भारताच्या पहिल्या करोडपती गायिकेला गुगल डूडल समर्पित; कोण होत्या गौहर जान? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

13 वर्षाच्या असताना गौहर यांच्यावर बलात्कार झाला होता. या घटनेतूनही स्वतःला सावरत गौहर यांनी संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटवला. 1900 च्या सुरवातीच्या दशकातील स्त्रीयांवर होणाऱ्या अत्याचार आणि शोषणाचे एक जिवंत उदाहरण होते.

नवी दिल्ली - गौहर जान या महिलेने भारताच्या इतिहासातील संगीत क्षेत्रात दिलेले योगदान अमुल्य आहे. भारताच्या पहिल्या रेकॉर्डींग सुपरस्टार म्हणून त्यांची ओळख आहे. आज त्यांच्या 145 व्या जयंती दिनानिमित्त गुगलने त्यांना डूडल समर्पित केले आहे. 

26 जून 1893 मध्ये जन्मलेल्या गौहर जान या भारतात 78 आरपीएमवर संगीत रेकॉर्ड करणाऱ्या पहिल्या महिला कलाकार ठरल्या. म्हणून त्यांना 'पहिल्या रेकॉर्डींग सुपरस्टार'चा दर्जा त्यांना मिळाला. त्यांच्या या रेकॉर्डींग 'द ग्रामोफोन कंपनी ऑफ इंडिया'ने जगासमोर आणल्यात. 

गौहर जान यांचा जन्म ख्रिश्चन कुटुंबात झाला होता. त्यांचे खरे नाव एंजलिना योवर्ड असे होते. गौहर यांचे आजोबा ब्रिटिश आणि आजी हिंदू होती. त्यांच्या वडीलांचे नाव विलियम योवर्ड आणि आईचे नाव विक्टोरिया असे होते. गौहर यांची आई विक्टोरिया देखील एक प्रशिक्षित नृत्यांगना आणि गायिका होत्या. गौहर यांच्या आई-वडीलांचा संसार जास्त काळ टिकला नाही आणि 1879 साली एंजलिना 6 वर्षाची असताना त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर विक्टोरिया यांनी कोलकाता निवासी मलक जान यांच्याशी विवाह केला आणि इस्लाम धर्म स्विकारला. अशाप्रकारे एंजलिना गौहर जान बनल्या. 

gauhar jaan

गौहर जान यांच्या आयुष्यात त्यांना बलात्कार सारख्या दुष्कर्माला सामोरे जावे लागले होते. 13 वर्षाच्या असताना गौहर यांच्यावर बलात्कार झाला होता. या घटनेतूनही स्वतःला सावरत गौहर यांनी संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटवला. 1900 च्या सुरवातीच्या दशकातील स्त्रीयांवर होणाऱ्या अत्याचार आणि शोषणाचे एक जिवंत उदाहरण होते. गौहर यांच्या संघर्षाला विक्रम संपथ यांनी काही वर्षांच्या संशोधनानंतर 'माय नेम इज गौहर खान' या पुस्तकातून मांडले. 

गौहर जान यांनी 20 भाषेत ठुमरी, भजन गायले आहेत. त्यांनी 600 रेकॉर्डींग केले आहेत. 1902 ते 1920 या सालादरम्यान 'द ग्रामोफोन कंपनी ऑफ इंडिया'ने गौहर यांच्या भारतीय, बांग्ला, गुजराती, मराठी, तमिळ, अरबी, पारशी, पश्तो, इंग्रजी आणि फ्रेंच गाण्यांचे 600 डिस्क प्रसिद्ध केले होते. गौहर या 19 व्या दशकाच्या सगळ्यात श्रीमंत गायिका होत्या. त्यांची फी ही जास्त होती. गौहर जान यांना समारंभात आणि संगीत सभेत बोलावणे म्हणजे प्रतिष्ठेचे समजले जात होते. 17 जानेवारी 1930 ला त्यांचा मृत्यू झाला. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Google Doodle Dedicated To Indias First Rich Women Singer Gauhar Jaan