आशियायी चित्रपट महोत्सवात चित्रपट निर्माते सुनील फडतरे यांचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

एक नजर

  • रोटरी हॉलमध्ये पहिल्या दिवशी दोन्ही स्क्रीनवर आशियायी, भारतीय प्रादेशिक आणि मराठी चित्रपटांची मेजवानी
  • चित्रपट महोत्सवाला रसिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद
  • सौदी अरेबियातील महिला दिग्दर्शिका हैफा अल मन्सूर यांच्या "वजदा' चित्रपटाने प्रारंभ
  • झान्ग इमोऊ या चिनी दिग्दर्शकाच्या चित्रपटालाही प्रतिसाद

सांगली -  येथील फिल्म सोसायटीने आयोजित केलेल्या पहिल्या आशियायी चित्रपट महोत्सवाला रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या उपस्थितीत उद्‌घाटन झाले. चित्रपट निर्माते सुनील फडतरे यांना मानपत्र देऊन गौरवण्यत आले. याप्रसंगी प्रा. निरंजन कुलकर्णी उपस्थित होते. 

येथील रोटरी हॉलमध्ये पहिल्या दिवशी दोन्ही स्क्रीनवर आशियायी, भारतीय प्रादेशिक आणि मराठी चित्रपटांची मेजवानी मिळाली.  सौदी अरेबियातील महिला दिग्दर्शिका हैफा अल मन्सूर यांच्या "वजदा' चित्रपटाने प्रारंभ झाला. कट्टरतावादी देशात स्वतः सायकल चालवण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची वजदा या शाळकरी मुलीची धडपड या चित्रपटात दाखवली आहे. पुरुषसत्ताक राष्ट्रात महिलेला चित्रपट बनविण्यासाठी करावी लागलेली धडपडही यानिमित्ताने पुढे आली. रसिकांनी टाळ्यांच्या गजरात कौतुक केले. 

झान्ग इमोऊ या चिनी दिग्दर्शकाच्या चित्रपटालाही प्रतिसाद मिळाला. पित्याच्या अंत्यसंस्कारासाठी एक तरुण गावाकडे जातो. शहर सोडण्यास तो नाखूष आहे. या दरम्यान गावी रमलेला शिक्षक पिता आणि त्याची ग्रामीण माता यांच्या प्रेमाची कथाही तो सांगतोय. मुलाने गावाकडे येऊन शिक्षक बनण्याची अंतिम इच्छा वडील प्रत्यक्षात कसे आणतात याचे हळुवार चित्रण केले आहे.

दुपारच्या सत्रात कझाकिस्तानी चित्रपट "तलान' आणि "तन्वीर अहसान' तसेच आठ बांगलादेशी दिग्दर्शकांच्या योगदानातून बनलेल्या "सिन्सीअरली युवर्स ढाक्का' या सिनेमानाही रसिकांनी दाद दिली. 

दिग्दर्शक सुनील चिंचलकर आणि निर्माते सुनील फडतरे यांचा "पुष्पक विमान' चित्रपटाला भरघोस प्रतिसाद लाभला. मराठी चित्रपटाचे सौंदर्य उलगडणारा राजा परांजपे दिग्दर्शीत "पुढचं पाऊल' हा पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके यांना जन्मशताब्दीनिमित्त वंदन करणारा चित्रपट, दिग्दर्शक गजेंद्र अहिरेंचा "पिंपळ' या चित्रपटांनाही गर्दी झाली. "रंग महाराष्ट्राचा' हा सांस्कृतिक कार्यक्रमही श्रोत्यांच्या प्रतिसादाने गाजला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Filmmaker Sunil Phadtare felicitated at the Asian Film Festival