
लॉकडाऊनच्या काळात प्रेक्षकांना विरंगुळा म्हणून आता जुन्या आणि नव्वदच्या काळात गाजलेल्या मालिकांचे पुनःप्रसारण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई- कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना घराबाहेर पडण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. केंद्र तसेच राज्य सरकार वारंवार लोकांना घरातच राहण्याचं आवाहन करत आहेत. लॉकडाऊनच्या काळात प्रेक्षकांना विरंगुळा म्हणून आता जुन्या आणि नव्वदच्या काळात गाजलेल्या मालिकांचे पुनःप्रसारण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हे ही वाचा: खास लोकआग्रहास्तव 'आंबटगोड' आणि 'राजा शिवछत्रपती' मालिका प्रेक्षकांच्या भेटीला
काही मालिका तर प्रेक्षकांच्या आग्रहाखातर सुर करण्याचा निर्णय वाहिन्यांनी घेतला आहे. रामायण, महाभारत, शक्तीमान, सर्कस, या मालिका पुन्हा प्रसारित होणार आहेत. पण त्याचबरोबरीने प्रेक्षकांसाठी आणखी एक खुशखबर म्हणजे नव्वदच्या दशकातील नावाजलेली मालिका 'देख भाई देख' दुरदर्शनवर सायंकाळी 6 वाजता पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
'देख भाई देख' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ही हिट मालिका प्रेक्षकांसाठी चांगलाच विरंगुळा ठरणार आहे. त्याचबरोबरीने मराठी वाहिन्यांनीदेखील काही प्रसिद्ध मालिका पुन्हा दाखवण्याचे निश्चित केले आहे.
विनय, सुमित, राघव, काव्या , शाल्मली,आकांक्षा,आणि अभिमान या सात मित्रांच्या आयुष्यातील लोचा आपले मनोरंजन करण्यासाठी संध्याकाळी ७ वाजता 'झी युवा'वर हजर असेल. या तिघांची मैत्री, प्रेम आणि आयुष्यातील प्रॉब्लेम्स ना तोंड देण्याची जिद्द हे सगळं 'लव्ह लग्न लोचा' मालिकेत पाहता येईल.
एवढेच नाही, तर मानस आणि वैदेहीची हिट जोडी पुन्हा एकदा आपल्याला भेटायला येईल, ती संध्याकाळी ७.३० वाजता 'फुलपाखरू' या मालिकेतून...या मालिकेतून त्यांची प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या आग्रहाखातर पुन्हा अनुभवता येणार आहे.
तर दुसरीकडे भीतीयुक्त मनोरंजन ६ एप्रिल पासून सोमवार ते गुरुवार रोज एक तास रात्री ९:३० ते १०:३० वाजता झी युवावर 'रात्रीस खेळ चाले' आणि 'एक घर मंतरलेलं' या मालिकांमधून अनुभवायला मिळेल..
तसंच झी मराठी वाहिनीवर ६ एप्रिलपासून संध्याकाळी ६ वाजता 'जय मल्हार' आणि दुपारी १२ वाजता 'तुला पाहते रे' या लोकप्रिय मालिका प्रेक्षकांना या लॉकडाऊनच्या काळात पाहता येणार आहेत.
लॉकडाऊनच्या काळात चित्रीकरणही पूर्णपणे ठप्प झाले आहे. अशात प्रेक्षकांना विरंगुळा हवा म्हणून छोट्या पडद्यावरील गाजलेल्या मालिकांचे पुनःप्रक्षेपण केले जात आहे. खरं तर जुन्या मालिकांचा अलौकिक ठेवाच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे.
good news these popular serials will be telecast again