फुलटू टैमपास! आत्ता होती, गेली कुठे? 

हेमंत जुवेकर
बुधवार, 14 डिसेंबर 2016

मालिकांनी अनेकांना ग्लमर दिलं, नाव दिलं पैसा दिला हे खरं असलं तरी ते अळवावरचं पाणीच. कारण, कलाकारांचं आयुष्यही 'जोवर पैसा तोवर बैसा' या एका ग्राम्य हॉटेल सुविचारांसारखंच असतं की. त्यांची मालिका चालत राहिली की ते चालतात. नाही चालली तर? 

एका घरातली जेवणाची वेळ. 
असेच घऱगुती विषय सुरू... तेवढ्यात त्या घऱातली आई म्हणते, अरे त्या भास्करचं लग्न होतंय पुढच्या आठवड्यात.
सवयीनं कुणीतरी, मला सुटी नाही मिळणार हे सांगून टाकतं. पण कुणाला तरी शंका येते कोण हा भास्कर? 
आई सहजपणे म्हणते, अरे तो नाही का, आभाळमाया मधला... 
आणि मग अनेकांना एकाच वेळी ठसके लागतात! 
कदाचित हा कुणाला हा किस्सा अतिशयोक्ती वाटूही शकेल, पण जे मालिकावेडे आहेत त्यांना कदाचित नाही वाटणार. एकतर त्यांना आभाळमाया ही सुकन्याची (कुलकर्णी-मोने) मालिका आठवेल. (तीच ती आभाळमाया, जिची पहिली मराठी डेली सोप म्हणून जाहिरात केली होती. हो इतकी जुनीय ती मालिका. आठवत नाही का, सुकन्या आणि इतर दोघं तिघंही तेव्हा आपल्या टिव्हीच्या स्क्रीनवर सहजपणे मावत. आता एकटी सुकन्याही नाही मावू शकत. असो. तर...) त्या मालिकेत भास्कर ही एक व्यक्तिरेखा होती, ते काम केलं होतं प्रसाद ओकने. प्रसाद त्या अगोदरही लोकप्रिय अभिनेता होताच. पण तरीही त्याची ओळख भास्कर अशीच बनली होती त्या काळात. आठवतय ना? 
पण विसरलात तरीही फार वैषम्य वाटून घ्यायचं कारणं नाही. कारण 'हाजिर तो वजीर' हे तत्त्व या मालिकांइतकं दुसरं कुणीच नाही सिद्ध करत. 

मालिका सुरू असताना मालिकेतल्या कलाकार इतके घऱचे वाटायला लागतात ना की ते कधीतरी आपल्याकडे जेवायलाच येतील असं वाटावं. (अनेक घऱात आवडती मालिका पाहण्याची आणि जेवणाची वेळ एकच असते ना त्यामुळेही असं वाटू शकतं). पण अशा घराघरांत नी मनामनांत शिरलेल्या कलाकारांची नावंही माहीत नसतात अनेकांना. त्यांची ओळख असते ती त्यांच्या व्यक्तिरेखेच्या नावातच. (सांगा बरं, तुझ्यात जीव रंगला मधल्या राणाचं म्हणजे त्या कलाकाराचं नाव) अर्थात काही अपवाद असतातही. 
पण तरीही रसिकांच्या मनावरचं हे सिंहासन औट घटकेचं आहे हे ओळखलंय कलाकारांनी. त्यामुळे त्यांच्या या लोकप्रियतेच्या काळात त्यांच्या सुपारीचे भाव (...म्हंजे या कलाकारांना एखाद्या कार्यक्रमाला बोलवण्यासाठी देण्यात येणारी रक्कम...) गगनापार जातात. आपली लोकप्रियता परफेक्‍ट इनकॅश करतात हे कलाकार. 
त्यांचं तरी काय चुकतं हो यात, उद्या ती मालिका संपली की त्यांना कशाला कोण ओळखतंय... मग नंतर 'कॅशलेस' राहण्यापेक्षा हे बरं असंच ते म्हणत असतील. 

काही वर्षांपूर्वी, मन उधाण वाऱ्याचे म्हणून एक मालिका बऱ्यापैकी लोकप्रिय होती. त्यातली गौरी आज कुठे दिसतही नाही. हो गौरी म्हणजे नेहा गद्रे. आज कदाचित अऩेकांना तिचा चेहरा (गोड असला तरी) नाही आठवणार. 
पण नेहाने हे फार मनावर नको लावून घ्यायला. कारण ज्याच्या ऑनस्क्रीन मृत्युमुळे सबंध देश हादरला होता. आणि चक्क त्याला पुन्हा जिवंत करावं लागलं होतं त्या विराणी खानदानातल्या मिहीर नावाच्या या सुपुत्राचं नाव आजच्या तरुण तुर्क प्रेक्षकांना माहीतही नसेल. त्यांच्यासाठी सांगायला हवं की त्यावेळी साऱ्या महिलावर्गामुळे एकता कपूरने 'सास भी कभी बहू थी' या मालिकेतल्या त्या मिहीरला संजीवनी दिली होती. (बहुधा त्यानंतरच तिला मालिकेची कथा प्रेक्षकांच्या मागणीप्रमाणे किंवा TRP प्रमाणे वळवण्याची सवय लागली असावी.) 
तर त्या मिहीर विराणीचं आज कुठे नामोनिशान नाही. त्याला एकेकाळी मिळालेल्या अफाट लोकप्रियतेमुळे एका निर्मात्याने त्याला सिनेमातही घेतलं. हो, तोच तो मिहीर म्हणजे अमर उपाध्याय. पण त्याचा सिनेमा आला कधी नी गेला कधी, काहीही कुण्णाला कळलं नाही... मध्ये तो बिग बॉस मध्येही येऊन गेला. पण त्या सीझनमधला तो नाही तर, फक्त सनी लिओनी लक्षात राहीली. 
पण मालिकांनी अनेकांना ग्लमर दिलं, नाव दिलं पैसा दिला हे खरं असलं तरी ते अळवावरचं पाणीच. कारण, कलाकारांचं आयुष्यही 'जोवर पैसा तोवर बैसा' या एका ग्राम्य हॉटेल सुविचारांसारखंच असतं की. त्यांची मालिका चालत राहिली की ते चालतात. नाही चालली तर? 
नाही चालली तर ते कलाकार म्हणतात, 'मी आजकाल खूप चुझी झालोय-झालेय, काही निवडक प्रोजेक्‍टस्‌च करायचं ठरवलंय मी!!!' 
​पण ओळखणारे ओळखतातच बरोबर. 

Web Title: glamour up and down of artists