
Hemant Dhome: काही चित्रपट प्रदर्शनानंतर टीव्हीवर आल्यावर हीट होतात.. अखेर हेमंत ढोमे बोललाच..
Hemant Dhome: हेमंत ढोमे सोशल मीडियावर भलताच सक्रिय पहायला मिळतो. तो अनेकदा ज्या पोस्ट करतो त्याची जोरदार चर्चा रंगते. तो अनेक अनुभव तिथे शेयर करत असल्याने अनेकांचे लक्ष त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट वर असते.
हेमंत फक्त अभिनेता म्हणून नाही तर एक उत्तम लेखक,दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही आता नावारुपास आला आहे. नुकताच त्याचा 'सातारच सलमान' चित्रपट आपल्या भेटीस आला होता. तर लवकरच त्याचा 'झिम्मा 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
त्यामुळे सध्या हेमंतची मनोरंजन विश्वात बरीच हवा आहे. अशातच हेमंतने एक पोस्ट शेयर केली आहे, ज्यामध्ये त्याने त्याच्या पहिल्या चित्रपटाविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
हेमंतचा सर्वात पहिला आणि गाजलेला चित्रपट म्हणजे 'क्षणभर विश्रांती'. या चित्रपटाने एक वेगळीच कथा.. एक वेगळीच लव्हस्टोरी आपल्यापुढे आणली. या चित्रपटाला आज १३ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने हेमंतने ही पोस्ट केली आहे.
या चित्रपट हेमंत, सिद्धार्थ जाधव, सचित पाटील, कादंबरी नाईक, पूजा सावंत, सोनाली कुलकर्णी प्रमुख भूमिकेत होते. हा चित्रपट आणि त्यातली गाणी आजही प्रेक्षक विसरू शकले नाहीत. अभिनेता आणि लेखक म्हणून हा हेमंतचा पहिला चित्रपट.. म्हणून त्याने व्हिडिओ शेयर करत खास आठवण सांगितली आहे.
या व्हिडिओ मध्ये हेमंत आणि कादंबरी नाईकचा चित्रपटातील एक सीन आहे. सोबत हेमंत कॅप्शन मध्ये म्हणतो...
'‘क्षणभर विश्रांती’ या माझ्या चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं, काही चित्रपट असे असतात जे प्रदर्शना नंतर नाही तर टिव्ही वर ओटीटी वर आल्यावर सुपरहिट होतात! आपल्या या सुपरहिट सिनेमाला आज १३ वर्ष झाली प्रदर्शित होऊन! आजही लोक भेटतात, प्रेमाने बोलतात!''
''हा चित्रपट मला लिहीता आला, त्यात काम करता आलं आणि खूप साऱ्या गुणी मित्रांसोबत काम करता आलं… कमाल! तुमचं प्रेम असंच राहूदे! धन्यवाद माझी संपूर्ण टिम आणि धन्यवाद प्रेक्षक!'' अशी पोस्ट त्याने केली आहे.