ऑस्कर विजेत्या गुनीत मोंगा नाराज.. निर्मातीला ऑस्कर सोहळ्यातील 'ही' गोष्ट खटकली Guneet Monga | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Guneet Monga Disheartened not allowed deliver oscars 2023

Oscar 2023: ऑस्कर विजेत्या गुनीत मोंगा नाराज.. निर्मातीला ऑस्कर सोहळ्यातील 'ही' गोष्ट खटकली

Oscar 2023 मध्ये भारतीय सिनेमांची चागंलीच चर्चा रंगली. आरआरआर मधील नाटू नाटू गाण्यावर तर अख्ख्या हॉलीवूडनं ताल धरला. तर निर्माती गुनीत मोंगाच्या 'द एलिफेंट व्हिस्पर्स' या शॉर्टफिल्मनं पुरस्कार पटकावून भारताच्या शीरपेचात आणखी एक तुरा रोवला. पण ऑस्कर्स २०२३ च्या मंचावर गुनीत मोंगांना पुरस्कार जिंकल्यावर आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याची संधीच दिली गेली नाही याकारणानं गुनीत मोंगा सध्या नाराज आहेत.

गुनीत मोंगा आणि दिग्दर्शक कार्तिकी गोंसाल्विस ऑस्कर पुरस्कार जिंकल्यानंतर आपलं स्पीच देण्यासाठी मंचावर पोहोचल्या होत्या. कार्तिकीला आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली पण गुनीत बोलायला गेल्या तेव्हा म्युझिक वाजलं आणि त्यांना स्टेजवरनं खाली यावं लागलं.

गुनीत यांच्या विजयानंतर ऑस्कर्स २०२३ मध्ये बेस्ट एनिमेटेड शॉर्ट फिल्मची घोषणा झाली होती. ज्याचे विजेते होते Charlie Mackesy आणि Matthew Freud. या दोघांनाही आपलं स्पीच देण्याची संधी दिली गेली होती. आणि तेच गुनीत यांना थोडं नाराज करून गेलं.(Guneet Monga Disheartened not allowed deliver oscars 2023)

ऑस्कर्स २०२३ च्या मंचावर गुनीत मोंगासोबत जे झालं ते योग्य न्याय देणारं नव्हतं असे प्रश्न सोशल मीडियावरील युजर्स देखील आता उठवत आहेत. काहींनी म्हटलं की, 'ऑस्कर कमिटीनं हे योग्य केलं नाही'. तर काहींनी म्हटलं की,' गुनीत सोबत वर्णभेद झाला' यावर आता गुनित मोंगा यांनी एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. त्यांनी देखील आपल्याला स्पीच द्यायला मिळालं नाही याविषयी आपल्याला वाईट वाटतंय असं म्हटलं आहे.

मुलाखतीत निर्मात्या गुनीत मोंगा म्हणाल्या,''मंचावर मनातल्या भावना व्यक्त करता आल्या नाहीत म्हणून मी दुःखी आहे''.

त्या म्हणाल्या,''खरंतर मला त्या स्पीचमधून हे सांगायचं होतं की माझी शॉर्टफिल्म जिनं ऑस्कर जिंकलाय ही भारतीय प्रॉडक्शन अंतर्गत बनली आहे आणि असं पहिल्यांदाच ऑस्करमध्ये घडतंय. तो भारतासाठी एक खास क्षण होता..जो माझ्याकडून हिसकावून घेतला गेला. पण यासाठी सोशल मीडियावरनं मिळालेला पाठिंबा आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे'', असं देखील त्या म्हणाल्या.

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत गुनीत मोंगा यांना पूर्ण स्पीच देण्याची संधी मिळाली होती आणि त्यांनी तेव्हा मनमोकळा संवाद साधला होता. गुनीत मोंगानी आता मनाशी पक्कं ठरवलंय की पुढील वेळेस जेव्हा त्यांना ऑस्कर मिळेल तेव्हा त्या आपलं स्पीच नक्की देणार.

टॅग्स :Oscar AwardOscars