मराठी चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय विकासासाठी 'फिल्मीदेश'ची स्थापना

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

मराठी चित्रपटांच्या जागतिक प्रसारणासाठी चित्रपट निर्माते नितीन केणी आणि मनीष वशिष्ट यांचा 'फिल्मीदेश' हा अनोखा उपक्रम जगभर मोठ्या प्रमाणात राबवला जाणार आहे.

मराठी मनोरंजन क्षेत्राचे व्याप्त स्वरूप आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी, आज अनेक संघटनांनी पाऊले उचलली आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार कलाकृतींना, भारताबाहेर मोठी पसंती जरी मिळत असली, तरी वितरण निर्बंधनामुळे हे सिनेमे हवे तितक्या प्रमाणात भारताबाहेरील मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांच्या जागतिक प्रसारणासाठी चित्रपट निर्माते नितीन केणी आणि मनीष वशिष्ट यांचा 'फिल्मीदेश' हा अनोखा उपक्रम जगभर मोठ्या प्रमाणात राबवला जाणार आहे.

मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत निर्मिती आणि वितरणक्षेत्रात नितीन केणी यांचे नाव मोठे आहे. त्यांनी गदर, रुस्तम, लंचबॉक्स यांसारख्या हिंदीतील सुप्रसिद्ध सिनेमासाठी आणि  सैराट, कट्यार काळजात घुसली, दुनियादारी, टाइमपास, लयभारी यांसारख्या सुपरहिट मराठी चित्रपटांमध्ये त्यांचा महत्वपूर्ण सहभाग होता. नितीन केणी झी स्टुडियोचे माजी सीईओ असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी 'झी स्टुडियो' ला नव्या उंचीवर नेण्यास महत्वाची भूमिका बजावली होती. याप्रकारे, मनोरंजन क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या नितीन केणी यांचा 'फिल्मीदेश' हा उपक्रम मराठी सिनेमांसाठी भावी काळात फायदेशीर ठरणार आहे. या उपक्रमांतर्गत, परदेशातील स्थानिक मराठी प्रेक्षकांच्या नजीकच्या सिनेमागृहात मराठी सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. त्यासाठी, जागतिकस्तरीय 'बृहन्महाराष्ट्र मंडळ' चा कार्यभाग सांभाळणारे बीएमएमचे चेअरमन आशिष चौघुले यांचे मोलाचे सहकार्य त्यांना लाभले आहे. याद्वारे मराठी चित्रपट जगभरातील प्रसिद्ध सिनेमागृहात दाखवले जाणार असून, चित्रपटवितरणाबरोबरच जनसंपर्क आणि प्रसारमाध्यमाचे कार्यदेखील याअंतर्गत पार पाडले जाणार आहे. भारतातील प्रादेशिक चित्रपटांना भारताबाहेर हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारा 'फिल्मीदेश' हा उपक्रम मराठी चित्रपटांच्या निर्मात्यांची गुंतवणूक सत्कारणी लावणारा  ठरणार आहे. 

Nittin Keni

'फिल्मीदेश' या स्तुत्य उपक्रमाबद्दल बोलताना, आज मराठी चित्रपटसृष्टीला सुगीचे दिवस आले आहे. प्रादेशिक भाषिक चित्रपटांमध्ये मराठीचा दर्जा वाढत असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील मराठी चित्रपटांना मोठी मागणी आहे. भारताबाहेरील या सर्व मराठी व अमराठी प्रेक्षकांना मराठी चित्रपट पाहता यावे यासाठी, मनीष वशिष्ट यांच्या साथीने 'फिल्मीदेश' ही संकल्पना राबवली असल्याचे नितीन केणी यांनी सांगितले. तसेच, मर्यादित वितरणामुळे मराठी चित्रपटांना परदेशातून उत्पन्न मिळविण्याची संधी आतापर्यंत मिळत नव्हती, पण या उपक्रमाद्वारे निर्मात्यांना कमाईचे अधिक स्त्रोत उपलब्ध होणार असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.

Aashish Chaughule

त्याचप्रमाणे, अमेरिकेत मराठीचा वारसा जपणारे बीएमएमचे चेअरमन आशिष चौघुले यांनी या उपक्रमाबद्दल बोलताना असे सांगितले कि, 'उत्तर अमेरिकेत दीड लाखाहून अधिक मराठी भाषिक कुटुंबे राहतात त्यामुळे, या भागात मराठी चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्राला अधिक वाव आहे. मात्र, संघटीत वितरणाच्या मर्यादेमुळे मराठीतल्या अप्रतिम कलाकृती स्थानिक लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. विषयांच्या वैविध्यामुळे या उपक्रमाद्वारे अमराठी प्रेक्षकांनाही आकर्षित करता येईल, आणि एकप्रकारे कलाकृती ते कलासक्ती अशी मूल्यप्रणाली निर्माण करता येईल. या उपक्रमाद्वारे मराठी चित्रपटाच्या अर्थकारणास चालनादेखील मिळणार आहे. परदेशी उत्पन्न आणि देवाणघेवाण वाढीमुळे मराठी चित्रपटसृष्टीचा जागतिक व्यवहार उंचीवर जाण्यास मदत होईल'.

मराठी चित्रपटाच्या जागतिक विकासाच्या हेतूने 'फिल्मीदेश' या उपक्रमाची स्थापना करण्यात आली असून, भविष्यात हा उपक्रम मराठी सिनेसृष्टीला जगाच्या पाठीवर नवीन ओळख मिळवून देईल, अशी आशा आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Filmdesh establishment for international development of Marathi film