माणुसकीचं दर्शन घडवणारी ‘ग्रामंती’

ओंकार धर्माधिकारी
बुधवार, 12 जून 2019

मनोरंजन क्षेत्राला आता कल्पनांच्याही मर्यादा राहिल्या नाहीत. नाटक, मूकपट, मग बोलपट, त्यानंतर रंगीत झालेला सिनेमा या गोष्टींचा अनुभव घेतलेल्या पिढीतील लोकही आता फारसे दिसत नाहीत. तीन तासांचा चित्रपट आणि तो चित्रपटगृहात जाऊन पाहायचा हे देखील आता मागं पडलं. टीव्हीसमोर बसून मालिका पाहायचा काळही आता गेला. चित्रवाहिन्यांची जागा आता इंटरनेटवरील नेटफ्लिक्‍स, अमेझॉनसारख्या वेब चॅनलनी घेतली. यू ट्यूबवरही सामान्य माणसांनी सुरू केलेली चॅनल पुष्कळ आहेत. या चॅनलवर अनेक प्रकारचे कार्यक्रम असतात. यासाठी म्हणूनच बनवले गेलेले काही चित्रपट लोकांच्या पसंतीला उतरले आहेत.

मनोरंजन क्षेत्राला आता कल्पनांच्याही मर्यादा राहिल्या नाहीत. नाटक, मूकपट, मग बोलपट, त्यानंतर रंगीत झालेला सिनेमा या गोष्टींचा अनुभव घेतलेल्या पिढीतील लोकही आता फारसे दिसत नाहीत. तीन तासांचा चित्रपट आणि तो चित्रपटगृहात जाऊन पाहायचा हे देखील आता मागं पडलं. टीव्हीसमोर बसून मालिका पाहायचा काळही आता गेला. चित्रवाहिन्यांची जागा आता इंटरनेटवरील नेटफ्लिक्‍स, अमेझॉनसारख्या वेब चॅनलनी घेतली. यू ट्यूबवरही सामान्य माणसांनी सुरू केलेली चॅनल पुष्कळ आहेत. या चॅनलवर अनेक प्रकारचे कार्यक्रम असतात. यासाठी म्हणूनच बनवले गेलेले काही चित्रपट लोकांच्या पसंतीला उतरले आहेत.

विशेष म्हणजे हे चित्रपट केवळ याच चॅनलवरती प्रदर्शित होतात. ज्यांनी ही चॅनल सबस्क्राईब केली आहेत त्यांनाच ती दिसतात. या चॅनलमुळे मनोरंजन क्षेत्रात मोठी क्रांतीच केली. कारण सर्वसामान्य माणसाला, स्थानिक पातळीवरच्या कलाकारांना व्यक्त करणारी ही चॅनल अल्पावधीतच प्रसिद्धी पावली. यामुळे माहिती आणि मनोरंजनाचा नवा खजिनाच प्रेक्षकांना मिळाला. मात्र, काही तरुणांनी या तंत्रज्ञानातील बदलाचा विचार सामाजिक दृष्टिकोनातून केला. आपल्यातील कौशल्याचा वापर लोकांमध्ये सकारात्मक विचार आणि सामाजिक जाणीव निर्माण व्हावी यासाठी कसा होईल याचा विचार करून त्यांनी एक मालिकाच तयार केली. 

‘ग्रामंती’ असे या मालिकेचं नाव आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण मालिका ग्रामीण भागातील माणसांवर आधारित आहे. माणसं पण साधीसुधी नाहीत. त्यांनी काही सामाजिक कामे हाती घेतली. त्यांच्यासाठी हे जीवनाचं ध्येय आहे. अशा काही ध्येयवेड्या माणसांच्या कथा या मालिकेतून सर्वांना पाहता येतील. या मालिकेचा एक भाग पन्हाळा तालुक्‍यातील पोर्ले गावातील दिनकर चौगुले यांच्यावर आधारित आहे. चौगुले यांनी डोंगरातील माळरानावर जंगल फुलवण्याचा ध्यास घेतला. डोंगरावरील माळरानावर खड्डे खणणे, त्यामध्ये रोपे लावणे, त्यांना पाणी देणे अशी कामे ते गेली सहा वर्षे सातत्याने करतात. त्यांच्या प्रयत्नातून या माळरानावर आता जंगल निर्माण होत आहे.

एके काळी बोडका दिसणारा हा माळ आता हिरवागार दिसत आहे. झाडे अजून लहान असली तरी भविष्यात इथे भरगच्च जंगल उभे राहणार आहे. या मालिकेतील दुसरे व्यक्तिमत्त्व राजेंद्र लाड यांचे आहे. त्यांनी शाहूवाडी तालुक्‍यातील नदी टिकवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. नदीमध्ये कचरा टाकल्याने नदीचे पात्र अरुंद झाले. नदीला मिळणारे ओढे, नाले यांमध्ये अतिक्रमण झाले. यामुळे कडवी नदीच नष्ट होते की काय, अशी शंका येऊ लागली. लाड यांनी लोकसहभागातून कडवी नदी पात्राची साफसफाई करून पात्र अधिक खोल केले. तसेच ओढे, नाले यांचीही स्वच्छता केली. 

एका नदीचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कामाचा आढावा ग्रामंती या मालिकेत घेण्यात आला आहे. काटेगाव येथील डोंगरात शेती करणारे आनंद चाळके यांचे कार्यही या मालिकेत दाखवण्यात आले आहे. ही संपूर्ण संकल्पना विवेक सुभेदार या तरुणाची आहे. त्याने आणि त्याच्या तरुण सहकाऱ्यांनी मिळून ग्रामंती मालिका बनवली आहे. 

अशा अनेक ग्रामीण भागातील सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तींचे काम या मालिकेतून दाखवले आहे. लवकरच ही मालिका यू ट्यूबवर प्रसारित होईल. भविष्यात या लोकांपासून प्रेरणा घेऊन आणखी काही जण आपापल्या परिसरात कार्यरत होतील. हेच या मालिकेचे यश असेल. 

‘ग्रामंती’ची टीम अशी 
 निर्मिती - नीलछाया प्रोडक्‍शन 
 दिग्दर्शन, संकलन - विवेक सुभेदार
 लेखन - रोहित पाटील
 निवेदन - स्मिता शिंदे
 कॅमेरामन - आमन सिन्हा
 डी.आय.आर्टिस्ट - कपिल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gramanti showing humanity YouTube serial