रोमांचक आणि थरारक "गाझी अटॅक' ( नवा चित्रपट)

संतोष भिंगार्डे 
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

बांगलादेशची निर्मिती होण्यापूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एक सागरी युद्ध पाण्याखाली झाले, ते म्हणजे "गाझी अटॅक'. सन 1971 मध्ये कुणालाही थांगपत्ता लागू न देता भारत-पाकिस्तानमध्ये ही लढाई पाण्याखाली झाली होती. त्याचीच कथा "द गाझी अटॅक'मध्ये मांडण्यात आली आहे. खरे तर हिंदीमध्ये "बॉर्डर', "एलओसी कारगिल' असे कित्येक युद्धपट आले; परंतु "द गाझी अटॅक' एक थरारक अनुभव देणारा रोमांचकारी असा चित्रपट आहे. ही कथा आहे सन 1971 मधील. पाकिस्तानने भारतीय नौदलातील सर्वात शक्तिशाली "आयएनएस विक्रांत' ही युद्धनौका जमीनदोस्त करण्याची योजना आखली होती.

बांगलादेशची निर्मिती होण्यापूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एक सागरी युद्ध पाण्याखाली झाले, ते म्हणजे "गाझी अटॅक'. सन 1971 मध्ये कुणालाही थांगपत्ता लागू न देता भारत-पाकिस्तानमध्ये ही लढाई पाण्याखाली झाली होती. त्याचीच कथा "द गाझी अटॅक'मध्ये मांडण्यात आली आहे. खरे तर हिंदीमध्ये "बॉर्डर', "एलओसी कारगिल' असे कित्येक युद्धपट आले; परंतु "द गाझी अटॅक' एक थरारक अनुभव देणारा रोमांचकारी असा चित्रपट आहे. ही कथा आहे सन 1971 मधील. पाकिस्तानने भारतीय नौदलातील सर्वात शक्तिशाली "आयएनएस विक्रांत' ही युद्धनौका जमीनदोस्त करण्याची योजना आखली होती. आयएनएस विक्रांत उद्‌ध्वस्त करून विशाखापट्टणम काबीज करण्याचा त्यांचा डाव होता. त्याकरिता त्यांची सर्वात कार्यक्षम पाणबुडी "पीएनएस गाझी'ला पाठविण्यात आलं होतं. भारताची गुप्तहेर संघटना "रॉ'ला ही माहिती मिळते आणि ही माहिती भारतीय नौसेनेला दिली जाते. त्यावेळी भारताच्या एस 21 या पाणबुडीची कमांड कॅप्टन रणविजय सिंह (के. के. मेनन) यांच्याकडे असते. शत्रू समोर दिसताच कुणाच्याही आदेशाची वाट न पाहता त्याचा नायनाट करायचा आणि मग पुढचा विचार करायचा, अशी कॅप्टन रणविजय सिंहची वृत्ती असते. त्यामुळे त्याच्यावर अंकुश ठेवण्यासाठी लेफ्टनंट कमांडर अर्जुनला (राणा दुग्गुबत्ती) स्पेशल ऑफिसर्स म्हणून पाठविलं जातं. त्याचबरोबर देवराज (अतुल कुलकर्णी) हा याच पाणबुडीवर एक्‍झिक्‍युटिव्ह ऑफिसर असतो. मग हे भारतीय नौदलाचे जवान आपल्या अन्य सहकाऱ्यांसह हुशारी, तंत्र आणि बुद्धीचा वापर करून आपले मिशन कसे पूर्ण करतात, हीच कथा या चित्रपटात आहे. भारतीय नौदलाच्या यशाची ही शौर्यगाथा आहे. दिग्दर्शक संकल्प रेड्डीने ही कथा मांडताना सिनेमॅटिक लिबर्टी घेतली आहे; परंतु त्याची मांडणी करताना कथेचा पोत कुठेच ढिला पडू दिलेला नाही. त्यामुळे चित्रपट शेवटपर्यंत उत्कंठा वाढवीत जातो. खरे तर संपूर्ण कथा ही पाणबुडीतच घडणारी आहे आणि अशा प्रकारच्या कथानकावर चित्रपट काढणे कठीण बाब असते; परंतु हे आव्हान दिग्दर्शकाने यशस्वीरित्या पेललेले आहे. त्यामुळे त्याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. पाणबुडीचे काम कसे चालते... त्यामधील मंडळी कशा पद्धतीने काम करतात... शत्रूने समोरून एखादे अस्र सोडले तर त्याला कसे सामोरे जायचे... वगैरे गोष्टी दिग्दर्शकाने छान टिपलेल्या आहेत. कलाकारांच्या अभिनयाची साथ त्याला चांगलीच लाभली आहे. ओम पुरीसह के. के. मेनन, राणा दुग्गुबत्ती, अतुल कुलकर्णी आदी कलाकारांनी आपली कामगिरी चोख पार पाडली आहे. निर्वासित बांगलादेशी तरुणीची भूमिका या चित्रपटात तापसी पन्नूने साकारली आहे. तिच्या वाट्याला आलेले सिन्स तिने वकुबीने साकारले आहेत. 
आझाद आलम यांचे संवाद मनाला भिडणारे आहेत. यामध्ये विशेष कामगिरी केली आहे ती सिनेमॅटोग्राफर माधी यांनी! चित्रपटातील जवळपास 90 टक्के भाग पाण्याखाली शूट करण्यात आलाय. त्यामुळे अतिशय मेहनतीने त्यांनी केलेली अदाकारी कौतुकास्पद आहे. चित्रपटाचे पार्श्‍वसंगीतही चांगले जमले आहे. मात्र काही उणिवा चित्रपटात आहेत. समुद्रात तीनशे-साडेतीनशे मीटर खोल आत असताना आपल्या सैनिकांनी गायलेली देशभक्तीपर गाणी शत्रूपक्षाच्या पाणबुडीला कशी काय ऐकू येतात, ही बाब खटकणारी आहे. सिनेलिबर्टी घेताना याचा विचार होणे आवश्‍यक होते. तरीही पाण्याखालील युद्धाचा हा थरार अंगावर रोमांच आणणारा आणि थरारक आहे. भारतीय नौदलाच्या शौर्याची ही गाथा उत्कृष्टरित्या पडद्यावर साकार झाली आहे. 

Web Title: The Ghazi attack movie review