'गोष्ट तशी गमतीची' नाबाद ४०० प्रयोग

रविवार, 15 ऑक्टोबर 2017

'एकही रिप्लेसमेंट न करता ४०० प्रयोग करणं ही खरंच मोठी गोष्ट आहे. या नाटकानं समाधान आणि आनंद अशा दोन्ही गोष्टी दिल्या. नाटक पाहिलेल्या प्रेक्षकांना आमचं खरखुरं कुटुंब वाटतं, ही आमच्या कामाची मोठी पावती आहे. चारशे प्रयोग होत असले, तरी आम्ही तितक्याच उत्साहानं काम करतो, प्रत्येक प्रयोगात काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळेच नाटकातला ताजेपणा टिकून राहतो. ४०० प्रयोग पूर्ण होणं आनंददायीच आहे,' असं अभिनेत्री लीना भागवत यांनी सांगितलं.

मुंबई : आताच्या काळात नाटकांचे मोजके प्रयोग होण्याच्या काळात गोष्ट तशी गमतीची या नाटकानं ४०० प्रयोगांचा टप्पा गाठला आहे. दिवाळी पाडव्याच्या दिवशी, २० ऑक्टोबर रोजी ... येथे या नाटकाचा ४०० वा प्रयोग रंगणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आतापर्यंत या नाटकात एकही रिप्लेसमेंट झालेली नाही. 

सोनल प्रॉडक्शनच्या नंदू कदम यांनी निर्मिती केलेल्या या नाटकाचं लेखन मिहिर राजदा यांनी केलं आहे. तर अद्वैत दादरकर यांचं दिग्दर्शन आहे. शशांक केतकर, मंगेश कदम, लीना भागवत यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. या नाटकाद्वारे शशांकनं व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं होतं. आतापर्यंत या नाटकाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला आहे. जवलपास तीन वर्षांत या नाटकानं ४०० प्रयोग केले आहेत. शशांक आणि लीना यांचं ४०० प्रयोगांचा टप्पा गाठणारं हे पहिलंच नाटक आहे. अभिजित पेंढारकर यांनी संगीत, अमिता खोपकर यांनी वेशभूषा, प्रदीप पाटील यांनी नेपथ्य आणि रवी करमरकर यांनी प्रकाशयोजना केली आहे. 

'एकही रिप्लेसमेंट न करता ४०० प्रयोग करणं ही खरंच मोठी गोष्ट आहे. या नाटकानं समाधान आणि आनंद अशा दोन्ही गोष्टी दिल्या. नाटक पाहिलेल्या प्रेक्षकांना आमचं खरखुरं कुटुंब वाटतं, ही आमच्या कामाची मोठी पावती आहे. चारशे प्रयोग होत असले, तरी आम्ही तितक्याच उत्साहानं काम करतो, प्रत्येक प्रयोगात काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळेच नाटकातला ताजेपणा टिकून राहतो. ४०० प्रयोग पूर्ण होणं आनंददायीच आहे,' असं अभिनेत्री लीना भागवत यांनी सांगितलं.

'महाराष्ट्रासह परदेशातही या नाटकाचे प्रयोग झाले आहेत. महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना हे नाटक जितकं आपलं वाटतं, तितकंच ते परदेशातल्या प्रेक्षकांनाही वाटतं, हेच या नाटकाचं यश आहे,' असं मंगेश कदम म्हणाले.
 
Web Title: goshta tashi gamatichi new step esakal news