हलाला.. पार पडला संगीत अनावरण सोहळा

Halaal music launch esakal news
Halaal music launch esakal news

मुंबई : मुस्लिम समाजातील अनिष्ट प्रथा म्हणून संबोधला जाणारा तिहेरी तलाक हा अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. तिहेरी तलाकचा मुद्दा सध्या गाजतो आहे. मुस्लिम समाजातील महिलांमध्ये अलीकडच्या काळात तलाकच्या अघोरी प्रथेविरुद्ध जोरदार मंथन सुरू असल्यामुळे हा मुद्दा ऐरणीवर येत असतानाचा याच प्रथेचा परामर्ष घेणारा हलाल हा सिनेमा मराठीत येऊ घातला आहे. समाजातील अनेक सामाजिक प्रश्नांचा वेध मराठी सिनेमांनी घेतला आहे. याच पठडीतील आजच्या काळातील वास्तवाचा वेध घेणारा हलाल या सिनेमाच्या संगीत प्रकाशनाचा शानदार सोहळा नुकताच मुंबईत संपन्न झाला. लेखक राजन खान यांच्या ‘हलाला’ कथेवर आधारित या चित्रपटाची निर्मिती राष्ट्रीय पुरस्कार विजेते लक्ष्मण कागणे व अमोल कागणे यांनी केली असून दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिवाजी लोटन पाटील यांचे आहे. ६ ऑक्टोबरला हलाल प्रदर्शित होणार आहे.

"मनोरंजनाच्या माध्यमातून सामाजिक आशय परिणामकारकरीत्या लोकांपर्यंत पोचवता येतो. या उद्देशानेच मुस्लीम स्त्रियांची व्यथा हलाल चित्रपटाच्या माध्यमातून पोहचवण्याचा प्रयत्न केला असल्याची भावना निर्माते अमोल कागणे यांनी यावेळी व्यक्त केली. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी नेहमीच आपल्या कलाकृतींमधून सामाजिक प्रश्नांचा माणसांच्या जगण्याचा वेध घेतला आहे. ‘समाज बदलतोय असं आपण म्हणतो पण खरंच समाज बदलतोय का? आजही अनेक समस्या व त्या अनुषंगाने अनेक प्रश्न आपल्यासमोर आहेत. दिग्दर्शक या नात्याने या सामाजिक समस्येकडे लक्ष वेधण्याचा माझा कायमच प्रयत्न राहिला असल्याचे’, दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी यावेळी सांगितलं. ‘सामाजिक भान जपणाऱ्या कलाकृती समाजासमोर आवर्जून यायला हव्या असं सांगत अशा कलाकृतींमध्ये काम करायला मिळणं हे भाग्याचं असल्याचं’, मत सर्वच कलाकारांनी यावेळी व्यक्त केलं.

कथेचा आशय गडद करणारी ‘मौला मेरे  मौला’, सैयां ही दोन गीते व त्याला साजेसं पार्श्वसंगीत या चित्रपटातील गीतांना लाभलं आहे. चित्रपटाची गीते सुबोध पवार व सय्यद अख्तर यांनी लिहिली असून संगीताची जबाबदारी विजय गटलेवार यांनी सांभाळली आहे. गायक आदर्श शिंदे, सय्यद अख्तर, विजय गटलेवार यांचा स्वरसाज या चित्रपटाला लाभला आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकर, प्रितम कागणे, प्रियदर्शन जाधव, विजय चव्हाण, छाया कदम, संजय सुगावकर, अमोल  कागणे, विमल म्हात्रे या कलाकारांच्या हलाल मध्ये भूमिका आहेत. पटकथा व संवाद निशांत धापसे यांचे आहेत. छायांकन रमणी रंजनदास, संकलन निलेश गावंड यांचं आहे. कार्यकारी निर्माते मिथिलेश सिंग राजपूत आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com