His Father's Voice : नातं, संगीत अन् नृत्याच्या फ्युजनने प्रेक्षक मंत्रमुग्ध!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

‘एकमेकांना समजून घेतल्याशिवाय कुटुंबातील नातेसंबंधांना अर्थ उरत नाही,’ हा धागा पकडून कार्तिकेयन यांनी लिहिलेली कथा व पटकथा असलेला ‘हिज फादर्स व्हॉइस’ हा चित्रपट बारा वर्षांपूर्वी वेगळे झालेल्या वडील व मुलाची गोष्ट सांगतो...

पुणे : आजच्या काळातील वडील आणि मुलातील हळवे नाते व त्याला रामायणातील राम आणि लव-कुश यांच्या कथेचा दिलेला संदर्भ, बासरी आणि गिटारची अनोखी जुगलबंदी, मनाचा ठाव घेणारी नृत्ये अशी अनेक वैशिष्ट्ये असलेल्या अश्‍विनी प्रतापराव पवार निर्मित व कार्तिकेयन किरूभाकरन दिग्दर्शित ‘हिज फादर्स व्हॉइस’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी रविवारी (ता. 11) उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयामध्ये सकाळी व संध्याकाळी झालेल्या प्रिमिअर शोला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. 

‘एकमेकांना समजून घेतल्याशिवाय कुटुंबातील नातेसंबंधांना अर्थ उरत नाही,’ हा धागा पकडून कार्तिकेयन यांनी लिहिलेली कथा व पटकथा असलेला ‘हिज फादर्स व्हॉइस’ हा चित्रपट बारा वर्षांपूर्वी वेगळे झालेल्या वडील व मुलाची गोष्ट सांगतो. नृत्यामध्ये करिअर करू पाहणारा हा मुलगा एका टप्प्यावर अडखळू लागतो व वेगळ्या झालेल्या वडिलांची भेट घेतल्याशिवाय नृत्यात उत्स्फूर्तता येणार नाही या गुरूने दिलेल्या सल्ल्यानुसार वडिलांच्या शोधार्थ परदेशातून भारतात येतो. त्याचे वडील राहत असलेल्या नृत्यालयात तो दाखल होतो आणि ही कथा आकार घेते. या मुलाच्या आयुष्याला नृत्य, संगीत आणि चित्रकलेच्या माध्यमातून मिळालेला नवा अर्थ, नव्या नात्यांचा लागलेला शोध असा हळवा प्रवास कथेत मांडण्यात आला आहे. प्रदर्शनानंतर निर्माता-दिग्दर्शकांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. 

Image may contain: 1 person, standing, ocean, sky, text and outdoor

चित्रपटाच्या प्रवासाबद्दल बोलताना कार्तिकेयन म्हणाले, ‘‘उत्तर रामायण आणि आजच्या काळातील नात्यांतील तणाव यांचा मेळ घालत मी ही कथा लिहिली. चित्रपटातील सर्वच कलाकार नवे आहेत, मात्र त्यांच्यातील कला आणि व्यक्तिमत्त्वाचा उपयोग करून मी त्यांच्याकडून काम करून घेतले. ‘कावडी’ प्रॉडक्शन्सतर्फे भविष्यात आणखी भव्य चित्रपटांची निर्मितीची आमची योजना आहे.’’

अश्‍विनी पवार म्हणाल्या, ‘‘मी नृत्य आणि चित्रकलेच्या क्षेत्रात काम करते आणि माझी भूमिकाही तशीच असल्याने मला ती साकारणे सोपे गेले. अभिनयाचा हा पहिलाच अनुभव खूप शिकवणारा आणि अविस्मरणीय ठरला.’’ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: His father s voice film premier held in pune yesterday