'हा' करणार "सबसे स्मार्ट कौन?' या शोचे सूत्रसंचालन

संतोष भिंगार्डे
गुरुवार, 31 मे 2018

"स्टार प्लस' वाहिनीवरील "सबसे स्मार्ट कौन?' या शोचे सूत्रसंचालन रवी दुबे करत आहे. त्यानिमित्त... ​

"स्टार प्लस' वाहिनीवरील "सबसे स्मार्ट कौन?' या शोचे सूत्रसंचालन रवी दुबे करत आहे. त्यानिमित्त... 

या शोची ऑफर तुला कशी काय आली? 
- हा शो मला ऑफर होईल असे काही वाटले नव्हते. या शोचे निर्माते विपुल शाह यांचा एके दिवशी मला फोन आला आणि त्यांनी मला या शोबद्दलची माहिती दिली. ते सगळे ऐकल्यानंतरच मी होकार दिला. मला या शोची कल्पना खूप युनिक वाटली. हा शो केवळ प्रश्‍नोत्तराचा नाही तर त्यातून तुमच्या बुद्धिमत्तेलाही चालना मिळणार आहे. त्यामध्ये तुम्ही घरूनही खेळू शकता आणि बक्षीस जिंकू शकता. त्याबाबतची माहिती स्टारवर येत आहे. हा शो थोडा विनोदी आणि उत्सुकता वाढवणारा आहे. "सबसे स्मार्ट कौन?' हा शो निराळा आहे. यामध्ये केवळ सतर्क राहून आणि कॉमनसेन्सचा वापर करून उत्तर द्यायचे आहे. तुम्हाला एक प्रश्‍न विचारला जाणार आहे. त्याचे अचूक उत्तर दिलेल्या पर्यायातून निवडायचे आहे. 

तुझ्या मते छोट्या पडद्यावर सगळ्यात स्मार्ट कोण आहे? 
- खरे तर या प्रश्‍नाचे उत्तर देणे कठीण आहे. मी कुणा एकाचे नाव घेतले तर दुसरा नाराज होईल. त्यामुळे कुणाचेही नाव सांगणे कठीण आहे. परंतु माझी पत्नी सरगून ही सगळ्यात स्मार्ट आहे. सध्या तिने छोट्या पडद्यावर काम करणे कमी केले आहे. मोठ्या पडद्यावर ती अधिक काम करत आहे. तिने घेतलेले निर्णय स्मार्ट असतात. केवळ प्रोफेशनल नाही तर वैयक्तिकही तिचे निर्णय अचूक असतात. त्यामुळे ती सगळ्यात स्मार्ट आहे. तिच्यासारखे निर्णय किंवा तिच्या इतका मी स्मार्ट नाही. 

तुझ्या मते स्मार्टनेस म्हणजे काय? 
- सगळे जण स्मार्ट आहेत. कारण आपण आयुष्य जगत असताना विविध प्रकारचे निर्णय घेतो. त्यातील बहुतेक निर्णय योग्य असेच असतात. त्यामुळे त्यामध्ये तुमच्यातील स्मार्टपणा तिथे दिसून येतो. योग्य आणि अचूक निर्णय घेणे म्हणजेच स्मार्टपणा आहे. 

ravi dube

तू तुझ्या आयुष्यात कोणता स्मार्ट निर्णय घेतलास? 
- खरे तर त्याबाबतीत एकच निर्णय सांगणे कठीण आहे. असे मी कित्येक निर्णय घेतलेले आहेत. या इंडस्ट्रीत आलो तो माझा स्मार्ट निर्णय होता. त्यानंतर विविध मालिकांमध्ये काम केले. त्यातील काही मालिका यशस्वी ठरल्या. परंतु सगळ्यात स्मार्ट निर्णय होता सरगूनशी लग्नाचा. माझ्या जीवनात ती आली आणि बरेच काही बदलले. 

तुझा आतापर्यंतचा प्रवास कसा होता? 
- चांगलाच झाला आहे आणि या क्षेत्रात आल्याचा मला अभिमान आहे. कारण माझे इंजिनिअरिंगचे एक वर्ष खराब झाले खरे. परंतु त्याच वेळी मी या क्षेत्रात आलो. अनेक चांगले आणि वाईट अनुभव आले. कधी कधी खूप दुःखही झाले. परंतु या सगळ्यांवर मी मात केली. काही चुका झाल्या त्या सुधारण्याचा प्रयत्न केला. त्यातून शिकलो आणि सावरलोही आहे. आता माझे करिअर मी एन्जॉय करत आहे. 

तुझ्यातील प्लस पॉइंट कोणते आहेत आणि मायनस कोणते आहेत? 
- मी स्वतःचे कौतुक खूप करतो...सतत स्वतःची स्तुती करत असतो. हा प्लस पॉइंट आणि मी खूप आळशी स्वभावाचा आहे. कधी कधी चित्रीकरणाला जाताना आळशीपणा करतो हा माझा मायनस पॉइंट आहे. 

छोट्या पडद्यावर इतर अँकरबरोबर तुलना केली जाईल याची भीती वाटते का? 
- आता भीती वगैरे वाटत नाही. त्याचे कारण असे की ही इंडस्ट्री खूप मोठी आहे. इथे दररोज नवनवीन घडामोडी घडत असतात. नवनवीन कलाकार येत असतात आणि आपले नशीब आजमावत असतात. त्यामुळे अन्य कुणाशी तुलना झाली तरी त्याची मला भीती वगैरे वाटणार नाही. खरे सांगायचे तर निरीक्षण करण्याची आवड मला लहानपणापासूनच होती. त्या आवडीमुळेच मला आता या क्षेत्रात काम करणे सोपे झाले आहे. निरीक्षणातून शिकलो आहे. 

तुझा पहिला चित्रपट येतोय असे ऐकले ... 
- 3 देव हा माझा पहिलाच चित्रपट येत आहे. त्याबद्दल मनात खूप उत्सुकता आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश भटने केले आहे. हा विनोदी चित्रपट आहे आणि यातील माझी भूमिका मजेशीर आहे. या चित्रपटात काम करत असलो तरी टीव्ही काही सोडणार नाही. टीव्हीवरही काम करीत राहणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: he is anchor of the show sabse smart kaun