चित्रपटांतील जलसंकटे

सुधीर सेवेकर
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

चित्ररंग :
अतिवृष्टी, महापूर, धरणफुटी यांसारख्या नैसर्गिक आपत्ती हा सिनेमाचाही एक विषय अवश्‍य आहे. अशाच काही गाजलेल्या सिनेमांविषयी...
 

यंदा अतिवृष्टी, महापूर, बंधारे, पूल कोसळणे अशा बातम्या देशाच्या विविध भागांतून येताहेत. अशी नैसर्गिक संकटे हा चित्रपटांचाही एक विषय आहे. भूकंप, धरणफुटी, महाप्रलय, आगीचे तांडव अशा विविध नैसर्गिक आपत्तींना कथेचा मध्यवर्ती विषय मानून अशा डिझॅस्टर चित्रपटांची मांडणी केलेली असते.

चित्रपट माध्यमाच्या आरंभीच्या काळात जेव्हा चित्रण तंत्रज्ञान फार विकसित नव्हते तेव्हाही असे चित्रपट निघाले आहेत. बोलपटांच्या आरंभीच्या काळात साधारणपणे 1939 च्या सुमारास आलेला द रेन्स केम चित्रपट त्याकाळी बराच गाजला होता. आता तर छायाचित्रण तंत्रज्ञान खूप विकसित झाले आहे. त्याला संगणकशास्त्राचीही जोड मिळालेली आहे. त्यामुळे असे आपत्तीपट आता अधिकाधिक थरारक, भयानक आणि अंगावर काटा उभा करणारे निर्माण केले जाऊ शकतात.
गतवर्षी "द वेव्ह' नामक एक इंग्रजी चित्रपट आला होता. 1934, 1965 व नंतरही आलेल्या सुनामी संकटावर तो आधारित होता. नॉर्वे या देशाचा समुद्र, तेथील खडकाळ जमीन, हवामान, पर्जन्यमान, भौगोलिक रचना हे सगळे असे काही आहे की त्या देशावर नेहमी समुद्री वादळांची, सुनामीची संकटे येत असतात. त्याचेच थरारक चित्रण "द वेव्ह' या चित्रपटात होते. त्याआधीच्या द सिंकिंग जपान, कीलर फ्लड या चित्रपटांमधूनही जलप्रलय हाच विषय होता. 1976 च्या सुमाराच्या "फ्लड' या चित्रपटात अतिवृष्टीमुळे एक महाकाय धरण ओव्हरफुल झालेय. त्यामुळे अभियंते, राज्यकर्ते, लोक सर्वच जण चिंतातुर आहेत. धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा मोठा विसर्ग करणे आवश्‍यक आहे. पण तसा विसर्ग केला तर मोठीच जीवित व वित्तहानी होणार आहे. मोठा भौगोलिक प्रदेश बरबाद होणार आहे आणि विसर्ग नाही केला तर पाण्याचे प्रेशर धरणाच्या भिंतीवर असह्य होईल, भिंतीस तडे जातील, धरणच फुटण्याची शक्‍यता आहे, अशा पेचात काय करावे यांची तांत्रिक, राजकीय, सामाजिक चर्चा या चित्रपटात होती. तंत्रज्ञ, राज्यकर्ते, लोकप्रतिनिधी, प्रसारमाध्यमे आम जनता अशा सर्व संबंधितांची आपापल्या पद्धतीने विचार विश्‍लेषण करण्याची तऱ्हा, त्यांच्या भूमिका, दृष्टिकोन हे सगळे मोठ्या वेधकपणे त्यामध्ये दाखविले होते.
दुसरा "फ्लड' चित्रपट 2007 मध्ये आला. त्यात समुद्राच्या पाण्याची पातळी वाढतेय. त्याने एकूण युरोप खंडच धोक्‍यात आलाय. त्यातही लंडन शहराची स्थिती सर्वात नाजूक आहे. कारण लंडन शहरातल्या थेम्स नदीला पूर आलाय. पाणीपातळी वेगाने वाढतेय. जगप्रसिद्ध ब्रिटिश पार्लमेंट पाण्याखाली गेलेय. न भूतो न भविष्यति असा हा जलप्रलय असून त्याचे अंगावर काटा आणणारे दर्शन हा चित्रपट पडद्यावर घडवितो आणि प्रेक्षक बसल्याजागी सुन्न होतो. कॉम्प्युटर ग्राफिक्‍स, प्रकाश, ध्वनी, इमारतीच्या प्रतिकृती इत्यादी अत्याधुनिक तंत्रांचा फारच कल्पक पण धडकी भरविणारा वापर त्यात केला होता. अनेक भाषांतून चित्रपट डब करून जगभर दाखवला गेला होता. अनेक देशांच्या दूरचित्रवाणी माध्यमातून त्यावर मालिकाही प्रसारित केली गेली होती. चित्रपटाचे त्यावर्षी भरपूर कौतुक झाले. बक्षिसेही मिळाली.

भारतीयसंदर्भात मदर इंडिया, पार, सत्यम्‌ शिवम्‌ सुंदरम्‌, तुम मिले अशा काही चित्रपटांतून अतिवृष्टी, महापूर, धरणफुटी दाखवली गेली होती. पण तांत्रिकदृष्ट्या ते फारच सामान्य स्तराचे होते.
डॅम 999 हा तामिळ चित्रपट पाचेक वर्षांपूर्वी गाजला. पण त्याचे कारण या चित्रपटावर तत्कालीन तामिळ राज्य सरकारने बंदी घातली होती, हे होते. तामिळ सरकार आणि केरळ राज्य सरकार यांचे संबंध या चित्रपटामुळे बिघडतील अशी भीती तत्कालीन तामिळ राज्यकर्त्यांना वाटल्याने ही बंदी घातली गेली होती. पण हा चित्रपट जगभरातल्या अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतून गाजला.

लेखक-दिग्दर्शक सोहब रॉय आणि चित्रपटातील कलावंत आशिष विद्यार्थी, विमला रामन, रजत कपूर, लिंडा असेनियो यांच्या कामगिरीचे कौतुकही झाले. या चित्रपटाचा वाद थेट सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेला आहे. महाकाय धरणे म्हणजे एकप्रकारचे जीवघेणे वॉटरबॉम्बच आहेत. तेव्हा सावध राहा, असा या चित्रपटाचा संदेश आहे. तामिळनाडूच्याच एक अभिनेत्री निर्मात्या लक्ष्मी रामकृष्णन यांनीही अशाच आशयाच्या एका तामिळ चित्रपटाची घोषणा केलेली असून यंदाच्या देशातील ठिकठिकाणच्या महापुराचे, जलप्रलयांचे, नुकसानीचे त्यांनी चित्रणही संदर्भासाठी करून ठेवले आहे.

Web Title: floods in famous movies