट आहे.

स्टार - तीन

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )