पुन्हा अवतरतो बॉलीवूडचा सुवर्णकाळ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Movie Entertainment
पुन्हा अवतरतो बॉलीवूडचा सुवर्णकाळ!

पुन्हा अवतरतो बॉलीवूडचा सुवर्णकाळ!

- हरीश वानखेडे

अलीकडील काळातील हिंदी चित्रपट हे दाक्षिणात्य चित्रपटांपेक्षा अधिक अर्थपूर्ण दिसतात. कारण ते सामाजिक वास्तवाशी अधिक संलग्न वाटतात, कलात्मक दृष्टिकोनातून अधिक चांगले दिसतात आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी धाडसी विषय हाताळतात. बॉलिवूड चित्रपटांविषयीच्या पारंपरिक स्वभावात आता धाडसी बदल होत आहेत.

बॉलीवूडमध्ये सध्या १९६० च्या दशकातील सुवर्णकाळ पुन्हा अवतरला आहे. दक्षिण भारतीय चित्रपटांप्रमाणे गल्लाभरू अतिरंजित चित्रपटांपेक्षा विविध सामाजिक समस्या कथानकामध्ये गुंफून सर्जनशील चित्रपट बनवण्यास सुरुवात झाली आहे. बॉलीवूडमध्ये गंभीर आणि सामाजिक विषयांवरील चित्रपट प्रेक्षकांसाठी नक्कीच मनोरंजनात्मक आणि प्रबोधन करणारे ठरतील.

यावर्षी तीन दक्षिण भारतीय चित्रपटांच्या भव्य यशाने (आणि त्यापूर्वी ‘बाहुबली’च्या यशाने) हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेकांना आश्चर्यचकित केले आहे. हिंदी चित्रपटाच्या तुलनेत दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये लोकप्रिय कलाकारांचा भरणा, चित्रपटावर लावलेला मोठा पैसा आणि जाहिरातींची धोरणे ठरलेली असतात. तसेच त्यांच्या सादरीकरणात चपळता असते. आता तर तेलुगू, तमिळ आणि कन्नड चित्रपटसृष्टी बॉलीवूड सिनेमाची जागा घेण्यास सज्ज झाली आहे. जागतिक व्यासपीठावर ते भारतीय चित्रपटाचे प्रतिनिधित्वही करू शकतात. हिंदी चित्रपट सध्या गल्ल्यावर फारशी चांगली कामगिरी करू शकत नाहीत. अलीकडच्या काळात दाक्षिणात्य चित्रपटांनी सादर केलेली भव्यता आणि नवीन चित्रपट तंत्राशी जुळवून घेण्यास हिंदी चित्रपटसृष्टी अयशस्वी ठरली, या विधानात काही प्रमाणात तथ्य असू शकते. तथापि, हिंदी चित्रपटसृष्टीने दाक्षिणात्य शैलीची नक्कल करून अधिक लोकप्रिय आणि अतिनाट्यमय मूल्यांसह सिनेमे बनवले, असे म्हणणे खूप घाईचे ठरेल. त्याऐवजी अलीकडील काळातील हिंदी चित्रपट हे दाक्षिणात्य चित्रपटांपेक्षा अधिक अर्थपूर्ण दिसतात. कारण ते सामाजिक वास्तवाशी अधिक संलग्न वाटतात, कलात्मक दृष्टिकोनातून अधिक चांगले दिसतात आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी धाडसी विषय हाताळतात.

बॉलिवूड चित्रपटांविषयीच्या पारंपरिक स्वभावात आता धाडसी बदल होत आहेत. ‘झुंड’, ‘गंगुबाई काठियावाडी’ आणि ‘द काश्मीर फाइल्स’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटांनी हे दाखवून दिले आहे. अल्पसंख्याक समुहांचा सामाजिक संघर्ष दाखवणारे आणि प्रबळ वर्चस्ववादी मानसिकतेला फटकारणारे हे वास्तविक जीवनावर आधारित चित्रपट आहेत. समाजातील वंचितांच्या (‘झुंड’मधील दलित), असुरक्षित वर्ग (‘गंगुबाई काठियावाडी’मधील देहविक्रय करणाऱ्या महिला) आणि शोषित सामाजिक गटांच्या (‘द काश्मिरी फाइल्स’मधील काश्मिरी पंडित) शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर दाखवून, बॉलिवूडने पारंपरिक भावविभोर प्रसंग आणि हिंसाचाराच्या कंटाळवाण्या शैलीपासून दूर जाऊन नवीन अर्थपूर्ण चित्रपटांची निर्मिती केली आहे.

या चित्रपटांचे बॉक्स ऑफिसवरील यश विशेषतः ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट निर्मात्यांना महत्त्वपूर्ण सामाजिक वास्तव आणि ऐतिहासिक घटनांवर आधारित संवेदनशील चित्रपट बनवण्यास प्रेरित करू शकतात. दाक्षिणात्य चित्रपटांना जागतिक पातळीवर प्रचंड व्यावसायिक यश मिळाले असले तरी, या अलीकडच्या हिंदी सिनेमाने पारंपरिक कथाशैलीला प्रभावीपणे आव्हान दिले आहे. त्यात अर्थपूर्ण कथेसह सुधारणा केली आहे. नेहमीच सुरेल गाणी, नृत्य आणि अति मारधाड करणारे दृष्य दाखवणाऱ्या लोकप्रिय दाक्षिणात्य चित्रपटांच्या तुलनेत हिंदी सिनेमांनी सामाजिक आणि धाडसी विषय हाताळले आहेत. बॉलिवूड सध्या १९६०च्या दशकातील त्याचा सुवर्णकाळ पुन्हा अनुभवत आहे. त्या काळात गरीब कामगारवर्ग (‘दो बिघा जमीन’), विस्थापित (‘जागते रहो’), पितृसत्ताक विकृती (‘साहेब, बिबी आणि गुलाम’) आणि राजकीय गोंधळ (‘गरम हवा’) या विषयांवरील सृजनशील चित्रपट उत्कृष्ट ठरले होते.

मुंबई चित्रपटसृष्टी गेल्या काही काळापासून सामाजिक समस्यांबद्दलच्या गंभीर कथानकांपासून दूर गेली होती. १९८० आणि १९९० च्या दशकात बॉलिवूड सिनेमामध्ये कलात्मक आणि अर्थपूर्ण विषय मागे पडले आणि चित्रपटांना अधिक व्यावसायिक यश मिळवून देणारे विषय हाताळण्यास सुरुवात झाली. अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती, गोविंदा हे अभिनेते या काळात प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनले आणि त्यांनी बॉलिवूड सिनेमाला वेगळा आराखडा दिला. सुरुवातीला हिंदी सिनेमा जरी उच्चभ्रूंच्या व्यावसायिक हितसंबंध आणि पारंपरिक मूल्यांभोवती फिरत असला, तरी अलीकडच्या काळातील सिनेमांनी मनोरंजनाचा भाग न गमावता सामाजिक आणि कलात्मक विषयांची पुन्हा ओळख करून दिली आहे.

सामाजिक अभिजात वर्गाच्या नियंत्रणाला आव्हान देणारे हेच समांतर कलात्मक सिनेमे आहेत. जातीय समस्या आणि अस्पृश्यतेच्या समस्यांभोवतीच्या कथा बांधून असुरक्षित (‘सुजाता’), शक्तीहीन (‘अंकुर’) किंवा दुःखी (‘दामुल’) दलित पात्रांचे सामाजिक वास्तव या चित्रपटांमध्ये मांडण्यात आले आहे. तथापि, मुख्य प्रवाहातील व्यावसायिक सिनेमा अशा विषयांपासून अलिप्त राहिला. ‘न्यूटन’, ‘मसान’, ‘मांझी’ आणि ‘आर्टिकल १५’ यांसारख्या दलितांच्या समस्यांवर भाष्य करणारे चित्रपट असो किंवा ‘बाजार’, ‘चमेली’ आणि ‘चांदनी बार’ यांसारख्या देहविक्रय व्यवसाय करणाऱ्या महिलांचा प्रश्न संवेदनशीलपणे मांडणारे चित्रपट असो. आता ही मूल्ये बदलत आहेत.

समाजातील अतिशय दुर्बल घटकांशी निगडित आणि अपारंपरिक विषय घेतल्याबद्दल ‘झुंड’ किंवा ‘गंगुबाई काठियावाड’ यांसारख्या चित्रपटांचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले पाहिजे. क्षुल्लक गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या आणि अमली पदार्थांचे व्यसन लागलेल्या, अतिशय दारिद्र्यात राहणाऱ्या तरुण दलित युवक-युवतींचे दयनीय जीवन आपण ‘झुंड’ या चित्रपटात पाहिले आहे. नागरी जीवनातील मूलभूत हक्कांचा आनंद घेणाऱ्या समाजाच्या अपमानास्पद नजरेने पछाडलेल्या भटक्या तरुणांच्या रोजच्या संघर्षाचे चित्रण या चित्रपटात आहे. त्याचप्रमाणे ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटात देहविक्रय व्यवसाय करणाऱ्या महिलांवरील अत्याचाराची गोष्ट दाखवून त्या सन्मानाने, अभिमानाने जीवन जगण्यासाठी कशा जिद्दीने लढल्या, हे दाखवण्यात आले आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीने स्वीकारलेल्या नव्या अर्थपूर्ण वाटेबद्दल दाक्षिणात्य सिनेमे अजूनही बोध घेत नाहीयेत. १९९० च्या दशकापर्यंत हिंदी चित्रपटसृष्टीचा ठाऊक असलेला बळकट वारसा तेलुगू आणि कन्नड सिनेमा पुन्हा नव्याने शोधत असल्याचे दिसून येत आहे. अलीकडच्या काळात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने रुपेरी पडद्यावर अतिराष्ट्रवाद (‘आरआरआर’), प्रचंड अतार्किक हिंसाचार (‘केजीएफ २’), पौराणिक कथा (‘बाहुबली’) आणि पितृसत्ताक मनोवादी हिंसा (‘पुष्पा’) मुख्य प्रवाहात पुन्हा एकदा पुरुष नायकाची कल्पना मांडली आहे. हे विषय चित्रपटांमध्ये प्रचंड गाजत आहेत आणि सर्वात प्रभावी कथाशैली म्हणून उदयास येत आहेत. व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी दाक्षिणात्य चित्रपटांना त्यांच्या अतिभावनिक आणि हिंसक कथांबद्दल अजिबात खेद नसतो. तसेच ते संवेदनशील-वादग्रस्त विषयांवर लक्ष ठेवण्याची विशेष काळजी घेत नाहीत.

गंभीर, बौद्धिक आणि सर्जनशील क्षमतांसह सामाजिक आणि वर्गीय विकृती दर्शवणारे मुख्य प्रवाहातील लोकप्रिय चित्रपट खूप कमी आहेत. (किंवा पा रंजिथ, वेत्रिमारन आणि मरी सेल्वराज यांच्यासारख्या दलित-बहुजन चित्रपट निर्माते-दिग्दर्शकांनी बनवलेले चित्रपट). पुढे जातीवर आधारित सामाजिक विभाजनाचे चित्रण करणारे किंवा दलितांचे भयंकर उपेक्षितत्व दाखवणारे किंवा आदिवासींचे हिंसक शोषण ठळकपणे दाखवणाऱ्या चित्रपटांची संख्या नगण्य आहे. त्याऐवजी मुख्य प्रवाहातील दाक्षिणात्य सिनेमे भावनिक आणि मसाला मनोरंजन करण्याच्या नावाखाली हिंस्र राष्ट्रवाद आणि पितृसत्ताक दहशतवादाचे उत्सव साजरे करतात. असे सिनेमे सामाजिक संवेदनशीलता, बौद्धिक सर्जनशीलतेपासून दूर असतात आणि अनेकदा सुपरस्टारच्या क्षमतेवर अवलंबून असतात.

‘झुंड’ आणि ‘गंगुबाई काठियावाडी’ यासारखे चित्रपट बॉलिवूडला गंभीर आणि जबाबदारीचे भान देतात आणि अर्थपूर्ण सिनेमाच्या जवळ आणून ठेवतात. या चित्रपटांनी दाक्षिणात्य चित्रपटांप्रमाणे नेहमीच यश मिळवणाऱ्या व्यावसायिक, सनसनाटी विषयांपेक्षा दलित, आदिवासी आणि बहुजन लोकांच्या जीवनाविषयी त्यांच्या घटनांभोवती कथानक घट्ट विणत वेगळा सर्जनशील दृष्टिकोन सादर केला आहे. दक्षिणेतील मेगाब्लॉकबर्स्टर चित्रपटांमधून शिकण्यापेक्षा सिनेमाच्या कलात्मक तर्कावर पुनर्विचार करण्याची आणि सामाजिक समस्या गंभीरपणे समजून घेणारे चित्रपट बनवण्याची वेळ आली आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे, तसेच प्रबोधन करणारे चित्रपट हे चित्रपटसृष्टीच्या भविष्यासाठी उत्तम मॉडेल ठरतील.

Web Title: Harish Wankhede Writes Bollywood Golden Time Movie Entertainment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top