प्रदर्शनाआधीच 'रिंगण'ची झाली रिकव्हरी; अवघ्या 40 लाखांत बनला सिनेमा.

सौमित्र पोटे
मंगळवार, 27 जून 2017

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिनेमांना काही किंमत नसती असं चित्र गेले काही वर्ष मराठीत आहे. पण रिंगण या चित्रपटाने आपलं वेगळं माॅडेल उभं करून एक नवं गणित मांडलं आहे. म्हणूनच येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार्या या चित्रपटाने आपली सगळी काॅस्ट आधीच वसूल केली आहे.  

पुणे : मराठी सिनेमा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला तसा त्या सिनेमाला असलेलं ग्लॅमर कमालीचं वाढलं. त्यामुळे सिनेमाचं बजेट वाढलं. सिनेमा तयार करायचा असेल तर हाताशी किमान 3 कोटी रूपये लागतात असं बोललं जाऊ लागलं. निर्मातेही तयार होऊ लागले.  बजेट वाढल्यामुळे सगळ्यांचे रेट वधारले. इकडे सरकारी अनुदानासाठी लायनीत उभं रहायचं आणि तिकडे वाट्टेल तेवढा पैसा खर्च करायचा असा प्रकार सुरू झाला. भलेभले निर्माते देशाेधडीला लागले. काहींनी एकाच सिनेमात तोंड पोळल्यानंतर गप घरचा रस्ता धरला. रिकव्हरी काॅस्ट नसल्यामुळे सिनेमाचं बजेट कमी करायला हवं असं एन. चंद्रांपासून अनेक अनुभवी लोक सांगत होते. पण ऐकतो कोण? पण अशाही परिस्थितीत चांगला सिनेमा करायची इच्छा असेल, तर कमीतकमी पैशात चांगला सिनेमा बनू शकतो हे रिंगण या सिनेमाने दाखवून दिलं आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त हा सिनेमा बनला आहे, तो अवघ्या 40 लाखांत. 

आजकाल 40 लाखांत काय येतं म्हणा. पण हे नवीन माॅडेल उभं करण्यासाठी दिग्दर्शक मकरंद माने आणि त्यांच्या मित्रमंडळींनी नवी कल्पना लढवलीय. परिणामी सिनेमाचा खर्च कमी झाला. खरेतर प्रत्येक सच्च्या निर्माता, दिग्दर्शकाने हे माॅडेल अभ्यासायला हवं. या सिनेमासाठी इनिशिअल लागणारं कॅपिटल गुंतवलं ते विठ्ठल पाटील यांनी. सिनेमाचं काम सुरू झालं. मकरंद माने या सिनेमाचे लेखक, दिग्दर्शक आहेत. त्यांनी कोणतंही मानधन न घेता काम सुरु केलं. त्यांच्यासोबत अभिजीत अब्दे यांनी कॅमेर्याची जबाबदारी सांभाळली. सिनेमाचा विषय आणि एकूण पैशाची सुरू असलेली जुळवाजुळव पाहता, त्यांनीही कोणतेही मानधन न घेता काम सुरु केलं. सोबत गणेश फुके, संकलक सुचित्रा साठे, कार्यकारी निर्माता संजय डावरा, महेश येवले यांनी मोबदला न घेता काम सुरू केलं. सिनेमा पूर्ण झाला. या सर्वांना आपआपलं मानधन ठरवून घेतलं होतं. सिनेमाला मिळणारी पारितोषिकं, अनुदान आणि सॅटेलाईट राईट्स याची एकूण बेरीज करून प्रत्येकाने आपल्या कामाचा मोबदला घ्यायचं ठरलं. 

आज सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. अनुदान मिळणार हे ओघाने आलंच. शिवाय या सिनेमाचे सॅटेलाईट राइटस ही गेले आहेत. मिळलेल्या माहितीनुसार ही रक्कम 70 लाखांच्या आसपास आहे. त्यामुळे प्रदर्शनापूर्वीच या सिनेमाचा खर्च वसूल झाला आहे. याबद्दल बोलताना मकरंद माने म्हणाला, सिनेमा चांगला होणे महत्वाचे होते. सिनेमाचे बजेट फार नव्हते. आलेला पैसा मोबदला देण्यात जाण्यापेक्षा तो सिनेमा बनण्यात जावा असं वाटत होतं. म्हणून आम्ही सर्व कामाला लागलो. आमची रक्कम आम्ही ठरवली होती. पण एकूण सिनेमाला मिळणारं यश लक्षात घेऊन तो आम्ही नंतर घेणार होतो. आज आमचं हे माॅडेल आमच्यापुरतं यशस्वी झालं आहे. 

मराठी सिनेमाला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता सर्वांनीच सिनेमाच्या बजेटवर पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे. तसं झालं तरच निर्मात्याने टाकलेले पैसे आणि रिकव्हरी आवाक्यात येईल. 

Web Title: Film Ringan budget esakal news