
सेलिब्रिटींच्या 'त्या' ट्विट्सची होणार चौकशी
दिल्लीच्या वेशींवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचं समर्थन करणारे ट्विट आंतरराष्ट्रीय पॉप सिंगर रिहाना, पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांनी केल्यानंतर सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा झाली. बाहेरच्या सेलिब्रिटींकडून केले जाणारे ट्विट पाहिल्यानंतर बॉलिवूड सेलिब्रिटी आणि कलाविश्वातील नामवंतांनी आंदोलनासंदर्भात ट्विट केलं. #IndiaTogether आणि #IndiaAgainstPropaganda या हॅशटॅगअंतर्गत ट्विट्सची मालिकाच सुरू झाली. सेलिब्रिटींनी हे ट्विट्स कोणाच्या दबावाखाली येऊन केले का, याची चौकशी करणार असल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं.
गृहमंत्री अनिल देशमुखांचं ट्विट-
'कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर गेल्या ७० दिवसांपासून आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या मुद्यावर देशातील सेलिब्रिटीजचा केंद्रसरकारने गैरवापर केल्याप्रकरणी महाराष्ट्र काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मला चौकशी करण्याचे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे निवेदन दिले. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या गंभीर विषयावर माझ्याशी चर्चा केली. कोरोनाची बाधा झाली असतानाही शेतकऱ्यांचा विषय असल्याने मी त्यांना भेटीची वेळ दिली. त्यांचे म्हणणे ऐकून घेत या विषयावर नियमांनुसार कारवाई करण्याचे आश्वासन त्यांना दिले,' अशी माहिती अनिल देशमुख यांनी ट्विट करत दिली.
भारतरत्नाने सन्मानित केलेल्या व्यक्ती आमच्या सगळ्यांसाठी सन्माननीय आहेत.पण त्यांच्यावर कोणत्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी दबाव टाकला का? त्या नेत्याची चौकशीची मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. https://t.co/9c6Ns4DuHT
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) February 8, 2021
हेही वाचा : कंगनाविरुद्ध तक्रार दाखल; 'ते' ट्विट पडलं महागात
सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर आणि अन्य काही सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनासंदर्भात केलेली ट्विट सारखीच असल्याने त्यांच्यावर यासंदर्भात कोणी दबाव आणून ही ट्विट करायला लावली का, याची चौकशी करणार असल्याचं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं. 'भारतरत्नाने सन्मानित केलेल्या व्यक्ती आमच्या सगळ्यांसाठी सन्माननीय आहेत. पण त्यांच्यावर कोणत्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी दबाव टाकला का? त्या नेत्यांच्या चौकशीची मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे,' असं ते पुढच्या ट्विटमध्ये म्हणाले.